

आशिष शिंदे
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री शांत आणि सुखाची झोप मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते; पण अनेकदा चुकीच्या उशीमुळे मान दुखणे, खांदे आखडणे किंवा घोरण्याचा त्रास सुरू होतो. यावर उपाय म्हणून अनेकजण गोळ्या किंवा सप्लिमेंटस्चा आधार घेतात. परंतु, आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये या समस्येवर एक अतिशय प्रगत आणि नैसर्गिक उपाय आला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने एक विशेष ‘स्मार्ट एअर पिलो’ तयार करण्यात आली असून, ती कोणत्याही औषधांशिवाय केवळ तुमच्या शरीराच्या स्थितीनुसार आकार बदलून तुम्हाला गाढ झोप घेण्यास मदत करते.
या वैशिष्ट्यपूर्ण उशीचे डिझाईन अत्यंत आधुनिक असून ते इन्फ्लेटिंग संकल्पनेवर काम करते. म्हणजेच, या उशीमधील हवेचे प्रमाण कमी-जास्त करून तुम्ही तुमच्या मानेला आणि खांद्याला हवा तसा कम्फर्ट देऊ शकता. प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. ही उशी तुमच्या गरजेनुसार स्वतःचा आकार आणि उंची बदलते, ज्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा वेगाने गाढ झोपेच्या अधीन होता. याशिवाय, ज्या लोकांना रात्री घोरण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही उशी वरदान ठरणार आहे. झोपेत हवेचा मार्ग मोकळा राहील अशा योग्य स्थितीत ही उशी तुमच्या शरीराला ठेवते, ज्यामुळे घोरण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.
या उशीमध्ये हवेचा दाब नियंत्रित करणारी अत्याधुनिक नळ्यांची प्रणाली असून ती बेडशेजारी ठेवलेल्या मुख्य कंट्रोल हबशी जोडलेली असते. जेव्हा यूजर गाढ झोपेत असतो, तेव्हा या हबमधील प्रगत सेन्सर्स यूजरच्या मानेची स्थिती आणि श्वासोच्छ्वासाचा वेग यावर बारीक लक्ष ठेवतात. जर यूजरने झोपताना कूस बदलली किंवा त्याची मान चुकीच्या कोनात वाकली, तर हे यंत्र कोणत्याही मानवी मदतीशिवाय अत्यंत शांतपणे उशीतील हवेचा दाब कमी-जास्त करून मानेला योग्य तो सपोर्ट देते.
या गॅजेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे ॲप कंट्रोल फीचर! मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही या उशीची उंची आणि मऊपणा अगदी बोटाच्या एका क्लिकवर नियंत्रित करू शकता. रात्रीच्या वेळी यामध्ये कोणताही बदल करताना किंवा हवा भरताना अजिबात आवाज होत नाही. ही उशी अत्यंत शांतपणे कार्य करते, ज्यामुळे तुमच्या किंवा तुमच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीच्या झोपेत कोणताही व्यत्यय येत नाही. आजकाल बाजारात येणाऱ्या इतर इलेक्ट्रॉनिक उशांच्या तुलनेत ही वापरण्यास अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने यात एक भन्नाट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या उशीच्या आत कोणतेही इलेक्ट्रॉनिक भाग, वायर्स किंवा बॅटरी बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे ती वापरताना शॉक लागण्याचा किंवा गरम होण्याचा कोणताही धोका नसतो. या उशीला नियंत्रित करणारे सर्व मेकॅनिझम एका लहान स्मार्ट स्लीप इंजिनमध्ये बंदिस्त असते, जे तुमच्या बेडशेजारील टेबलवर शांतपणे पडून राहते. उशीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नसल्यामुळे ती वापरण्यास सुरक्षित तर आहेच; शिवाय ती नेहमीच्या कपड्यांसारखी सहज धुतादेखील येते, जे स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे.
किंमतीचा विचार केला, तर गॅजेट वर्ल्डमध्ये नुकताच आलेला हा अनोखा आविष्कार आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १४९ ते १९९ डॉलर्सच्या दरम्यान उपलब्ध आहे, म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत अंदाजे १८ ते १९ हजार रुपयांच्या आसपास आहे.