South Asia Pollution | प्रदूषणाच्या विळख्यात दक्षिण आशिया

South Asia Pollution |
South Asia Pollution | प्रदूषणाच्या विळख्यात दक्षिण आशिया
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि निसर्गाच्या अविरत र्‍हासामुळे दक्षिण आशियातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली असून, याचे अत्यंत भयावह परिणाम मानवी जीवनासमोर उभे ठाकले आहेत. स्वित्झर्लंडमधील ‘आयक्यू एअर’ या प्रतिष्ठित संस्थेने नुकताच ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025’ प्रसिद्ध केला. या अहवालाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या ताज्या आकडेवारीनुसार, शेजारील देश पाकिस्तान हा सरासरी 67.3 झच2.5 पातळीसह जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला असून, त्यापाठोपाठ बांगला देश (66.1), ताजिकिस्तान (57.3), चाड (53.6) आणि काँगो (50.2) या देशांचा क्रमांक लागतो. भारताचा या यादीत सहावा क्रमांक असून येथील प्रदूषणाची पातळी 48.9 नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उझबेकिस्तान, नेपाळ, इजिप्त आणि किरगिझस्तान हे देश जगातील टॉप 10 प्रदूषित देशांच्या यादीत समाविष्ट आहेत. हा अहवाल मानवी अस्तित्वासाठी एक धोक्याची घंटा आहे.

हवेच्या गुणवत्तेचा विचार करता शहरांची स्थितीही चिंताजनक आहे. जगातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानमधील शहरांचा भरणा अधिक आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील लोणी हे शहर जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर पाकिस्तानमधील लाहोर, भारतातील दिल्ली, मुरथल, फैजाबाद, तसेच पाकिस्तानमधील पेशावर आणि रावळपिंडी या शहरांचा समावेश होतो. या शहरांमध्ये हवेतील घातक कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा 10 ते 15 पटींनी जास्त आहे. दक्षिण आशियातील या प्रदूषणामागे भौगोलिक कारणांसोबतच मानवनिर्मित चुकांचा मोठा वाटा आहे.

जुन्या वाहनांचा अनिर्बंध वापर, निकृष्ट दर्जाच्या इंधनाचे ज्वलन, सिमेंट कारखाने आणि विटांच्या भट्ट्यांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण वाढले. पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर शहरांमधील हवेत मिसळतो, ज्यामुळे श्वसनाचे विकार बळावत आहेत. हवेतील हे अतिसूक्ष्म कण इतके धोकादायक असतात की, ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत; मात्र श्वासावाटे ते थेट फुफ्फुसात आणि तिथून रक्त प्रवाहात मिसळून शरीराच्या सर्व अवयवांना नुकसान पोहोचवतात. यामुळे केवळ खोकला किंवा दमा यांसारखे आजारच नव्हे, तर हृदयविकार, स्ट्रोक आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांसारख्या जीवघेण्या व्याधींचे प्रमाण वाढले आहे.

प्रदूषणाची ही पातळी अशीच कायम राहिली, तर या भागातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 5 ते 8 वर्षांनी कमी होऊ शकते. लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या वाढीवर याचे कायमस्वरूपी वाईट परिणाम होत असून, गर्भवती महिलांसाठी ही हवा अत्यंत घातक ठरत आहे. स्थानिक पातळीवर प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर धोरणांची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, उद्योगांसाठी कडक नियम आणि वृक्षारोपण हेच या महाभयानक प्रदूषणावर उपाय उरले आहेत. आताच जागे झालो नाही, तर शुद्ध हवेचा श्वास घेणे हे येणार्‍या पिढीसाठी सर्वात मोठे आव्हान असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news