

पंतप्रधान नरेंद्र मोदी (अध्यक्ष, श्री सोमनाथ ट्रस्ट)
सोमनाथ हे केवळ एक मंदिर नाही, तर भारताच्या अखंड सांस्कृतिक चेतनेचे आणि पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. विध्वंसातून सृजनाकडे झालेल्या या प्रवासाचा साक्षीदार होताना इतिहास, श्रद्धा आणि राष्ट्रभावनेचा अद्वितीय संगम अनुभवण्याची ही प्रेरणादायी संधी आहे.
2026 या वर्षाच्या सुरुवातीला, मी सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्यासाठी सोमनाथ येथे गेलो होतो. सोमनाथच्या मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याचे स्मरण म्हणून हे पर्व आयोजित केले होते. 11 मे रोजी मी पुन्हा सोमनाथला जाणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथच्या पुनरुज्जीवित मंदिराचे उद्घाटन केले होते, त्या घटनेला 75 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने तिथे उत्सव होणार आहे. अगदी सहा महिन्यांत सोमनाथ मंदिराशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले.
सोमनाथसमोरचा विशाल सागर कालातीत आहे, त्याच्या लाटा आपल्याला सांगतात... वादळे कितीही भयंकर असू देत, लाटा कितीही उंच उसळू दे, आपण त्यातूनही पुन्हा उभे राहू शकतो, सन्मानाने आणि ताकदीने! कितीही संकटे आली तरी लाटा किनार्यापर्यंत पोहोचतात, अगदी तसेच. जनतेतील चैतन्य आणि विश्वास पिढ्या गेल्या तरी तसाच कायम राहतो. त्याला फार काळ दाबून ठेवता येत नाही. प्राचीन ग्रंथात सांगितले आहे, ‘प्रभासं च परिक्रम्य पृथिवीक्रमसंभवम्’. याचा अर्थ या पवित्र प्रभासाची (सोमनाथ) प्रदक्षिणा संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याइतकी पवित्र आहे! भाविक येथे प्रार्थना आणि दर्शनासाठी येत असले, तरीही त्यांनी येथे एका संस्कृतीच्या कधीही न विझलेल्या ज्योतीचा अनुभव घेतला आहे, त्याची शाश्वतता त्यांनी अनुभवली आहे.
असे म्हटले जाते की, राजा भोजनेदेखील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली. कर्णदेव आणि सिद्धराजा जयसिंह यांनीही गुजरातची राजकीय आणि सांस्कृतिक ताकद पुरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. भाव बृहस्पति, कुमारपाल, सोळंकी आणि पशुपात आचार्य यांनी या पवित्र स्थळाची पुनर्बांधणी करून तिथे पूजाअर्चना आणि शिक्षणाचे मोठे केंद्र उभारले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक आणि आध्यात्मिक परंपरांचे संरक्षण केले. महिपालदेव आणि रा खंगार यांनी विध्वंसानंतर पुन्हा उपासना सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या ज्यांची 300वी जयंती साजरी केली जात आहे, त्या अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल काळातही भक्तीची परंपरा अखंड ठेवली. बडोद्याचे गायकवाड यांनी यात्रेकरूंच्या हक्कांचे संरक्षण केले आणि अर्थातच आपल्या भूमीने हमीरजी गोहिल आणि वेगदाजी भिल्ल यांसारख्या शूर व्यक्तिमत्त्वांना जन्म दिला, ज्यांचे बलिदान आणि शौर्य आजही सोमनाथच्या जिवंत स्मृतीचा भाग बनले आहे.
