

मनुष्याचा स्वभाव त्याच्यातील गुणांनी ओळखला जातो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रमुख तीन गुण व्यक्तीच्या स्वभावात, वर्तनात आणि आचरण म्हणजेच जीवनशैलीत असतात. भगवद्गीता आणि योगशास्त्रातही या गुणांच्या व्यक्ती कशा असतात, त्या कशा वागतात, त्यांचे कर्म कसे असते यावर भाष्य केलेले आहे. संस्कृत तत्त्वज्ञानात, संख्या दर्शनात या प्रमुख तीन गुणधर्मांचे वर्णन केले आहे. सात्विक व्यक्ती या शांत, संयमी, ज्ञानी, नैतिक आणि परोपकारी असतात. त्यांच्यात अचाट साहस असते, ते प्रकांड पंडित असतात, जग बदलणार्या मनोधारणांना दिशा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी असते.
कॅप्टन कुल असे बिरूद अवघ्या क्रिकेट जगतात ज्याच्या वाट्याला आले, तो महेंद्रसिंह धोनी जर आयएएस अधिकारी बनला असता तर...? किंवा रांचीच्या रेल्वे स्थानकात तो कायमस्वरूपी तिकीट चेकर बनून नोकरीत रमला असता तर...? हा देश आणि तमाम रसिक एका महान क्रिकेटवीराला मुकले असते. चपळ यष्टिरक्षक काय चीज असते, हे अनुभवण्याची संधी अब्जावधी क्रिकेट रसिकांनी गमावली असती. सुरेख ‘हेलिकॉप्टर शॉट’चा नजारा बघता आला नसता आणि शेवटच्या षटकात सिक्सर ठोकून सर्वश्रेष्ठ ‘मॅच फिनिशर’ बनलेला धोनी जगाला बघता आला नसता.
महेंद्रसिंग धोनी केवळ टीसी बनणे नियतीला मंजूर नव्हतेच. त्याच्यासाठी नियतीने भव्य-दिव्य योजना आखल होती, या खंडप्राय देशातील भारतीय क्रिकेट संघाचा नायक बनण्याची. 2007 चा वन डे टी-20 वर्ल्डकप, 2011 मधील विश्वचषक आणि 2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या प्रकारांतील वर्ल्डकप जिंकून धोनी महान क्रिकेटपटूच नव्हे तर महान कॅप्टनही बनला. त्याचे विश्वविक्रम अद्याप तरी कुणी मोडलेले नाहीत. सात्विक व्यक्तींमध्ये जे गुण असतात ते शांतपणा, संयम, नैतिकता, कुणाचीही निंदा न करण्याची वृत्ती हे सर्व धोनीमध्ये आहेत. तो अजातशत्रू आहे. क्रिकेट मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजाकडून सलग एकेक मोहरे गळत असताना धोनी शांत असतो. ही ऋषितुल्य व्यक्तींची लक्षणे आहेत.
महात्मा गांधी जर बॅरिस्टर बनून कुटुंबाची उपजीविका करत बसले असते तर पारतंत्र्यातील हिंदुस्थानाला महात्मा लाभला नसता. ए. आर. रहमान जर आयएएस झाले असते तर ऑस्करविजेता प्रयोगशील असा महान संगीतकार भारताला लाभला नसता. तात्पर्य आयएएस, आयपीएस बनणे हा बुद्धिमत्तेचा अंतिम पुरावा नव्हे! रजोगुण असलेल्या व्यक्ती मेहनती, शिस्तप्रिय, क्रियाशील, कामनांनी भरलेल्या, स्पर्धात्मक असतात. केवळ पास क्लास असलेली व्यक्ती मग ती पुरुष असेल किंवा महिला, कठीण परिश्रम आणि प्रयत्नांतील सातत्य राखून आयएएस बनू शकते. धनसत्ता मिळविण्यासाठी धडपडणारे लोक, राजकारणी, व्यापारी लोकांचा समावेश (काही अपवाद वगळता) रजोगुणी वर्गात होतो.
तात्पर्य, ज्यांच्यात अनेक सात्विक सुप्त गुण आहेत, ज्या व्यक्ती एखादा शोध लावून कोट्यवधी लोकांचे जीवन आमूलाग्र बदलू शकतात. ज्यांच्या प्रेरणादायी वाणीने, भाषणाने समाजात क्रांती घडू शकते, ज्यांचे विचार ग्रंथरूपात लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात त्यांनी आयएएस, आयपीएस बनणे निरर्थक आहे. माझी स्ट्रेंथ काय आहे, ती कुठे वापरली तर लाखो लोकांना त्याचा लाभ होईल, याचा विचार ज्याने त्याने करावा अन् कार्याचे क्षेत्र निवडावे. आपल्या क्षमता आपणास ओळखता आल्या पाहिजेत. तरच तुमच्यात असलेल्या ऊर्जेचा फायदा होईल. अन्यथा ‘मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा ।’ अशी तुमची अवस्था होऊ शकते. तमोगुणी लोकांचे काही खरे नाही. तमोगुणी आळशी, अज्ञानी, आत्मकेंद्रित, भ्रामक आणि नशा याकडे झुकणारे असतात. अप्रामाणिकपणा आणि अनैतिक वर्तन हे त्यांचे मुख्य दुर्गुण. मी म्हणतो तेच खरे आणि मी म्हणजेच राज्य अशा आत्ममग्न लोकांची लक्षणे तमोगुण दर्शवतात. अशा बहुसंख्य व्यक्ती ज्ञान आणि मेहनतीपेक्षा चारसोबीसीचा अवलंब करून यशस्वी होतात. पण अशांना लोकप्रियता लाभत नाही. त्यांच्या पदरी टीकेचा भडीमार असतो.