

डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्त्र अभ्यासक
देशात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे-तरुणांचे आत्महत्यासत्र चिंताजनक असून यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीवघेणी स्पर्धा आणि सामाजिक दबावामुळे काही मुले मरणाला कवटाळत आहेत, ही बाब मन विषण्ण करणारी आहे. यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची गरज आहे. मुलांचे बालपण हिरावून घेणार्या या स्पर्धेचा शेवट कोठेतरी करायला हवा.
काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईत शिकणार्या एका 22 वर्षीय रोहित सिन्हा नावाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. यापूर्वी आयआयटी खरगपूर आणि शारदा युनिव्हर्सिटीच्या या दोन विद्यार्थ्यांनीही जीव दिला. 2005 पासून 2024 या काळात आयआयटी शिकणार्या एकूण 110 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यापैकी 37 प्रकरणे 2019 पासून 2024 या काळात घडली. तरुणांचे आत्महत्यासत्र चिंताजनक असून यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीवघेणी स्पर्धा आणि सामाजिक दबावामुळे काही मुले बळी पडत असून यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची गरज आहे. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमनाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणार्या 17 वर्षीय नीट विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूबाबत निकाल देताना सामाजिक परिस्थितीवर गंभीर निरीक्षण नोंदविले.
न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारच्या घटना या व्यवस्थेतील अपयश असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर पडणारा ताण, अभ्यासाचे ओझे आणि संस्थेची असंवेदनशीलता पाहता त्यापासून बचाव करण्यासाठी संस्थात्मक उपाय करणे अत्यावश्यक झाले आहे. त्याचवेळी 24 मार्च 2025 रोजी न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश आर. महादेवन यांच्या पीठाने 2023 मध्ये आयआयटी दिल्लीत शिकणार्या दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाचा निकाल देतानाही या घटनांवर चिंता व्यक्त केली होती. खासगी शिक्षण संस्थांसह उच्च शिक्षण संस्थांत घडणार्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहता कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यांसंबंधी अडचणी दूर करण्यासाठी आणि आत्महत्येसारखा विचार त्यांच्या मनातून काढण्यासाठी सध्याची कायदेशीर आणि संस्थात्मक रचना अपुरी असून ती प्रभावहीन ठरत आहे.
न्यायालयाने म्हटल्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आहेत. यात एकतर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवता येऊ शकते किंवा संपूर्ण सामाजिक व्यवस्थाच एवढी बेडर झाली आहे की, ती तरुण पिढीला स्वत:चे अस्तित्व संपविण्यासाठी प्रवृत्त करत आहे. बहुतांशवेळा आत्महत्येमागचे कारण हे स्पर्धात्मक परीक्षेतील अपयश असल्याचे सांगितले जाते; मात्र हेच एकमेव कारण असेल, तर उच्च शिक्षण संस्थेत किंवा आयआयटीसारख्या संस्थेत अभ्यास करणारे विद्यार्थी गळफास का घेत आहेत? त्यांच्यावर अपयशी होण्याचा कोणताच दबाव नाही.
हा मुद्दा अर्थातच अपयशाचाच आहे; परंतु हे अपयश केवळ परीक्षेपुरतीच संबंधित नसून समाजव्यवस्थेतील अशी ही प्रक्रिया आहे की, पालक हे पाल्यांना असंवेदनशील होण्यास भाग पाडतात. नाते, मित्र, सामान्य स्थितीत जीवन जगण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणत त्यांना एखाद्या मशिनप्रमाणे काम करण्यास सांगतात. तेथे यशाचे स्वरूप म्हणजे सामाजिक निकषांनुसार निश्चित केलेल्या शिक्षण संस्थांत शिक्षण घेणे आणि काही विशिष्ट विषयांची निवड करत डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्रशासकीय पद मिळवण्याचे असते; पण या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रात मुलांनी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अपयशी ठरविले जाते आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते.