Smart wallet technology | खिशातले वॉलेटही झाले स्मार्ट!

Smart wallet technology |
Smart wallet technology | खिशातले वॉलेटही झाले स्मार्ट!
Published on
Updated on

आशिष शिंदे

आपण कितीही काळजी घेतली तरी कधी ना कधी वॉलेट हरवण्याची किंवा घरीच विसरण्याची भीती प्रत्येकाला सतावत असते. पाकीट हरवणे म्हणजे केवळ पैशांचे नुकसान नाही, तर त्यातील महत्त्वाची कागदपत्रे आणि कार्डस् पुन्हा मिळवणे मोठे दिव्य असते. बाजारात सध्या बरेच वॉलेट ट्रॅकर उपलब्ध आहेत; मात्र आता गॅजेट वर्ल्डमध्ये एक हटके वॉलेट म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत खिशातील पाकीट आले आहे. हे केवळ ट्रॅकर नसून, एक संपूर्ण स्मार्ट मिनीवॉलेट आहे, जे दिसायला अत्यंत स्टायलिश आहेच; पण त्यासोबतच ते तुमच्या मोबाईलशी कनेक्ट राहून तुमचे पैसे, क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरक्षित ठेवते.

या पाकिटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात बसवलेली स्मार्ट ट्रॅकिंग चिप. अनेक ट्रॅकर्सचा आवाज कमी असल्याने ते शोधणे कठीण जाते; मात्र या पाकिटात 110 डेसिबल इतका तीव— आवाज देणारा स्पीकर बसवण्यात आला आहे. जर तुम्ही पाकीट घरीच कुठे ठेवून विसरलात, तर मोबाईल अ‍ॅपद्वारे कमांड देताच हे पाकीट मोठ्याने वाजू लागते. विशेष म्हणजे, यात रिव्हर्स ट्रॅकिंगची सोय आहे. म्हणजेच, जर तुमचा मोबाईल सापडत नसेल, तर पाकिटावरील बटण दोनदा दाबल्यास तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असतानाही जोरात वाजू लागेल.

या पाकिटाचे डिझाईन इतर पाकिटांच्या तुलनेत खूपच वेगळे आणि सोयीचे आहे. हे आकाराने अत्यंत छोटे असून, खिशात सहज मावते. यातील एका विशेष स्लाईडरमुळे बटण दाबताच सर्व कार्डस् पत्त्यांप्रमाणे वर येतात, ज्यामुळे तुम्हाला हवे ते कार्ड निवडणे सोपे जाते. यामध्ये 9 कार्डस् आणि रोकड ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. पर्यावरणाचा विचार करून हे पाकीट बनवताना 50 टक्क्यांहून अधिक ‘रिसायकल’ केलेल्या प्लास्टिकचा आणि उच्च दर्जाच्या लेदरचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ते अधिक काळ टिकते.

बॅटरीच्या बाबतीतही हे गॅजेट अत्यंत प्रगत आहे. एकदा चार्ज केल्यावर यातील ट्रॅकरची बॅटरी चक्क एक वर्षभर चालते. याला चार्ज करण्यासाठी कोणत्याही वायरची गरज नाही; तुम्ही कोणत्याही वायरलेस चार्जरवर हे पाकीट ठेवून ते चार्ज करू शकता. हे डिव्हाईस अ‍ॅपल आणि अँड्रॉईड या दोन्ही सिस्टीम्सवर उत्तम चालते. तसेच यात ‘डिजिटल चोरी’ रोखण्यासाठी विशेष कवच (आरएफआयडी प्रोटेक्शन) दिले आहे, ज्यामुळे कोणीही बाहेरून स्कॅनर लावून तुमच्या कार्डमधील माहिती चोरू शकणार नाही.

आता चर्चा करूया याच्या किमतीची. हे स्मार्ट मिनीवॉलेट आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 140 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 11 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. एका पाकिटासाठी ही किंमत थोडी जास्त वाटू शकते; पण त्यातील प्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षेचे फीचर्स पाहता, ज्यांना आपल्या मौल्यवान वस्तू जपण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली गुंतवणूक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news