

तानाजी खोत
भारताच्या कायदेशीर आणि राजकीय पटलावर उमटलेले एक तेजस्वी; पण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेले नाव म्हणजे स्वराज कौशल. स्वराज यांच्या कारकिर्दीवर त्यांच्या पत्नी, दिवंगत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजकीय वलयाच्या पलीकडेदेखील उल्लेखनीय असा कर्तृत्वाचा ठसा होता. कौशल यांचे व्यक्तिमत्त्व तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विनयशीलता यांचा सुंदर संगम होते. समाजवादावर निष्ठा असल्याने त्यांच्या व्यक्तित्त्वात एक साधेपणा, शिस्त आणि संयम होता.
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणून मोठे यश मिळूनही ते आक्रमक युक्तिवादापासून दूर राहत असत. मतभेद असल्यास ते समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेत आणि नंतर अत्यंत नम्रपणे आपली बाजू मांडत. उच्चस्तरीय वर्तुळात प्रदीर्घ काळ राहूनदेखील त्यांची नाळ ग्रामीण संस्कृतीशी नेहमीच जुळलेली राहिली. त्यांना पंजाबी भाषेबद्दल विशेष प्रेम होते. ते उत्तम पंजाबी बोलत आणि प्रसिद्ध पंजाबी कवी शिव कुमार बटालवी यांचे ते मोठे चाहते होते. कौशल नागरी स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रसिद्ध बडोदा डायनामाईट प्रकरणात बचाव केला, जो तत्कालीन सत्ताधार्यांसमोर घेतलेला एक धाडसी पवित्रा ठरला, याचमुळे ते देशभर चर्चेत आले.
ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका हे कौशल यांच्या कारकिर्दीतील सुवर्णपान आहे. त्यांनी भूमिगत मिझो नॅशनल फ्रंटचे घटनात्मक सल्लागार म्हणून काम पाहिले आणि 1979 मध्ये मिझो नेते लालडेंगा यांची सुटका करण्यात यश मिळवले. त्यांनी 1986 च्या ऐतिहासिक मिझो कराराचा मसुदा तयार करण्यास मदत केली. या घटनेमुळे इशान्येकडील राज्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसक बंडखोरीला पूर्णविराम मिळाला व या राज्यांमध्ये दीर्घकाळ टिकणारी स्थिरता आली. ईशान्येकडील त्यांच्या या विशेष ज्ञानामुळे 1987 मध्ये त्यांची मिझोरामचे पहिले महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात कौशल अवघे 35 वर्षांचे होते.
1986 मध्ये केवळ 34 वर्षांच्या वयात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता दिली. 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी मिझोरामचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि ते भारताचे सर्वात तरुण राज्यपाल ठरले. त्यांनी 1993 पर्यंत या पदावर काम केले. स्वराज कौशल यांचा जीवनप्रवास म्हणजे बुद्धिमत्ता, समर्पण आणि दुर्दम्य राष्ट्रनिष्ठा यांचा तेजस्वी अध्याय होता. मिझोराम शांतता कराराचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. त्यांच्या निधनाने केवळ कायदेशीर क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तिमत्त्वच गमावले नाही, तर ईशान्येकडील शांतता प्रक्रियेला मार्गदर्शन करणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभही ढासळला आहे. स्वराज कौशल यांचे कर्तृत्व आणि नम्रता यांचा वारसा भारतीय समाजजीवनात दीर्घकाल स्मरणात राहणार आहे.