

आशिष शिंदे
प्रत्येकाचा आपल्या पाळीव प्राण्यांवर जीव असतो. त्यात मांजर म्हणजे जीव की प्राणच. नेमके कुठेतरी बाहेरगावी जायचे झाले की, पेट पॅरेंटस्समोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ‘माझ्या माऊच्या जेवणाचे काय?’ शिवाय घरात एकाहून अधिक पाळीव प्राणी असतील, तर त्यांची काळजी घेणे ही तारेवरची कसरत असते. विशेषतः जेवणाच्या वेळी! एका मांजरीचे अन्न दुसरी मांजर खाते किंवा मांजरीचे अन्न कुत्रा फस्त करतो, असा अनुभव प्राणीप्रेमींना नेहमीच येतो. एखाद्या प्राण्याला खास डायटवर ठेवले असेल, तर ही समस्या अधिकच वाढते. सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून कोण काय खाते हे पाहणे शक्य नसते. पण आता गॅजेट वर्ल्डमध्ये या समस्येवर एक अत्यंत भन्नाट आणि हटके उपाय आला आहे. जगातील पहिले एआय फेस रेकग्निशन असलेले स्मार्ट पेट फिडर तयार करण्यात आले आहे.
आतापर्यंत आपण मोबाईल किंवा लॅपटॉप अनलॉक करण्यासाठी फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरत आलो आहोत. पण आता हेच तंत्रज्ञान चक्क मांजरींसाठी वापरले जाणार आहे! या गॅजेटची सर्वात मोठी खासियत म्हणजे यासाठी तुमच्या मांजरीच्या गळ्यात कोणतीही स्मार्ट कॉलर किंवा मायक्रोचिप लावण्याची गरज नाही. यामध्ये एआय कॅमेरा बसवला आहे, जो 99.9 टक्के अचूकतेने तुमच्या मांजरीचा चेहरा ओळखतो. तुमच्या घरात जर 6 मांजरी असतील, तर ज्या मांजरीची जेवणाची वेळ आहे आणि जिचे ते अन्न आहे, तिलाच हे फिडर उघडून जेवण देईल.
या स्मार्ट फिडरचे डिझाईनही खूप विचारपूर्वक केले आहे. यामध्ये एक खास डोम कव्हर दिले आहे. ज्यामुळे एक मांजर जेवत असताना दुसरी मांजर किंवा कुत्रा आजूबाजूने किंवा मागून येऊन अन्न चोरू शकत नाही. शिवाय, मांजरींच्या नाजूक मिशांना (व्हिस्कर्स) त्रास होऊ नये म्हणून याचा स्टेनलेस स्टीलचा बाऊल एका विशिष्ट आकारात बनवला आहे. हे फिडर फक्त सुक्या अन्नासाठीच नाही, तर ओल्या अन्नासाठी सुद्धा वापरता येते. अन्न ताजे राहावे म्हणून यात एक आईस ट्रे देखील दिला आहे.
हे सगळे तुम्ही अॅपद्वारे कंट्रोल करू शकता. कोणत्या मांजरीने किती खाल्ले, कधी खाल्ले याचे संपूर्ण रेकॉर्ड तुम्हाला मोबाईलवर मिळतो. चुकून वाय-फाय बंद पडले, तरी यात ऑफलाईन लॉजिक आणि बॅकअप बॅटरी आहे, त्यामुळे तुमच्या लाडक्या प्राण्याची उपासमार होत नाही. घरात कॅमेरा असल्याने प्रायव्हसीचा प्रश्न येऊ शकतो, पण हा इन्फ्रारेड कॅमेरा फक्त 25 सेंमी अंतरावरून काम करतो आणि कोणताही डेटा इंटरनेटवर अपलोड न करता डिव्हाईसमध्येच प्रोसेस करतो. किंमतीचा विचार केल्यास हे स्मार्ट फिडर 2026 च्या दुसर्या तिमाहीत बाजारात येणार असून याची किंमत 259 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 21 ते 22 हजार रुपये असणार आहे.