

आशिष शिंदे
स्वयंपाकघरात काम करताना सुरीला धार नसेल तर किती चिडचिड होते, हे आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवले असेल. एखादा पिकलेला टोमॅटो कापायला घ्यावा आणि तो कापण्याऐवजी पिचला जावा, किंवा पनीर कापताना ते सुरीलाच चिकटून बसावे या गोष्टी रोजच्या झाल्या आहेत. पण सध्याच्या गॅजेट वर्ल्डने या साध्या वाटणार्या समस्येवर एक भन्नाट उपाय समोर आला आहे. आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक टूथब्रश ऐकले होते, पण आता चक्क इलेक्ट्रिक सुरी आली आहे. हो, ऐकायला जरा विचित्र वाटेल; पण हे पूर्णपणे सत्य आहे. एक अशी स्मार्ट सुरी तयार झाली आहे, जी तुमच्या किचनमधील कटिंगचा अनुभवच बदलून टाकेल.
ही काही साधीसुधी सुरी नाही. दिसायला ही एखाद्या नेहमीच्या जपानी शेफ नाईफसारखीच दिसते. पण यात दडलेले तंत्रज्ञान थक्क करणारे आहे. या सुरीमध्ये अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजी वापरली आहे. म्हणजे नेमके काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर या सुरीच्या हँडलमध्ये एक बॅटरी आणि एक विशेष सिस्टीम आहे. यामुळे ही सुरी एका सेकंदाला तब्बल 30 हजार वेळा व्हायब्रेट (कंप पावते) होते. ही कंपने इतकी सूक्ष्म असतात की, ती डोळ्यांना दिसत नाहीत, पण काम मात्र जोरात करतात. यामुळे एखादी भाजी, कांदा कापण्यासाठी लागणारी तुमची ताकद 50 टक्क्यांनी कमी होते.
या सुरीचा अनुभव घेण्यासाठी जेव्हा ती हातात धरली जाते, तेव्हा तिचे बटण दाबल्यावर होणारी तिची हालचाल एखाद्या ‘एअर हॉकी टेबल’सारखी वाटते. आपण नेहमी सुरी वापरताना ती पदार्थावर दाबून कापतो (ज्याला गिलोटिन स्टाईल म्हणतात). पण या सुरीच्या मायक्रो व्हायब्रेशन्समुळे ती सुरी पदार्थातून अक्षरशः लोण्यासारखी सटकन आरपार जाते.
या सुरीची खरी गंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्ही टोमॅटो, मशरूम किंवा मऊ फळे कापता. जिथे साध्या सुरीने या गोष्टी पिचल्या जाण्याची भीती असते, तिथे ही अल्ट्रासोनिक सुरी त्यांना कोणताही आकार न बिघडवता अत्यंत सफाईदारपणे कापते. इतकेच नाही, तर बटाटे, पनीर किंवा मांस कापताना जे सुरीला चिकटून बसते, ते यातील व्हायब्रेशन्समुळे आपोआप खाली पडते. त्यामुळे कामाचा वेग वाढतो आणि कटकट कमी होते.
या सुरीला पॉवर देण्यासाठी हँडलमध्ये रिचार्जेबल बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यावर ती बराच काळ चालते. हँडलच्या खाली असलेल्या ट्रिगरने तुम्ही हे अल्ट्रासोनिक फिचर चालू किंवा बंद करू शकता. जेव्हा तुम्हाला साध्या सुरीसारखा वापर करायचा असेल, तेव्हा ती तशीही वापरता येते. अर्थात प्रत्येक गॅजेटला काही मर्यादा असतातच. ही सुरी म्हणजे काही ‘स्टार वॉर्स’ मधली ‘लाईटसेबर’ नाही की जी काहीही कापून काढेल. भोपळा किंवा कडक भाज्या कापताना तुम्हाला अजूनही जुन्या पद्धतीची ताकद लावावी लागेलच. या स्मार्ट सुरीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 33 ते 34 हजार रुपयांच्या घरात आहे.