Smart Hydroponics Garden | स्मार्ट हायड्रोपोनिक्स बाग

Smart Hydroponics Garden |
Smart Hydroponics Garden | स्मार्ट हायड्रोपोनिक्स बाग
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

सिमेंटच्या जंगलात उंच इमारतींच्या फ्लॅट संस्कृतीत रुळत चालल्याने माणसाचा निसर्गाशी प्रत्यक्ष संपर्क दिवसेंदिवस तुटत चालला आहे. बाजारातून मिळणाऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्यांवर मारलेली कीटकनाशके आरोग्यासाठी किती घातक आहेत हे ठाऊक असूनही, जागेचा अभाव आणि मातीचा पसारा सांभाळण्याच्या कटकटीमुळे स्वतःची बाग फुलवण्याचे स्वप्न अनेकांच्या मनातच कोमेजून जाते. यावर उपाय म्हणून शहरांमध्ये ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणजेच मातीविना केवळ पाण्याच्या आधारावर चालणाऱ्या अंतर्गत बागा (इनडोअर गार्डन) आल्या खऱ्या. परंतु बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश उपकरणांमध्ये एकाच पाण्याच्या टाकीवर सर्व प्रकारची झाडे अवलंबून असायची. प्रत्येक रोपाची पाण्याची आणि पोषणाची भूक वेगवेगळी असताना, सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे ही या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी उणीव होती. हीच अडचण ओळखून, स्वयंपाकघर आणि दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात एकाच वेळी विविध प्रकारची रोपे स्वतंत्रपणे फुलवणारी जगातील पहिली टू टिअर स्मार्ट हायड्रोपोनिक बाग आता ‘गॅजेट वर्ल्ड’ मध्ये दाखल झाली आहे.

झाडांना वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, जी घरात चार भिंतींच्या आत पूर्ण करणे कठीण असते. यासाठी या स्मार्ट बागेत प्रगत ‘फुल स्पेक्ट्रम एलईडी ग्रो लाईटस्‌’ बसवण्यात आल्या आहेत. ज्या रोपांना थेट सूर्यप्रकाशासारखीच ऊब आणि प्रकाश देतात. रोपांची उंची वाढेल तसा वरच्या रॅकवरील दिव्यांचा भाग १२ इंचांपासून थेट २२ इंचांपर्यंत वर सरकवता येतो. त्यामुळे बुटक्या पालेभाज्या असोत वा वर वाढणारे टोमॅटोचे वेल, प्रत्येकाला गरजेनुसार पुरेसा प्रकाश मिळतो. शिवाय, दोन्ही रॅकवरील दिव्यांची तीव्रता वेगवेगळी कमी जास्त करण्याची सुविधा असल्याने, रोपांच्या नैसर्गिक वाढीचा वेग चक्रावून टाकणारा ठरतो.

या उपकरणात माणसाच्या हस्तक्षेपाची गरज नगण्य ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची भक्कम जोड दिली आहे. उपकरणावरच आधुनिक टचस्क्रीन बसवला आहे. तो स्मार्टफोनमधील ॲपशी जोडलेला राहतो. झाडांना पाणी कधी द्यायचे, दिवा कधी सुरू करायचा आणि बंद कधी करायचा, हे सर्व वेळापत्रक स्क्रीनवरून एका बोटाच्या स्पर्शाने ठरवता येते. पाण्यातील विरघळलेल्या पोषक घटकांचे प्रमाण (ईसी लेव्हल) आणि पाण्याची पातळी सेन्सर्सद्वारे मोजून, खत कधी द्यायचे किंवा पाणी कधी भरायचे, याची अचूक सूचना हे उपकरण वापरकर्त्याला आधीच देते.

बाजारातील पारंपरिक इनडोअर बागांमध्ये वरच्या आणि खालच्या भागाला एकाच टाकीतून पोषण दिले जात असल्याने वेगवेगळ्या गरजांची झाडे एकत्र वाढवणे अशक्य होते. मात्र, या उपकरणात वरच्या आणि खालच्या दोन्ही मजल्यांसाठी प्रत्येकी ६ लिटर क्षमतेच्या दोन स्वतंत्र पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, वरच्या रॅकवर टोमॅटो किंवा शिमला मिरचीसारख्या फळभाज्यांना जास्त पोषकद्रव्यांची गरज असताना, खालच्या रॅकवर कोथिंबीर, पुदिना किंवा पालकसारख्या नाजूक पालेभाज्या कमी पोषणद्रव्यांवर स्वतंत्रपणे डोलू शकतात.

या स्मार्ट बागेचे डिझाइन भन्नाट आहे. धातू किंवा रुक्ष प्लास्टिकच्या डब्यांसारखे न दिसता, यासाठी नैसर्गिक बांबूच्या लाकडाची कलात्मक चौकट वापरली आहे. याला लहान चाके बसवल्यामुळे, स्वयंपाकघरातून हॉलमध्ये किंवा बाल्कनीत ही ३२ रोपांची हिरवीगार बाग एका हाताने सहज सरकवता येते. जागतिक बाजारपेठेत या स्मार्ट बागेची किंमत भारतीय चलनात अंदाजे २५ ते ३३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news