पहिला चहा | थलपती मदिरास्थळावर...!

liquor shop controversy
पहिला चहा | थलपती मदिरास्थळावर...!
Published on
Updated on

मएना रास्कला... थलपती विजय... पक्का थलायवा... हाहा! न्यूज पेपर, न्यूज चॅनेल चाळून तामिळनाडूच्या जनतेला नशा चढली आणि जनता बेहोश! थलपतीने लगेच निर्णय घेऊन टाकला. शाळा, कॉलेजपासूनच्या पाचशे मीटर अंतरात दारू विक्रीस बंदी. न्यूज वाचून, ऐकून जे बेहोश झालेत ते दारूच पिऊन बेहोश झालेत ही शक्यता आहे. ओएसडी या पदावर विजयने वेट्रीवल याची तातडीने नियुक्ती करून घेतली अगदी आतल्या गोटातल्या मंत्रिमंडळात. विजयला जनता मद्यधुंद आहे की विजयच्या नशेत धुंद हे समजले नाही. त्यामुळे गोंधळ. दारूची दुकानं बंद होण्याआधीच ओएसडी पदावरून वेट्रीवल लगेच मुक्त. सांगा अजून भाकीत.

जनता पुन्हा विजयच्या निर्णयाने बुचकळ्यात! धार्मिक स्थळे, विद्यालये आणि मंदिरे यांच्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावर वाट अडवून असणारी दारूची दुकानं बंद झाली पाहिजेत एवढेच विजयच्या दृष्टीत. गश्मीरने देऊळ बंद केले त्याप्रमाणे दारूची दुकाने बंद. असं काहीसं महाराष्ट्रातील जनतेला वाटलं. विजय तर देव आणि ज्योतिष याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही ही जनसामान्यांत चर्चा. थलपती विजयने फर्मानं काढली, पण जनतेला पिल्याशिवाय विजयचा थलायवा नाच दिसणार कसा? विजयचे फक्त नेतृत्व असून उपयोगाचे नव्हते, तो नाचतानाही दिसला पाहिजे, चौफेर उधळून विरोधकांना माती चारताना दिसला पाहिजे. त्यासाठी नशा तर हवीच बघ्यांना. पण थलायवा तर दारूची दुकानच बंद करायला निघाला हे मात्र लोकांना शुद्धीवर आणण्याचं तंत्र होतं.

275 धार्मिक स्थळं, 255 बस स्टँड, 186 शैक्षणिक संस्थांजवळच्या मदिरास्थळांना कुलपे लावून थलायवा किल्ल्या हवेत उडवत धुमाकूळ घालणार हे चित्र तामिळनाडूत स्पष्ट दिसू लागले. तोपर्यंत एक दारूडा येऊन चिमटा काढल्यागत बोलून जातो, ‘थलपती इन वेत्री वेट्रीवल साधियाकथू...!’ तमिळमधे न्यूज चॅनेलवर गाजावाजा. वेट्रीवलच्या भविष्यामुळे थलपती विजयी झाला, याची मीडिया टिमकी वाजवू लागली. थलपती यावेळी बॅकग्राऊंडला मीडियाला वाजंत्र्या वाजवायला देऊन तमाम दारूच्या दुकानांचा ढोल वाजवून आला आणि वेट्रीवल ज्योतिष सांगण्यापासून वंचित तर झालेच, पण त्यांच्या पदाचाही ढोल थलपतीने आवाज न करता वाजवला. थलपती, आपण दारूची दुकाने बंद केलीत; पण जनता अजून आपल्या पदाच्या नशेत धुंद आहे. आता पाचशे मीटरचे अंतर थलपती म्हणजे खुद्द आपण आणि जनता यामध्येही असेच राहावे म्हणजे झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news