

कोणत्याही निवडणुका झाल्या की, सर्वात पहिल्यांदा उत्सुकता असते ती म्हणजे किती टक्के मतदान झाले याची? मतदान जास्त झाले, तर परिवर्तनाची शक्यता सांगितली जाते आणि कमी झाले तर निरुत्साह होता, असा निष्कर्ष काढला जातो. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये या सर्वांपेक्षा हाणामारी कुठे कुठे झाली, याचीच जास्त चर्चा चालू आहे. बहुदा अशी नगरपरिषद एकही नाही जिच्या मतदानाच्या दिवशी शहरात कुठेही मारामारी झाली नाही.
गाव लहान आणि नेहमीचेच राजकारणी असल्यामुळे इथे सर्वच जण एकमेकांना ओळखत असतात. कोण चांगला, कोण वाईट, कोण बदमाश आणि कोण गुंड प्रवृत्तीचा हे सर्वांना माहीत असते. आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी वातावरण तापलेले असते. या तापलेल्या वातावरणामध्ये म्हणजेच गरमागरमीमध्ये मुद्द्याची गोष्ट बाजूला राहते आणि प्रकरण गुद्द्यावर येत असते. या निवडणुकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी अनेक आमदारांनीदेखील आपले कसब पणाला लावलेले दिसून आले. घोषणाबाजी करण्यामध्ये काही ठिकाणी आमदारही आघाडीवर होते. बाकी थोडी बाचाबाची, थोडी हातघाई, हमरातुमरी, काही प्रसंगी हाणामारी ही होतच असते. त्याचे काही आता कुतूहल राहिलेले नाही. राजकारण म्हटले की ईर्ष्या आलीच. त्यातूनच हे होत असते. अजून ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत. त्या एकदा आल्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये हाणामारी सुरू होणार आहे, हे उघड दिसत आहे. आपण सामान्य जनतेने या गदारोळात आपले टाळके शाबूत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवा वर्गाचा सहभाग फार मोठा असतो. युवा म्हणजे सळसळते चैतन्य असते. एखाद्या नेत्यामुळे भारावलेला एखादा युवक अत्यंत उत्कट मनोभावे कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. अशा कार्यकर्त्याला थोडेसे जरी उचकावले गेले, तर गरम डोके असल्यामुळे तो चक्क मारामारीवर उतरतो.
गेले आठ दिवस कोकणात विशेषत्वाने जोरदार धूमशान सुरू असल्याचे दिसून येत आहे. तुझा नेता मोठा की माझा नेता मोठा किंवा तू निवडून कसा येतो तेच बघतो, अशा पद्धतीची भाषा सर्रास वापरली जात आहे. जनता तिला वाटेल ते उमेदवार निवडून देईल; पण बाचाबाची, हमरीतुमरीसाठी ही निवडणूक कायम लक्षात राहील, हे निश्चित!