

पौर्वात्य भारतीय ज्ञान परंपरा आणि पाश्चिमात्य शास्त्रीय ज्ञान यांचे सिम्बायोसिस म्हणजेच सहजीवन होईल, हे त्यांचे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सत्यात आणले आहे. विवेकानंद म्हणाले होते की, विसावे शतक हे पाश्चिमात्यांचे असेल; परंतु एकविसावे शतक हे भारताचे राहणार आहे. कारण, एकविसाव्या शतकात भारत हा विश्वगुरू होणार आहे. त्यांची ही भविष्यवाणी नरेंद्र मोदी यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे साध्य होताना दिसते आहे.
डॉ. शां. ब. मुजुमदार संस्थापक आणि अध्यक्ष, सिम्बायोसिस
मोदी हा धाडसी माणूस आहे. ‘धिटाई खाई मिठाई’ या उक्तीप्रमाणे ते निर्णय घेत असतात. कोणताही निर्णय ते बेधडकपणे घेत असतात. ‘मन की बात’ हा त्यांचा उपक्रम खूपच चांगला आहे. देशाचा एक पंतप्रधान भारतीय संस्कृती, शिक्षणावर बोलतो, देशातील खेड्यापाड्यात कोणकोणते चांगले प्रयोग झाले, याबद्दल बोलतो. त्यासाठी रेडिओचे माध्यम स्वीकारले, त्याला एक निराळा अर्थ आहे. मोदी एक पहिली व्यक्ती आहे की, ज्यांनी ‘मी भारतीय आहे, मी हिंदू आहे’ याचा अभिमान लोकांमध्ये जागृत केला.
परदेशात त्यांनी भारताचा नावलौकिक वाढवला. त्याचे कारण म्हणजे वक्तृत्व. स्वामी विवेकानंद यांच्या नंतरचा उत्तम वक्ता मोदीच आहेत. भारताबद्दलचे अनेक गैरसमज त्यांनी नाहीसे केले. जगात कुठेही गेले, तरी भारतीयांना सन्मान दिला जातो. भारतामध्ये भारतीयत्वाला पुनर्जीवित करणे आणि परदेशात भारतीयांबद्दल एक वेगळे स्थान निर्माण करणे असे दुहेरी प्रयोग त्यांनी केले. म्हणून मला असे वाटते, पौर्वात्यांचे शहाणपण आणि पाश्चिमात्यांची गतिशीलता यांचा आंतर्भाव अभ्यासक्रमात झाला, तर स्वामी विवेकानंदांचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
शिक्षण आणि संस्कृती ही एकत्र गेली पाहिजे. स्वामी विवेकानंदाचे स्वप्न साकारणारे मोदी आहेत. मन की बात, योगा, भारतीयांना सन्मान या उपक्रमांनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. लहान वयातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो आणि नंतर तो थांबतो त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करण्याचा काळ हा बालपणच आहे. त्यामुळे संबंधित राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आत्मा काय असावा, हे मोदी यांनीच सांगितले. यासाठी अमेरिका आणि भारतातील मानसशास्त्रज्ञांची एक समिती तयार करून पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला. मी गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे; पण मला त्यातला शिक्षणाविषयीचा भावलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.
मोदींची दूरद़ृष्टी ही त्यांची आंतर्द़ृष्टी आहे. त्यांच्या आंतप्रेरणेतूनच ते विविध कार्य करत आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ संख्यात्मक वाढ करण्यापेक्षा आहे त्या संस्थांमध्ये प्राध्यापक पदे रिक्त आहेत, ती भरणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित संस्थांमध्ये पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. संशोधनावर भर देत असताना शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याबरोबरच विज्ञान शाखेत अमूलाग्र बदलांची गरज आहे. या सर्वांचा विचार त्यांच्याकडून सुरू आहे. सिम्बायोसिसची स्थापना झाली दि. 26 जानेवारी 1971 रोजी. सुरुवातीच्या काळात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात आले. पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांना स्वतःचे घर मिळाले.
