

तानाजी खोत
विज्ञानाच्या क्षितिजावर अढळ तारा म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग त्यांच्या मृत्यूनंतर आज एका अशा किळसवाण्या वादात ओढले गेले आहेत, ज्याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नुकत्याच सार्वजनिक झालेल्या ‘एपस्टीन फाईल्स’मधील काही संदर्भांमुळे त्यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवले जात आहेत; मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सखोल विचार केला, तर हे लक्षात येते की, ही एका शास्त्रज्ञाची बदनामी नसून, एका धूर्त गुन्हेगाराने रचलेल्या सापळ्याची आणि मानवी स्वभावातील विकृतीची ही कहाणी आहे.
ही घटना 2006 मधील एका वैज्ञानिक परिषदेपासून सुरू होते. जेफ्री एपस्टीनने स्वतःला विज्ञानाचा मोठा त्राता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी हॉकिंग यांच्या नावाचा वापर करायचे ठरवले. अशी मोठी नावे आपल्या नेटवर्कमध्ये सामील करून जगात उच्चपदस्थ वर्तुळात स्वतःचा वावर वाढवण्याचा त्याचा डाव होता. हॉकिंग यांच्या कामामुळे त्यांच्या नावाभोवती असलेले जागतिक वलय आणि त्यांची कायमची खुर्चीला खिळलेली शारीरिक स्थिती यामुळे एपस्टिनला ते सॉफ्ट टार्गेट वाटले असणार.
हॉकिंग यांना आकर्षित करण्यासाठी एपस्टीनने त्यांची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन, त्यांना समुद्राच्या तळाचे निरीक्षण करता यावे, यासाठी एका पाणबुडीमध्ये विशेष तांत्रिक बदल करून घेतले. विज्ञानाची ओढ असलेल्या हॉकिंग यांना वाटले असेल की, हा माणूस विज्ञानाची किती निःस्वार्थ सेवा करत आहे; पण प्रत्यक्षात एपस्टीनला त्याच्या महानतेचा उपयोग स्वतःची पापे झाकण्यासाठी एका ‘ढाली’सारखा करायचा होता. नुकत्याच बाहेर आलेल्या फाईल्समध्ये एका ई-मेलचा उल्लेख आहे, जिथे एपस्टीनने हॉकिंग यांच्याबद्दलच्या अफवा खोट्या ठरवण्यासाठी बक्षीस देण्याचे सुचवले होते. त्या अफवा इतक्या विकृत होत्या की, ज्या माणसाला स्वतःची मानदेखील फिरवता येत नव्हती, त्यांना एका लैंगिक शोषणाच्या घटनेचे साक्षीदार म्हणून रंगवण्यात आले. ज्यांना साध्या हालचालीसाठीही तंत्रज्ञानाची मदत लागायची, त्यांच्यावर असे गंभीर आरोप लावणे हीच मुळात एक मोठी वैचारिक विकृती आहे. तर्काने आणि उपलब्ध पुराव्याने स्टीफन हॉकिंग यांचा या कृत्यांमध्ये 1 टक्कादेखील सहभाग असल्याचे मानता येत नाही.
परंतु, या प्रकरणातील सर्वात जघन्य अपराध म्हणजे हॉकिंग यांचे नाव या फाईल्समध्ये आल्याचा गैरफायदा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांचे आक्षेपार्ह फोटो तयार करण्यात आले. सोशल मीडियाच्या भडिमारात सत्य-असत्य तपासण्याची तसदी न घेता हे फोटो जगभर व्हायरल केले गेले. एखाद्या मृत पावेतो हतबल असलेल्या महामानवाच्या स्मृतीची ही विटंबना आहे. आलेला कंटेंट कोणतीही शहानिशा न करता पुढे पाठवण्याच्या प्रवृत्तीमुळे विवेकाचा अंत झाला असून हॉकिंग या प्रवृत्तीला बळी पडले. ते आज स्वतःची बाजू मांडायला हयात नाहीत. 2018 मध्ये त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगाने हळहळ व्यक्त केली होती. आता त्यांच्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणे हा कृतघ्नपणा ठरेल. हॉकिंग एका धूर्त फिक्सरने रचलेल्या बौद्धिक मार्केटिंगचे बळी ठरले आहेत. त्यांची महानता त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये आहे, कुठल्या गुन्हेगाराच्या मार्केटिंगच्या सापळ्यामुळे तिच्यावर ओरखडादेखील उमटणार नाही.