तडका : गुरुप्रेम

श्रीनिवास गुरुजींच्या प्रेमाखातर 150 विद्यार्थ्यांनी बदलली शाळा
Tadka Article Guruprem
तडका आर्टिकल गुरुप्रेमPudhari File Photo
Published on
Updated on

श्रीनिवास गुरुजी तुम्ही आंध्र प्रदेशच्या कुठल्यातरी जिल्ह्यातील शाळेत शिकवत होता. तिथून म्हणे तुमची बदली झाली दुसर्‍या गावाला. नोकरी म्हटलं की बदली अपरिहार्य असतेच, जावेच लागते. आदेशाप्रमाणे तुम्ही नवीन गावात रुजू झालात आणि काय आश्चर्य! तुमच्या आधीच्या शाळेमधल्या 150 विद्यार्थ्यांनी ती शाळा सोडली आणि तुम्ही जिथे रुजू झालात तिथे प्रवेश घेतला.

शिक्षण क्षेत्र म्हटल्याबरोबर अध्यापनाची तळमळ, विद्यार्थ्यांना अध्ययनाची तळमळ असे शब्द ऐकू आले पाहिजेत. शिक्षण म्हटल्यावर पहिल्यांदा त्याचे बाजारीकरण हा शब्द समोर येतो, तिथे या श्रीनिवास गुरुजींनी हा चमत्कार घडवून आणला. आपल्या महाराष्ट्रातही असे असंख्य श्रीनिवास गुरुजी आहेत ज्यांची बदली झाल्यानंतर त्यांचे सर्व विद्यार्थी निरोप समारंभात रडताना आपण पाहिले आहेत.

आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेवून प्रेमळपणाने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करणारे गुरुजी तसे दुर्मीळच म्हणावे लागतील. कधीकाळी एक शिक्षकी शाळा होत्या. याचा अर्थ पहिली ते चौथी एकच शिक्षक असायचे आणि शाळेची विद्यार्थी संख्या जेमतेम 30 किंवा 40 असायची. गुरुजी मध्यभागी उभे राहत असत. पहिलीच्या रांगेला काही गृहपाठ देत असत. त्याच वेळेला दुसरीच्या विद्यार्थ्यांना काही शिकवत असत. तिसरीच्या विद्यार्थ्यांना पाढे म्हणायला लावत असत आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना खेळायला सोडत असत. एकच शिक्षक चार वर्गांचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्धपणे करत असे. आता एका वर्गाला चार शिक्षक असले तरी सर्वत्र गोंधळ असतो. याची मुख्यत: दोन कारणे असतात.

श्रीनिवास गुरुजींसारखे शिक्षक, ज्यांच्यासाठी सगळा विद्यार्थीवर्ग थेट आपली शाळा सोडून गुरुजी असतील त्या शाळेमध्ये प्रवेश घेतो. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हे गुरुजी या शाळेमध्ये रुजू होण्यापूर्वी इथली विद्यार्थी संख्या जेमतेम वीस-बावीस असायची. ती गुरुजींच्या आगमनानंतर थेट 200 पर्यंत गेली आणि गुरुजींच्या बदलीनंतर हे सर्व विद्यार्थी तातडीने गुरुजी आहेत तिथे प्रवेश घेते झाले. खरं तर, समाजाने अशा गुरुजींची दखल घेतली पाहिजे, तसेच त्यांना सन्मानित केले पाहिजे. या गुरुजींचा आदर्श इतर गुरुजनांसमोर ठेवला पाहिजे, तरच काही तरी शिक्षण क्षेत्रामध्ये भले होण्याची अपेक्षा बाळगता येईल. शाबास श्रीनिवास गुरुजी! आपल्या विद्यार्थ्यांचे प्रेम मिळविण्यामध्ये तुम्ही कमालीचे यशस्वी झाला आहात. विद्यार्थी शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट आई-वडिलांना सांगत असतो. तुमचे विद्यार्थी तुमच्याबद्दल भरभरून बोलले असतीलच घरी. त्यावरून पालकांना पण लक्षात आले असेल की, आपला मुलगा शिकायचा असेल किंवा त्याला शिक्षणाची गोडी लागायची असेल, तर गुरुजी जिथे आहेत तिथे आपण प्रवेश घेतला पाहिजे. तब्बल तीन किलोमीटर जास्त अंतरावर असणार्‍या गावामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन तुम्हालाही कदाचित चकित केले असेल; पण अजिबात चकित होऊ नका. गुरुजी, समाज दखल घेतच असतो. विद्यार्थीही दखल घेत असतात. तुमच्यासारखे निष्ठापूर्वक कार्य करणारे शिक्षक असतील, तर विद्यार्थ्यांचा तुटवडा भासत नाही. तुमच्यासारख्या गुरुजींसाठी एक शाळा सोडून विद्यार्थी तुम्ही जिथे आहात तिथे जात आहेत, हे चित्र दुसर्‍या बाजूला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news