

देवाजी : तुला सांगतो, मराठी भाषा ही अंगीकारणे सोपे नाही. माझी ‘काय बे, व्हय बे’ पासून चालू होते ती ‘चल साल्या’ इथे संपते.
संताजी : हो का? ती मुंबईला कशी चालेल. इथे भेंडी, गवार जास्त खपते.
देवाजी : अजिताजी एकदम इंग्रजीत घुसल्या तसंच आम्ही एकदम मराठीत घुसलो आणि आमचं ‘काय बे, व्हय बे’ बाजूला केलं. हसतात हो लोक.
संताजी : अस्खलित बोलल्या इंग्रजी; पण मुद्दे मराठीचे मांडले. अभिमान आहे त्यांचा.
देवाजी : बाकी आपले भाषणातले विनोद मराठी माणसांना एकत्र आणू शकतात; पण विनोद आता अस्मितेचा विषय झाला आहे. कोणीच कोणाशी विनोदाशिवाय बोलायला तयार नाही. परखड झाली लोकशाही.
संताजी : विनोद आपल्यातला पूल आहे. एकमेकांवर विनोद करतो म्हणून संभाषण तरी करतो रित्या मनाने. नाही तर काही मराठीचा गौरव करायला पण तोंड वाकडं करून येतात.
देवाजी : वरच्याची करणी. जशी कर्म तशी तशी तोंडं. चला!
संताजी : देवाची करणी म्हणा की राव!
देवाजी : उगाच आमचं नाव कशाला. ते काम वरच्याचंच आहे. यावर चर्चाच नको राव. मुद्दा भरकटत आहे. तर मी म्हणत होतो, भाषण उत्तम झालं सगळ्याचं मराठी भाषा गौरव दिना दिवशी. माझं कसं वाटलं?
संताजी : एकदम ओके. काय ते विचार, ऐट, काय तो मराठी बाणा, सगळंच ओके!
देवाजी : ते मी म्हणायला पाहिजे.
संताजी : उसनं घेतलं तुमच्याकडून असं समजा! अवसान हो. हा हा हाऽऽऽ
देवाजी : अवसान उसनं आणणे पण कोणालाही जमत नाही. बरं वाटलं पण. तुमचे शब्द आमच्या तोंडी कसे शोभणार म्हणा!
संताजी : मराठी आमची पण आहे.
देवाजी : मराठीचा मापदंड लावता आला असता, तर समजलं असतं नेमकं मराठी कोण चांगलं बोलतो.
संताजी : मग, राजा ने बाजा वाजवला. मी मराठी मी मराठी म्हणून त्याची मराठी भाषा झाली का? तसं नसतं. मापदंड लावायला खूप आले गेले. या मातीत जन्माला आला तो प्रत्येक जण मराठी आहे.
देवाजी : खरं आहे. जी टोचते ती मराठी नाही, जी समजून घेते, माणसांना जवळ आणते, सोबत राहायला शिकवते, सर्वधर्मसमभाव शिकवते ती मराठी! मराठी असल्याचा जयजयकार झालाच पाहिजे. ‘जय शिवराय, जय जिजाऊ!’ शेवटी त्यांचीच आपण लेकरं.