

अब्बुराव : तुला काही समजलं का?
गब्बुराव : तुला जे समजलंय ते मला समजलंय का, याच्याशी तुझी स्पर्धा आहे का, भैताडा?
अब्बुराव : तुझी बायको आणि माझी बायको एकाच ठिकाणी कामं करतात. हल्ली लवकर घरी येतात रे!
गब्बुराव : हा, मग?
अब्बुराव : मग काय मग. आपण रोज बसत होतो ना गच्चीवर बाटल्या घेऊन, ते बंद होतंय बहुतेक. या घरी लवकर टपकतात त्यामुळं. वहिनींनी विधानसभेत भाषण करून महिलांच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे या घरी लवकर येऊन राहिल्या. आता काय करशील बे?
गब्बुराव : ते सांग ना आधी. तुझं भाषण बिनकामी कशाला ऐकवतो रे!
अब्बुराव : ते जाऊदे, ऐक! मिलिटरीची आणलीय. या दोघींना चित्रपटाची तिकिटं काढून देऊ आज रात्रीची आणि निवांत बसू.
गब्बुराव : अरे, पण चित्रपट किती चांगला आहे ते समजावून सांगावे लागेल.
अब्बुराव : तू सांग वहिनींना. मी माझ्या बायकोला सांगतो.
गब्बुराव : वहिनींनी भाऊजींचे वांदे केले.
अब्बुराव : ये, आल्या आल्या दोघी. चल आताच सांगू. (बायकोला पाहून) अगं, दोघींना आम्ही सरप्राईज पार्टी देणार आहोत.
अब्बूची बायको : सरप्राईज फोडून कसली पार्टी देताय. कळलं की आम्हाला आता तुम्ही काही तरी बेत आखलाय.
गब्बुराव : तसं नाही वाहिनी. तुम्ही दोघी फिरायला जाऊ शकत नाही कुठं म्हणून आम्ही चित्रपटाची दोन तिकिटं बुक केलीत. तुम्ही आता लवकर घरी येता त्यामुळं बरं वाटतंय.
गब्बूची बायको : पण तिकिटं दोनच का? तुम्ही दोघं का नाही येणार?
अब्बुराव : तो चित्रपट महिलांसाठी खास आहे. आमचं काय काम तिथं? महिला सक्षमीकरण मोहिमेत तेवढाच आमचा खारीचा वाटा. काय गब्बू? (खाणाखुणा करत)
गब्बुरावची बायको : अहो भाऊजी, तो चित्रपट आम्ही ऑफिसला सुट्टी घेऊन पाहून राहिलो ना. आज बॉसने तेवढ्यासाठी सुट्टी जाहीर केली. खूप छान होता चित्रपट. हो ना गं?
अब्बुरावची बायको : विधिमंडळात वहिनी म्हटल्या, महिलांनो लवकर या, लवकर घरी जा. म्हणून सकाळचा शो बुक केला.
अब्बुराव आणि गब्बुराव : कशाला वहिनींनी वेळेवर बाण मारायचा, लवकर या सांगून. घ्या आता! (पश्चातापाने)