

कोणत्याही जाती, पंथ, संप्रदाय किंवा अगदी धर्माचेही बंधन तोडून ज्या देवतेची उपासना आपल्या देशात होत असते, ते समन्वयात्मक दैवत म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय. हे दैवत गुरुरूप आहे आणि त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त’ असेच संबोधले जाते. ज्ञान हे असीम आहे आणि त्याला कोणत्याही बंधनात अडकवता येत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानदान करणारे गुरुतत्त्वही अनंत आणि सर्वव्यापीच आहे. दत्तगुरूंच्या समन्वयात्मक रूपाचे हे एक रहस्य आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला परंपरेने श्री दत्त जयंती साजरी होत असते. वासुदेवानंद सरस्वतींच्या ‘श्रीदत्तमहात्म्य’ या ग्रंथात म्हटले आहे, ‘मार्गशीर्ष पौर्णिमेसी। बुधवारी प्रदोषसमयासी। मृग नक्षत्री शुभ दिवशी। अनसूयेसी पुत्र झाले॥ तव अत्रिऋषी येऊन। पाहीन म्हणे पुत्रवदन। तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून। विस्मित-मन जाहला॥’ ‘अ-त्री’ म्हणजेच ‘तीन नसून एक’ असा अभेद भाव असलेले अत्री ऋषी आणि जिच्या मनात असूया नाही, अशी अनसूया माता यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन परमेश्वराने त्यांचा पुत्र म्हणून स्वतःला दान केले व म्हणून त्यांचे नाव ‘दत्त!’ या तपःपूत दांपत्याची इच्छा होती की ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे तिन्ही देव पुत्ररूपाने पोटी यावेत. अत्री ऋषींनी या जगताच्या परमेश्वराचे दर्शन व्हावे म्हणून तप केले असता, हे तिन्ही देव त्यांच्यासमोर प्रकट झाले होते व आम्ही तीन नसून एकच आहोत, असे सांगितले होते. सृष्टिनाथ, जगन्नाथ आणि विश्वनाथ असे हे जगताचे म‘नाथ’ एकाच तत्त्वाची सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुणानुसार सृष्टीची निर्मिती, पालन व संहार या कार्यासाठी घेतलेली तीन रूपे आहेत. या तिन्ही दैवतांनी आपले पुत्र व्हावे, अशी अत्री ऋषींची इच्छा होती. तसेच अनसूयेची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठीही हे तीन देव आले असताना अनसूयेनेही त्यांच्याकडे हेच वरदान मागितले होते. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला हा जगताला ज्ञानदान करणारा गुरुरूप अवतार झाला.
‘भूयो भूतात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः। दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परया युतः॥’ असे ब्रह्म पुराणात म्हटले आहे. ‘जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक क्षमाप्रधान अवतार झाला’ असा त्याचा अर्थ. ‘श्री दत्तगुरू हे सर्वांचे अंतरात्माच आहेत व त्यांचा हा गुरुरूप अवतार क्षमाशील आहे,’ हे यामधून स्पष्ट सांगितले आहे. सर्वव्यापी परब्रह्म सर्वांच्या हृदयात आत्मस्वरूपात विलसत आहे व तेच भक्तांच्या उद्धारासाठी, ज्ञानदानासाठी या सगुण स्वरूपात अवतरले. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधात अवधूताच्या चोवीस गुरूंचे वर्णन आहे. पुराणांप्रमाणेच शांडिल्योपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद, जाबालदर्शनोपनिषद व दत्तात्रेयोपनिषद या पाच नव्य उपनिषदांमध्येही दत्तात्रेयांचे वर्णन आहे. यापैकी शांडिल्योपनिषदातील दत्तध्यानात म्हटले आहे की, ‘ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगिजनप्रियम।’ श्री दत्त हे ज्ञानयोगाचे निधी, विश्वगुरू आणि योगीजनांना प्रिय आहेत, असा त्याचा अर्थ. श्री दत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये मोठीच वैविध्यता आहे.
गणेश, कार्तिकेय, परशुराम यांच्यासारख्या विभवांपासून ते प्रल्हादासारख्या असुर राजापर्यंत, दलादन, पिंगलनाग यांच्यासारख्या मुनींपासून ते दूरश्रवा भिल्लापर्यंत अनेकांचा तसेच यदु, आयु, सहस्रार्जुन, अलर्क यांच्यासारख्या राजांचाही त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश होतो. आखाडा परंपरा, आनंद संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, नाथ व अवधूत संप्रदाय अशा अनेक संप्रदायांमध्ये श्री दत्तगुरूंना अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. दत्तात्रेयांचे योगीराज, अत्रिवरद असे सोळा अवतार मानले जातात. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, माणिकप्रभू, साईबाबा यांच्यासारख्या सत्पुरुषांनाही दत्तावतारी मानले जाते. तत्त्वतः प्रत्येकाचे जे आत्मस्वरूप आहे, तेच गुरुतत्त्वही आहे. अर्थातच हे गुरुतत्त्व सर्वत्र समान व सर्वव्यापीही आहे. ‘अवधूत गीता’ किंवा ‘त्रिपुरा रहस्य’मध्येही श्री दत्तगुरूंच्या अशा सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन आहे. असे हे सगुण रूपातील सर्वव्यापी गुरुतत्त्व असलेल्या परब्रह्मस्वरूप श्री दत्तगुरूंना शतशः नमन!