smart mirror health tech | 30 सेकंदांत आरोग्याची कुंडली मांडणारा स्मार्ट मिरर

smart mirror health tech |
smart mirror health tech | 30 सेकंदांत आरोग्याची कुंडली मांडणारा स्मार्ट मिरर
Published on
Updated on

आशिष शिंदे

रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय करतो? आरशात बघतो. चेहर्‍यावर सुरकुत्या आल्यात का, केस पांढरे झालेत का, हे आपण पाहतो. पण जर याच आरशाने तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि भविष्यातील आजारांची अचूक माहिती दिली तर? हे आता शक्य झाले आहे. गॅजेट वर्ल्डमध्ये आता एक असा भन्नाट स्मार्ट आरसा आला आहे, जो केवळ तुमचे रूप दाखवत नाही, तर तुमचे भविष्यकालीन आरोग्यही सांगतो. हा जादुई आरसा काही साधासुधा नाही. तुमच्या आरोग्याची स्थिती मोजण्यासाठी यात कोणतेही स्मार्टवॉच किंवा पट्टा शरीराला लावण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त या आरशासमोर उभे राहून फक्त 30 सेकंदांचा एक सेल्फी व्हिडीओ काढायचा आहे.

स्मार्ट मिररमध्ये ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग नावाचे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. हे तंत्रज्ञान तुमच्या चेहर्‍यावरील रक्ताभिसरणाचे विश्लेषण करते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अवघ्या अर्ध्या मिनिटात म्हणजे केवळ 30 सेकंदांत तुमच्या आरोग्याचा संपूर्ण रिपोर्ट तुमच्यासमोर ठेवते.

प्रामुख्याने तुमच्या दीर्घायुष्यावर लक्ष केंद्रित केले जाते. तो तुम्हाला 0 ते 100 या दरम्यान लॉन्जेव्हिटी इंडेक्स स्कोर देतो. यामध्ये हृदयविकाराचा धोका, चयापचय किंवा मेटाबॉलिक आरोग्य, हृदयाचे आरोग्य, तुमचे शारीरिक वय आणि मानसिक ताण या पाच महत्त्वाच्या गोष्टींची तपासणी केली जाते. कंपनीच्या दाव्यानुसार, हा एआय आरसा तुमच्या आरोग्यातील बदलांचा अभ्यास करून पुढील 20 वर्षांतील संभाव्य धोक्यांचा अचूक अंदाज वर्तवू शकतो. म्हणजे आजच्या तुमच्या जीवनशैलीचा भविष्यात तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, हे हा आरसा आधीच सांगतो. या आरशाची खासियत इथेच संपत नाही. यामध्ये एक एआय हेल्थ असिस्टंट इनबिल्ट आहे, जो तुम्हाला हा सर्व डेटा सोप्या भाषेत समजावून सांगतो. म्हणजे रिपोर्ट इतरांकडून समजावून घेण्याचाही मन:स्ताप नाही.

विशेष म्हणजे तुमची झोप, ताणतणाव आणि आहार यात काय छोटे बदल केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल, याचा सल्लाही तो देतो. एकाच घरातील सहा वेगवेगळे सदस्य स्वतःचे वेगवेगळे प्रोफाईल बनवून हा आरसा वापरू शकतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी हे एक उत्तम गॅजेट आहे. यासोबतच जर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला हवा असेल, तर वन टच हेल्थ कॉन्सिअर्जची सुविधाही यात दिलेली आहे. यात पुढील काळात आणखी सुधारणादेखील होत जातील. तूर्तास तरी हा स्मार्ट आरसा आरोग्यदायी ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंमत. हा स्मार्ट मिरर 899 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 75 हजार रुपयांना असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news