

पालघर जिल्ह्यामधील एक कावळा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तो चक्क माणसाप्रमाणे बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. ‘काका’, ‘बाळा’ अशा हाका तो देत असतो. क्वचित प्रसंगी ‘काका आहेत का’ असे तो त्याच्या शब्दात व्यक्त होत असतो. आपल्या भोवती असणारे प्राण्यांचे जग हे आपल्याकडून बर्याच गोष्टी आत्मसात करत असते. कोल्हापूर परिसरातील काही कुटुंबांमध्ये पाळलेले कोंबडे माणसांच्या बरोबर मुक्त संवाद साधतात, असे दिसून आले आहे.
येथे प्रश्न असा उभा राहतो की, हे पक्षी आपले बोलणे समजून घेऊन त्याला उत्तर देतात की केवळ नक्कल करतात? पक्ष्यांच्या आपसात बोलण्याच्या विविध पद्धती असतात. किंकाळ्या, शिट्ट्या असे वेगवेगळे आवाज पक्षीपण काढतात. अत्यंत सामाजिक असलेले पोपटासारखे पक्षी अन्न मिळवण्यासाठी आणि धोक्याची सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज काढत असतात. जंगलातदेखील एखाद्या परिसरात वाघ आला की, मोर वेगळ्या प्रकारचे आवाज काढून इतर पक्षी आणि प्राण्यांना सावध करत असतात. माणसांच्या बरोबर राहून पक्षी हळूहळू त्यांच्या शब्दांची, आवाजाची नक्कल करायला लागतात आणि आपल्याला वाटते की, ते बोलत आहेत. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षामध्ये अॅलेक्स नावाच्या एका पोपटाने फार मोलाची मदत केली आहे. शंभरहून अधिक शब्दांचे अर्थ त्याला समजत होते. वस्तू, क्रिया, रंग इत्यादीपण समजत होते. तो सहापर्यंत मोजू शकत होता आणि एखाद्या वस्तूचा रंग, आकार, पदार्थ ओळखू शकण्याची त्याची क्षमता अद्भुत होती. त्याला त्या पद्धतीचे शिक्षण देण्यात आले होते.
कावळा हासुद्धा मजबूत अशी सामाजिक व्यवस्था असलेला पक्षी आहे. कावळा स्वतःची बुद्धिमत्ता वापरून उत्तरे देत असेल असे संशोधकांना वाटत नाही. त्यांना जसे शिकवले जाते तसे ते नक्कल करण्यामध्ये पटाईत होतात आणि मग आपल्याला वाटायला लागते की, पक्ष्यांना आपली भाषा समजायला लागलेली आहे. माणसांच्या हालचालींवरून पक्षी स्वतःचे निरीक्षण करत असतात; परंतु आवाजाची नक्कल करण्यामध्ये पक्षी इतर प्राण्यांपेक्षा पुढे आहेत असे लक्षात येते. पालघरमधील बोलणारा कावळा हा याचेच उदाहरण आहे.
राजकारणात तरी काय वेगळे असते? एखाद्या व्यक्तीवर आरोप करताना कोणी कधी आणि काय बोलायचे हे ठरवूनच बोलले जाते. पक्षश्रेष्ठींनी ज्याप्रमाणे बोलायला सांगितले आहे त्याप्रमाणे पहिला राजकीय नेता बोलतो. त्याच्यावर टीका सुरू झाली की, त्याला उत्तर कोणी द्यायचे, हे ठरलेले असते आणि साधारण दोन दिवसांमध्ये सगळ्या सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमध्ये एकच गदारोळ उडवला जातो. राजकीय नेते, प्रवक्ते आणि बोलणारे पक्षी यांच्यामध्ये असेही साम्य आढळून येते.