अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी फिरकीपटू नीतू डेव्हिडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामील केले. अशा प्रकारचा सन्मान मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. नीतूने गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली असून आजपर्यंत जगातील कोणत्याही महिला क्रिकेटपटूला तिचा विक्रम मोडता आलेला नाही. केवळ क्रिकेटच नाही, तर कोणतेही क्रीडा क्षेत्र असो, त्यात महिलांनी यशाची पायाभरणी केली आहे.
जिल्हा पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सर्व प्रकारच्या स्पर्धांत महिलांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांना चांगली सुविधा मिळाली आणि सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला, तर त्या प्रत्येक सामना जिंकू शकतात, हे सिद्ध केले; मात्र देशातील बहुसंख्य ग्रामीण भागात आजही मुलींना खेळण्याची सुविधा मिळत नाही आणि सरावासाठी मैदान मिळत नाही. त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळत नाही आणि त्या सक्षम असूनही स्पर्धेपासून वंचित राहताना दिसतात. असेच एक गाव, करणीसर असे त्याचे नाव असून ते राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील लुणकरणसर ब्लॉकपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील मुली खेळण्यात प्रवीण आहेत; पण पुढे जाण्यासाठी त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यासंदर्भात गावातील 22 वर्षीय ममता म्हणते, मला क्रीडा स्पर्धांत सहभागी होण्याची आवड आहे. मी शालेय पातळीवरच्या खो-खो स्पर्धा खेळायचे. जिल्हा पातळीवरही खेळले आहे. शाळेसाठी रौप्यपदकही जिंकले आहे; पण महाविद्यालयीन पातळीवर संधी मिळाली नाही. कारण, सरावाची सुविधा नव्हती. गावात खेळण्यासाठी कोणतेही चांगले मैदान नाही. त्यामुळे सराव करता येत नाही.
खेळ हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. यात शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासोबतच शिस्त आणि सांघिक भावनेला चालना मिळते; मात्र यातील मुलींचा सहभाग आणि त्यांना मिळणारी संधी पाहिली, तर त्याचे प्रमाण खूपच कमी दिसून येते. त्यांना अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अर्थात, गेल्या काही दशकांत क्रीडा स्पर्धांत सहभागी होणार्या मुलींची संख्या वाढली आहे, तरीही अजूनही त्यांच्यासमोर अडचणी असून त्यामुळे या क्षेत्रात त्यांचा शंभर टक्के सहभाग दिसत नाही. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे मुलींबाबत समाजाची असणारी संकुचित विचारसरणी. पारंपरिक रूपाने पित्तृसत्ताक समाज हा क्रीडा प्रकार हा पुरुषांचाच मानतात आणि मुलींना शारीरिकद़ृष्ट्या सक्षम नसल्याचे समजत यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी त्यांचे मानसिक धैर्य तोडण्याचे काम केले जाते. त्याचवेळी करणीसरसारख्या गावांत सुविधा नसली, तर अडथळ्यांत आणखीच भर पडते.
आपल्या देशात ग्रामीण भागातील मुलींना कौटुंबिक कामातच अडकवून ठेवले जाते. कधी कधी त्यांना शिक्षणापासूनचही वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी त्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा पर्याय मिळतोच असे नाही. परिणामी, मुली आपले खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही; मात्र त्यांना संधी मिळाली, तर ते ग्रामीण भागातील चित्र बदलू शकतात. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक महिला खेळाडूंनी पदक जिंकले असून त्यांनी एकप्रकारे देशातील मुलींना प्रोत्साहित केले आहे. मुलींना संधी मिळाली, तर देशाच्या नावावर पदक जिंकू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. अनेक कुटुंबे आता आपल्या मुलींना खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत; मात्र यासाठी सराव आवश्यक असून ते मैदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यावर्षी तामिळनाडूत झालेल्या सहाव्या ‘खेलो इंडिया’ यूथ गेम्समध्ये राजस्थानच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत चांगली कामगिरी करत राज्याला ‘टॉप फाईव्ह’मध्ये स्थान मिळवून दिले. यात मुलांसमवेत मुलींनीही दमदार कामगिरी केली आणि राज्याच्या नावावर सुवर्णपदक कमावले. मुलींना संधी दिली, तर त्या गाव, जिल्हा अणि राज्याचे नाव उंचावू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.