Goa Sex scandal Case| सेक्स स्कँडलमुळे गालबोट

Goa Sex scandal Case|
Goa Sex scandal Case| सेक्स स्कँडलमुळे गालबोटFile Photo
Published on
Updated on

मयुरेश वाटवे, गोवा वार्तापत्र

गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहायला कोट्यवधी पर्यटक वर्षभरात येत असतात. या लाडक्या पर्यटन स्थळाला ग्रासणारा एक भेसूर चेहरा दक्षिण गोव्यातील सेक्स स्कँडलने उघड केला आहे. दै. ‘पुढारी’मुळे या प्रकरणाला वाचा फुटली. संशयिताला अटकही झाली.

महाराष्ट्रातील अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच गोव्यात एक सेक्स स्कँडल दै. ‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मीडियालाही घ्यावी लागली. दक्षिण गोव्यातील कुडचडे काकोडा पालिकेतील नगरसेवकाच्या पुत्राला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सोहम नाईक नावाच्या या युवकाने अनेक अल्पवयीन मुली व महिलांवर लैंगिक अत्याचार करून, त्यांचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आपली ‘मर्दुमकी’ गाजवून स्वस्थ न बसता ती आपल्या मित्रांना दाखवत बढाई मारण्याच्या सवयीमुळे तो अडकला. बारा ते सतरा वयोगटातील मुलींशी मैत्री करून नंतर त्यांच्यावर तो लैंगिक अत्याचार करायचा, असा आरोप आहे. काही मुलींच्या नकळत त्याने त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करून ठेवले. ज्या मुलींनी पुन्हा येण्यास नकार दिला, त्यांना हे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दोन सख्ख्या बहिणींसह 16 हून अधिक मुलींचे 52 व्हिडीओ त्याच्याकडे असल्याचा आरोप आहे.

हे प्रकरण उघडकीस येताच मानभावीपणे कुडचडे काकोडा पालिकेतील नगरसेवकांनी कुडचडे पोलिस ठाण्यावर धाव देऊन या प्रकरणात अडकलेल्यांना अटक करावी, अशी मागणी केली. वास्तविक दै. ‘पुढारी’ने कुशावती जिल्ह्याचा उल्लेख केला होता. कुठेही कुडचडे काकोडा पालिकेचा उल्लेख नव्हता. पण जिल्ह्यातील चारपैकी केवळ या एकाच नगरपालिका सदस्यांना मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. याचा अर्थ हे प्रकरण त्यांना अगोदरच माहीत असावे. सोहमचे वडीलही ‘अटक करा’ या मागणीत आघाडीवर होते. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नसल्याने काहीच करता येणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र हजारभर लोकांचा जमाव रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यावर जमला आणि त्यांनी पोलिसांना 48 तासांत संशयिताला अटक न झाल्यास ‘कुडचडे बंद’चा इशारा दिला. अखेर त्या नगरसेवकपुत्राला अटक झाली. मात्र तरीही पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत जामीनपात्र किरकोळ कलमे लावली. या प्रकरणातील बहुतेक मुली या अल्पवयीन असल्याने पोक्सो आणि बाल हक्क कायद्यांतर्गत कलमे दाखल व्हायला हवी होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्यासह एका शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यावर धडक दिल्यावर पोलिस नरमले व पोक्सो व बाल हक्क कायद्यांतर्गत कलमे लावण्यात आली.

या प्रकरणात सोहम नाईक याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली असतानाच कुशावती जिल्ह्यातील आणखी एक प्रकरण दै. ‘पुढारी’नेच उघडकीस आणले. या जिल्ह्यातील एका उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य भरवर्गात मुलींच्या गळ्यातील ओळखपत्रे तपासण्याच्या निमित्ताने त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करत असल्याच्या तक्रारी आहेत. मुलींनाच नव्हे तर मुलांनाही वर्गात उभे करून त्यांनाही अयोग्यरीत्या स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. दै. ‘पुढारी’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यावर हा प्राचार्य आपल्या हस्तकांकरवी त्यांना बारावीच्या परीक्षेला बसू देणार नसल्याची धमकी देत आहे. असेच एक प्रकरण सासष्टी तालुक्यात घडले होते. एका विद्यार्थिनीने आपली मासिक पाळी सुरू आहे याची कल्पना देऊनही शिक्षिकेने त्या मुलीला मैदानाला फेरी मारायला व कष्टाची कामे करायला लावली. तिने तक्रार करताच समुपदेशनाच्या नावाखाली तिला धमकावण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

गोव्यातील ही प्रकरणे शैक्षणिक संस्थांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणि सामाजिक अध:पतनाचा इशारा देणारी आहेत आणि त्यावरील राज्य सरकारचे मौन अधिकच गंभीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news