

सुनील हिंगणे, अध्यात्म अभ्यासक
दरवर्षी श्रावण महिन्यात नैसर्गिकरीत्या तयार होणार्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक अमरनाथ यात्रा करतात. ही यात्रा देशातील अन्य यात्रेच्या तुलनेत खडतर मानली जाते, तरीही धार्मिक श्रद्धेपोटी आणि पुण्य मिळवण्यासाठी भक्तांची दरवर्षी गर्दी उसळते. काहीवेळा दहशतवाद्यांचे सावट असले, तरी भाविक त्याची पर्वा न करता यात्रेत सहभागी होतात. यंदा पहलगाम हल्ल्यामुळे स्थिती संवेदनशील असल्याचे वाटत असतानाही भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
भारताची भूमी तीर्थक्षेत्रांनी व्यापलेली आहे. देशात असे कोणतेच राज्य नाही की, तेथे धार्मिक स्थळ, तीर्थस्थळ नसेल. धार्मिक ठिकाणंं दीर्घकाळापासून श्रद्धेचे आणि अध्यात्माचे केंद्र राहिलेले आहे. यातही काश्मिरातील अमरनाथ तीर्थक्षेत्राला एक विशेेष महत्त्व आहे. कल्हण यांच्या ‘राजतरंगिनी’मध्ये या तीर्थक्षेत्राला अमरेश्वर असे म्हटले आहे. अमरनाथ हा शब्द हिंदीतील दोन शब्द म्हणजे ‘अमर’ अर्थात अनश्वर आणि ‘नाथ’ म्हणजेच ईश्वर यांना जोडून तयार झाला आहे. भारताच्या विविध क्षेत्रांत असलेले महादेवाची बारा ज्योतिर्लिंग सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, वैद्यनाथ, त्र्यंबकेश्वर, रामेश्वरम, नागेश्वर अणि घृष्णेश्वर असून अमरनाथ याचे विशेष महत्त्व आहे. भगवान महादेवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या अमरनाथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच अमरनाथ यात्रेला तीर्थाचे तीर्थ असे म्हटले जाते. मृत्यूवर विजय मिळवणारे मृत्युंजय शिव अमर आहे आणि त्यामुळे त्यांना अमरेश्वर असेही म्हटले जाते. भाविक मंडळी अमरेश्वर यांनाच बाबा अमरनाथ आणि बर्फानी बाबा असेही म्हणतात. अमरनाथ तीर्थक्षेत्र हे जम्मू काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगरपासून 141 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 2,888 मीटर उंचीवर आहे. त्याच्या गुहेची लांबी 10 मीटर, रुंदी सोळा मीटर आहे. 40 मीटर उंचीच्या अमरनाथ गुहेत पडणार्या पाण्याच्या थेंबाने बर्फाच्या रूपातून अलौकिक शिवलिंग तयार होते.
एका पुराणकथेनुसार, भगवान शिवने पार्वतीला अमर होण्याचे रहस्य सांगण्यासाठी याच गुहेची निवड केली. कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा देवी पार्वतीने भगवान शिव यांना अमरत्वाचे रहस्यभेद करण्यास सांगितले तेव्हा ते गूढ सांगण्यासाठी भगवान शिव हे पार्वतीला या गुहेत घेऊन गेले. हे रहस्य कोणाच्याही कानावर पडू नये, हा त्यामागचा हेतू होता. याच ठिकाणी भगवान शिव यांनी पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. इतिहासकारांच्या मते, अमरनाथ यात्रा ही हजारो वर्षांपासून सुरू असून अमरनाथ दर्शनाचे महत्त्व पुराणकथेतही सांगितले आहे. बृंगेश संहिता, नीलमत पुराण, ‘कल्हण की रजितरंगिनी’ आदीत या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आहे. नीलमत पुराणकथेतील अमरेश्वरच्या संदर्भातील उल्लेख पाहता सहाव्या-सातव्या शतकातही लोकांना या तीर्थक्षेत्राची माहिती असल्याचे निदर्शनास येते.
दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा ही पुण्यफळप्राप्तीसाठी केली जाते. अमरनाथाचे दर्शन घेतल्याने आणि पूजा केल्याने महापुण्य मिळते, अशी अख्यायिका आहे. शास्त्रात इंद्रिय निग्रहवर विशेष भर दिला. यामुळे मोक्ष (मुक्ती) मिळतो, असे म्हणतात. शास्त्रांत म्हटल्यानुसार अमरनाथ यात्रा ही ‘निग्रह’ न करताही मोक्ष मिळवून देणारी यात्रा आहे. श्रावण महिन्यात पवित्र हिमलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक अनेक राज्यांतून या ठिकाणी येतात. अमरनाथ यात्रेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यावहारिक तथ्य म्हणजे, ही यात्रा परस्पर सौहार्द, बंधूभाव, प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करणारी आहे.