

आशिष शिंदे
अंगावर रोमांच आणणारे ट्रेकिंग, निसर्गाच्या कुशीतील कॅम्पिंग आणि शहराच्या धकाधकीपासून दूर जाऊन शांततेत काम करणे, आजकालच्या डिजिटल नोमॅडस् आणि पर्यटकांना अशा भटकंतीचे भारी वेड! पण हिरव्यागार जंगलात किंवा डोंगराच्या कुशीत गेल्यावर मोबाईल, लॅपटॉप अथवा कॅमेऱ्याची बॅटरी संपली की, आनंदाचा पार विरस होतो. बाजारात पोर्टेबल सोलर पॅनल्स मिळतात खरे; पण आकाशात सूर्य जसजसा पुढे सरकतो, तसतशी या पॅनल्सची दिशा हाताने बदलावी लागते; अन्यथा चार्जिंगचा वेग मंदावून वेळ वाया जातो. या त्रासावर कायमचा पडदा पाडण्यासाठी आणि रिन्युएबल एनर्जीच्या दुनियेत नवा पायंडा पाडण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एक भन्नाट ‘पोर्टेबल सोलर जनरेटर’ अवतरला आहे. सूर्य जसजसा आकाशात प्रवास करेल, तसतशी स्वतःची दिशा आपोआप बदलण्याची अद्भुत जादू या गॅजेटमध्ये आहे!
या उपकरणाची सर्वात मोठी करामत म्हणजे यातील ‘ड्युअल ॲक्सिस जीपीएस’वर चालणारी स्वयंचलित सोलर ट्रॅकिंग सिस्टीम. हे गॅजेट उघड्या छताखाली किंवा बागेत ठेवताच, सूर्याची किरणे कुठे पडत आहेत याचा अचूक मागोवा घेऊन यातील सोलर पॅनल सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आपोआप सूर्याच्या दिशेने झुकते आणि फिरते. पारंपरिक किंवा एकाच जागी राहणाऱ्या सोलर पॅनल्सच्या तुलनेत, हे स्मार्ट तंत्रज्ञान तब्बल ४० टक्के जास्त वीज निर्माण करते. सूर्याचे एकेक किरण शोषून घेऊन बॅटरी वेगाने चार्ज करण्याचे कसब यात आहे. या गॅजेटचे डिझाईन वायरलेस आणि पोर्टेबल बनवले आहे. यात ३२ वॅटचे आकर्षक अष्टकोनी सोलर पॅनल असून, ते कोणत्याही वायरच्या कटकटीशिवाय केवळ चुंबकीय शक्तीने मुख्य मोटर आणि बॅटरीशी जोडले जाते. त्यामुळे अवघ्या एका मिनिटात हे उपकरण सेट करून वापरण्यासाठी सज्ज होते. लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी हे गॅजेट पूर्णपणे वॉटरप्रूफ आणि दणकट आहे. प्रवासाला निघताना यातील सुटे भाग वेगळे करून लहानशा बॅगेत सहज घेऊन जाता येतात.
उपकरणाच्या गोल आकाराच्या मुख्य मॉड्यूलमध्ये २७० वॅट प्रतितास क्षमतेची अवाढव्य बॅटरी दिली आहे. ज्यामुळे सूर्य मावळल्यानंतर रात्री तुमची गॅजेटस् सहज चार्ज होतात. यात १०० वॅटचे दोन यूएसबी सी फास्ट-चार्जिंग पोर्टस् आणि एक यूएसबी ए पोर्ट आहे. याच्या मदतीने लॅपटॉप, स्मार्टफोन, ड्रोन कॅमेरा, टॅबलेट आणि अगदी जंगलात सॅटेलाईट इंटरनेट पुरवणारे स्टारलिंक मिनीदेखील सहज चालवता येते. छोटा एलईडी इंडिकेटर बॅटरीची रिअल टाईम पातळी दाखवत राहतो.
स्मार्ट युगात या उपकरणाला मोबाईल ॲपचीही जोड दिली आहे. ॲपद्वारे सोलर पॅनल सध्या किती पॉवर तयार करत आहे, बॅटरी किती टक्के शिल्लक आहे आणि गॅजेटचे अचूक जीपीएस लोकेशन काय, यावर लांबूनही थेट नजर ठेवता येते. अचानक वीज गेलेल्या काळात, निसर्गाच्या कुशीत फिरताना किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हे गॅजेट एका अभेद्य डिजिटल पॉवर स्टेशनसारखे काम करते. सध्या या पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत ४९९ डॉलर्सच्या आसपास आहे. जी भारतीय चलनात अंदाजे ४७ हजार रुपयांच्या घरात जाते.