

उन्हाळी सुट्टी संपून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. अचानक आलेल्या मान्सूनमुळे उन्हाळा यावर्षी कमी काळच राहिला. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ असे म्हणत सैराट वेगाने घराकडे जाणारे विद्यार्थी आपण नेहमी पाहत असतो. शाळेमध्ये येताना जीवावर आल्यासारखे रखडत रखडत विद्यार्थी येत असतात. शाळेत येताना त्यांना उत्साह वाटावा म्हणून बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. विद्यार्थी पहिल्या दिवशी उत्साहात येतील आणि हा उत्साह शेवटपर्यंत टिकेल, अशी आपण आशा बाळगूयात.
शाळेला जाणे सर्वात जास्त जीवावर कुणाच्या येत असेल, तर ते लहान वयोगटातील मुलांच्या. सीनिअर केजी किंवा बालवाडी संपवून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करणारे विद्यार्थी सुट्टीच्या काळात शाळा सुरू होणार म्हणून अत्यंत उत्साहात असतात; पण जसजशी शाळा जवळ येते तसतसे त्याचे रडणे, अंग टाकणे, नखरे करणे सुरू होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोणाचेही नियंत्रण नसताना खूप खेळला, बागडलेला हा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शाळेच्या बंधनात अडकवून घेण्यास तयार नसतो. रडत भेकत जाणारी छोटी मुले आणि त्यांना टराटरा ओढत नेणारी त्यांची आई हे द़ृश्य पहिल्या दिवशी नेहमीचेच आहे. आपण सर्वजण या अवस्थेमधून गेलेलो असतो.
मंडळी, सुट्टीच्या काळात घरातील मुलांच्या गोंधळामुळे आणि पसारा करून ठेवायच्या प्रवृत्तीमुळे त्यांचे आई, बाप कधी एकदा शाळा सुरू होते, या प्रतीक्षेत असतात. एकदाचे त्याला शाळेत टाकले की, चार-सहा तास तरी निवांत असतात. कुटुंबीय आणि विशेषत: आई निवांत असते. तिला घरातील कामे करण्यास वेळ मिळतो.
सुरुवातीला शाळेत जाण्यास नकार देणारा शाळकरी मुलगा किंवा मुलगी पहिल्या दोन-तीन दिवसांत रुळतो आणि शाळेतील मित्र-मैत्रिणींबरोबर शाळेत जाण्यास उत्सुक असतो. शाळा हा प्रत्येक व्यक्तीच्या भावविश्वाचा न मिटणारा भाग आहे. तुम्ही आठवून पाहा. महाविद्यालयात तुम्हाला कोण शिक्षक शिकवायला होते, त्यांची नावे तुम्हाला आठवणार नाहीत; परंतु शाळेमध्ये तुम्हाला शिकवायला कोण होते, हे निश्चितच आठवेल. याच कारणामुळे शाळकरी मुलांचे पुढे उतारवयात असतानासुद्धा गेटटूगेदर होत असते. दहावी संपल्यानंतर प्रत्येक जण करिअरच्या दिशेने निघून जातो. प्रत्येकाची वाट वेगळी होते. वाटा वेगळ्या झाल्या असल्या आणि प्रत्यक्ष संपर्क नसला, तरीही शाळकरी मैत्री मनातून कधी जात नाही. सोशल मीडियामुळे गाठीभेटी सोप्या झाल्या आहेत. कधीकाळी शाळेत असलेले आणि आता पन्नाशी, साठी, पंच्याहत्तरीत असलेले वर्गमित्र एकत्र येतात आणि पुन्हा शाळेच्या जुन्या आठवणी जागवतात.