

युवराज इंगवले
वाचाल तर वाचाल या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून आपल्याकडे वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न गेला जात आहे. वाचनाने माणसाचे विचार समृद्ध तर होतातच; त्याच्यासोबत संतुलित आणि सर्वसमावेशकपणा अंगी बाणू शकतो हे तितकेच खरे! पण अलीकडील काही वर्षांत सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरात वाचन संस्कृती कमी होत चालल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. एखादे पुस्तक तरी वाचले आहे काय? असा प्रश्न आजच्या तरुण पिढीला विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच येईल, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
अशातच सिंगापूर सरकारने लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवण्यासाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना रोज किमान १५ मिनिटे पुस्तक अथवा एखादा दीर्घ लेख वाचावा लागेल. यासाठी दिलेला वेळ सरकारी संकेतस्थळावर नोंदवावा लागेल. त्याबदल्यात नागरिकांना रिवॉर्ड पॉईंटस् मिळतील.
ते पुढे रोख रकमेत रूपांतरित होतील. नॅशनल रीडिंग मिशन या पाच वर्षांच्या योजनेंतर्गत लोकांना स्मार्टफोन, सोशल मीडिया, रिल्स आणि लहान व्हिडीओंपासून काही काळ दूर ठेवून पुन्हा पुस्तक वाचनाची सवय लावण्याचा सिंगापूर सरकारचा हेतू आहे. आजच्या काळात लोकांचा स्क्रीन टाईम वाढत असून, त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर आणि वाचनाच्या सवयीवर होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. योजनेनुसार, रोज किमान १५ मिनिटे वाचन केल्यास नागरिकांना २० व्हर्च्युअल कॉईन्स मिळतील. मात्र, एका दिवसात केवळ एकदाच वाचनाचा वेळ नोंदवता येईल. एखाद्या व्यक्तीने सलग ५० दिवस रोज १५ मिनिटे वाचन केल्यास त्याच्या खात्यात एकूण १ हजार कॉईन्स जमा होतील. हे कॉईन्स १ सिंगापूर डॉलर, म्हणजे भारतीय चलनात अंदाजे ७६ रुपयांच्या रोख बक्षिसात बदलता येतील.
सिंगापूर सरकारने यावर्षी एकूण ७५ लाख वाचन-मिनिटांचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १.१४ कोटी रुपयांची बक्षिसांची तरतूद केली आहे. ही योजना सिंगापूरच्या नॅशनल लायब्ररी बोर्डाने सुरू केली असून नागरिक क्राऊड टास्क एसजी या संकेतस्थळावर रोज त्यांनी केलेल्या वाचनाची वेळ नोंदवू शकतील. लक्ष्य पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात त्यानुसार कॉईन्स जमा होत जातील. अशा प्रकारे सरकारने वाचनाला एका रिवॉर्ड सिस्टीमशी जोडले आहे.
वाढत्या स्क्रीन टाईममुळे मेंदूवर ताण येऊन त्याचा थेट परिणाम मानसिकतेवर होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहे. याउलट वाचनासाठी अधिक एकाग्रतेची गरज असते. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धत आणि कल्पनाशक्ती विकसित होण्यास मदत होऊ शकते. याचमुळे सिंगापूर सरकारने सुरुवातीला दररोज केवळ १५ मिनिटांचे वाचन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सिंगापूर सरकारची ही योजना बदलाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असून भारतातही अशी अनोखी योजना सुरुवात करायला हरकत नाही!