त्यावेळेस आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करायचो, ज्यामध्ये परदेशी आणि भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन अनेक कार्यक्रम सादर करत असत. कालांतराने फक्त सांस्कृतिक केंद्र ही संकल्पना मला फार संकुचित वाटू लागली. म्हणूनच सांस्कृतिक केंद्रासोबत शैक्षणिक संस्थेचासुद्धा विचार सुरू झाला. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे बंगलोर, नाशिक, नोएडा, हैदराबाद, नागपूर या ठिकाणी आम्ही केंद्रे स्थापन केली. 1976 ते 2021 दरम्यान संस्थेचे चांगल्या अर्थाने ब्रँडिंग झाले. संस्कृती आणि शिक्षण या दोन गोष्टींनी एकत्र वाटचाल करणे गरजेचे आहे. शिक्षणाविना संस्कृती आणि संस्कृतीविना शिक्षण यांना काहीच अर्थ नाही. म्हणूनच आम्ही हळूहळू लॉ कॉलेज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा एकेक संस्था नव्याने सुरू करत राहिलो. आता सिम्बायोसिसच्या जवळजवळ 30 ते 40 संस्था सुरू झालेल्या आहेत.
बघताबघता ही दमदार वाटचाल 2021 मध्ये संस्थेच्या पन्नासाव्या वर्षात येऊन ठेपली. 2020 मध्येच विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव साजरा होणं अपेक्षित होतं; परंतु कोरोनाचं संकट आलं आणि सगळंच ठप्प झालं. 2021 मध्ये कोरोनाचं संकट दूर झालं आणि 2022 मध्ये सुवर्णमहोत्सव करण्याचं आम्ही निश्चित केले. प्रमुख पाहुणे म्हणून कोण असावे, यावर सविस्तर चर्चा झाली आणि अर्थातच नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर होते. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले आणि त्यानंतर त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. भारतासह जगात त्यांचा एक दबदबा निर्माण झाला होता. देशाला नवीन द़ृष्टी देण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर भारताची प्रतिमा जगात उंचावली. आता एखादा भारतीय परदेशात गेला की, त्यालाही तिथे एक प्रकारचा आदर मिळतोच. त्यांनी भारताला आणि भारतीयांना एक वेगळी उंची मिळवून दिली. त्यामुळे त्यांना सिम्बायोसिसमध्ये सन्मानाने निमंत्रित करणं हे माझं स्वप्न होतं; परंतु राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान हे खासगी विद्यापीठांना सहसा भेट देत नाहीत; पण आपण निमंत्रण दिल्यानंतर ते येऊ शकतील, असा एक आशेचा किरण माझ्याकडे होता.
नरेंद मोदी हे स्वतः सिम्बायोसिसविषयी जाणून होते. 2009 मध्ये गुजरातमध्येसुद्धा सिम्बायोसिस विद्यापीठाची शाखा असावी असा त्यांचा मानस होता. म्हणून ते स्वतः भेट द्यायला आले होते. त्यामुळे सिम्बायोसिसबद्दल त्यांना तशी कल्पना होतीच. सिम्बायोसिस हे खासगी असले, तरीही त्या विद्यापीठास एक प्रतिष्ठा आणि नैतिकता आहे, याची त्यांना खात्री होती. उगाच पैसे देऊन प्रवेश दिला जाणे या गोष्टी इथे होत नसून इथून बाहेर पडणार्या विद्यार्थ्याला नोकरी मिळणारच, हेदेखील ठाऊक होते. अर्थात, हे सगळे असले, तरी ते येतील का, याबाबत मला शंकाच वाटत होती. आम्ही त्यांना पत्र पाठवलं आणि मग आम्हाला एक आश्चर्याचा आणि आनंदाचा सुखद धक्का बसला. पुण्यातील मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी येणार होते. मेट्रो उद्घाटनाची तारीख 6 मार्च 2022 अशी ठरलेली होती. त्याच दिवशी त्यांनी दुसरा कार्यक्रम सिम्बायोसिसचा स्वीकारला होता. या गोष्टीचा मला अत्यंतिक आनंद झाला.
सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हटल्यानंतर अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यापैकीच एक अभिनव कल्पना म्हणजे आरोग्यधाम. याअंतर्गत मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्याशी निगडीत असणार्या अनेक संस्थांचा समावेश आरोग्यधाममध्ये होत होता. तसेच इथे आजूबाजूच्या परिसरात असणार्या तब्बल 23 खेड्यांना सिम्बायोसिसने दत्तक घेतलेले आहे. त्या खेड्यांसाठी मेडिकल व्हॅन, डिजिटल लिटरसी व्हॅन आणि अनेक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असणार्या आरोगयधाम या नवीन विभागाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावे, असे ठरले. ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. समोरचा तब्बल सहा हजार लोकांचा मोठा समूह बघून भारावून गेले. सिम्बायोसिसचा मुख्य गाभा हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हाच आहे. आजच्या घडीला भारताकडे संपूर्ण जग हे विश्वगुरू म्हणून पाहू लागले आहे. विश्वगुरू बनायचे असल्यास भारतातील शिक्षण पद्धती, भारताची संस्कृती, भारतातील धर्म आणि त्यांची तत्त्वे, भारतातल्या रामायण आणि महाभारत, उपनिषदे यात जपलेले ज्ञान आणि शहाणपण याचा अंतर्भाव शिक्षणात झाला पाहिजे आणि तो झाला नाही, तर विवेकानंदांचं स्वप्न अपूर्णच राहील. ती ताकद सिम्बायोसिससारख्या अनेक विद्यापीठांमध्ये आहे असं मला वाटतं. जेव्हा ईस्टर्न विसडम आणि वेस्टर्न गतिशीलता यांचा संगम दिसेल, तेव्हाच विवेकानंदांचे भारत विश्वगुरू बनण्याचे स्वप्न साकार होताना दिसेल. हे स्वप्न केवळ पंतप्रधान मोदीच साकार करू शकतील, असा मला विश्वास आहे.
आमची आणखी एक इच्छा होती की आमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नरेंद्र मोदी आले होते, याची एक कायमस्वरुपी आठवण राहावी. त्यासाठी त्यांनी तिथे वृक्षारोपण करावे आणि तिथे त्यांच्या नावाचा फलक लावावा अशी ती कल्पना होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याची परवानगी नाकारण्यात आलेली होती. भेटीदरम्यान मी त्यांना पुन्हा ही वृक्षारोपण करण्याची विनंती केली आणि सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली असल्याचे सांगितले. त्यावर नरेंद्र मोदी यांनी कुठलेही आढेवेढे घेतले नाहीत आणि ते लगेच म्हणाले, चलो, करते है।“ त्यांनी अत्यंत प्रेमाने ते वृक्षारोपण केलं. ते झाड अजूनही आमच्या सिम्बायोसिसच्या आवारात आहे, आणि क्षणोक्षणी ते झाड आम्हाला मोदीजींची आठवण करून देत असते. एक संस्मरणीय प्रसंग म्हणून ही आठवण माझ्या मनात कायमची कोरली गेली.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली. परदेशातील विद्यापीठे भारतात आली. लाखो भारतीय परदेशात जाऊन शिकून आले; परंतु मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी भारतीय विद्यापीठांना परदेशात केंद्रे स्थापन करण्याची संधी दिली. तीन आयआयटी, यूएई तसेच आफ्रिकेत स्थापन झाल्या आहेत. खासगी विद्यापीठांमध्ये बीटस् पीलानी, सिम्बायोसिस, एसआरएम आदींनी त्यांचे केंद्र परदेशात स्थापन केले आहे.
सिम्बायोसिसच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या कारणास्तव भाषणानंतर त्यांना भेटायला काही निवडक मंडळीच गेली. त्यात मी, माझ्या मुली विद्या आणि स्वाती तसेच जावई, कुलगुरू असे अगदी मोजकेच लोक होतो. प्रत्यक्ष भेटीनंतर मोदी लगेच म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या मुलींची आणि जावयाची ओळख करून दिलीत; परंतु त्यांची मुलं कुठे आहेत. मी म्हणालो, ‘सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही त्यांना बोलावू शकलो नाही.’ त्यावर ते लगेच म्हणाले, ‘त्यांनासुद्धा बोलवा आणि मग माझी सहा नातवंडे, पणतू यांना बोलावण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सगळ्यांची त्यांनी भेट घेतली आणि आपुलकीने सर्वांना भेटले.