सरदार पटेल यांना एक गोष्ट मनापासून अस्वस्थ करत होती, ती म्हणजे सोमनाथ मंदिराची दुरवस्था. एकदा दिवाळीत 13 नोव्हेंबर 1947 रोजी ते मंदिराच्या भग्न अवशेषांजवळ उभे राहिले आणि हाताच्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेऊन म्हणाले की, या नववर्षाच्या (गुजराती) शुभदिनी आम्ही सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली जावी असा संकल्प केला आहे. तुम्ही सौराष्ट्रातील जनतेने, यासाठी जे शक्य आहे ते केले पाहिजे. हे एक पवित्र कार्य असून, यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. सरदार पटेल यांच्या त्या एका आवाहनाला केवळ गुजरातच नाही, तर संपूर्ण भारतातील जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. दुर्दैवाने, नियतीने मात्र सरदार पटेल यांना, त्यांनी अत्यंत तळमळीने जोपासलेले हे स्वप्न पूर्ण होताना पाहण्याची संधी दिली नाही. जीर्णोद्धार झालेल्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यापूर्वीच ते हे जग सोडून निघून गेले होते. असे असले तरी, प्रभास पाटणच्या त्या पवित्र किनार्यावर त्यांचा प्रभाव सातत्याने जाणवत राहिला. के. एम. मुंशी यांनी सरदार पटेलांचा हा संकल्प पुढे नेला, या कार्यात त्यांना नवानगरच्या जामसाहेबांनीही मोलाची साथ दिली.
1951 मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांचा तीव्र विरोध असतानाही राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद या सोहळ्याला उपस्थित राहिले. डॉ. राजेंद्र प्रसाद भाषणात म्हणाले होते की, ज्या गोष्टीवर अढळ श्रद्धा आणि प्रेम असते, ती कधीही नष्ट होऊ शकत नाही, हाच संदेश सोमनाथ मंदिर अवघ्या जगाला देत आहे. हे मंदिर सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील, अशी कामनाही त्यांनी व्यक्त केली होती. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे सरदार पटेल यांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती आहे. पण आता तीच भावना पुढे नेत असताना आपण लोकांच्या जीवनात समृद्धी आणणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
सोमनाथपासून काशीपर्यंत, कामाख्यापासून केदारनाथपर्यंत, अयोध्येपासून उज्जैनपर्यंत आणि त्र्यंबकेश्वरपासून श्रीशैलमपर्यंत, आमच्या चमूला आपल्या आध्यात्मिक केंद्रांचे पारंपारिक स्वरूप टिकवून ठेवत त्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो. संपर्कव्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नांमुळे अधिक लोकांना या केंद्रांना भेट देणे शक्य होत आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, उपजीविकेचे पर्याय सुनिश्चित होतात आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना अधिक दृढ होते. सोमनाथच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांनी त्याची वारंवार उभारणी केली, त्यांच्या संघर्षाचे आणि बलिदानाचे कधीही विस्मरण होणार नाही.
भारताच्या विविध कानाकोपर्यांतील असंख्य व्यक्तींनी सोमनाथचे वैभव परत मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. एक हजार वर्षांच्या असाधारण शौर्याचे स्मरण म्हणून सोमनाथमध्ये पुढील एक हजार दिवस विशेष पूजा आयोजित केली जाईल. अनेक लोक या पूजेसाठी देणगी देत आहेत, हे पाहून आनंद होतो. या विशेष काळात सोमनाथला भेट देण्याचे मी देशबांधवांना आवाहन करतो. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनार्यावर उभे राहाल, तेव्हा तेथील प्राचीन प्रतिध्वनींना तुमच्याशी संवाद साधू द्या. तिथे तुम्ही केवळ भक्तीने भारावून जाणार नाही, तर कधीही न ओसरणार्या, अभेद्य आणि अढळ अशा सांस्कृतिक चेतनेची प्रबळ स्पंदनेही अनुभवाल. तुम्हाला भारताच्या अजिंक्य वृत्तीचा अनुभव येईल आणि अनेक प्रयत्न होऊनही आपली संस्कृती अपराजित का राहिली, हे उमजेल. तसेच तुम्हाला शाश्वत विजयाचे दर्शन घडण्याची संधी मिळेल. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असेल. जय सोमनाथ.