सुरक्षेला खिंडार

White House
सुरक्षेला खिंडार (Pudhari File Photo)
Published on
Updated on

अमेरिकेत वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये एका हल्लेखोराकडून झालेल्या गोळीबाराने संपूर्ण जग हादरले. व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसाठी आयोजित वार्षिक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेत बंदूकधाऱ्याने आठ राऊंड फायर केले. एका सुरक्षा रक्षकाने बुलेटप्रूफ जॅकेट घातले असल्याने तो बचावला. तरी, जागतिक आर्थिक आणि सामरिक महासत्ता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या गरीमेला या हल्ल्यामुळे मोठा तडा गेला आहे. राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या पत्नी, उपराष्ट्राध्यक्ष आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणाऱ्या ठिकाणी शस्त्रास्त्रांसह एखादा हल्लेखोर प्रवेश करू शकतो हीच मुळात गंभीर चिंतेची बाब आहे.

‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी‌’ (सीआयए) ही अमेरिकेची गुप्तचर संस्था जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारे एक शक्तिशाली केंद्र आहे. शीतयुद्ध काळात सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यापासून ते आधुनिक युगातील सायबर युद्धापर्यंत, सीआयएने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात कणा म्हणून भूमिका बजावली. लँगलीमधून चालणाऱ्या या गुप्तचर यंत्रणेने अनेक देशांमधील सत्तापालट, ओसामा बिन लादेनचा खात्मा आणि जागतिक संघर्षांमधील गुप्त हस्तक्षेप यांद्वारे आपली सामर्थ्यशक्ती सिद्ध केली आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील गवताच्या गंजीतून सुई शोधून काढण्याची क्षमता सीआयएकडे आहे, असे म्हटले जाते. अशा स्थितीत थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर हल्ला करण्याचे प्रयत्न यशस्वी होत असतील तर या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये निश्चितच उणिवा आहेत.

अमेरिकेत आजवर चार राष्ट्राध्यक्षांची गोळ्या घालून हत्या झाली आहे. यातील पहिली हत्या जगाला लोकशाहीची तत्त्वप्रणाली देणाऱ्या अबाहम लिंकन यांची होती. त्यानंतर जेम्स ए. गार्फिल्ड, विल्यम मॅकिनले आणि जॉन एफ. केनेडी यांचे मृत्यूही बंदुकीच्या गोळ्यांनीच झाले. विशेष म्हणजे, याच हिल्टन हॉटेलमध्ये 1981 मध्ये राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने त्या इतिहासाची पुनरावृत्ती होता होता राहिली. खुद्द ट्रम्प यांच्यावर यापूर्वी दोनदा प्राणघातक हल्ले झाले आहेत. यातील एका घटनेत गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना केवळ योगायोग म्हणता येणार नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ही जगातील सर्वांत व्यस्त व्यक्ती मानली जाते. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कराचे ते सर्वोच्च प्रमुख असतात. अण्वस्त्रांचे नियंत्रण करणारी ‌‘न्यूक्लियर बीफकेस‌’ नेहमी त्यांच्यासोबत असते. वॉशिंग्टन हिल्टनमध्येही बहुस्तरीय सुरक्षाप्रणाली कार्यान्वित होती, पण या हल्लेखोराने हॉटेलमध्ये आधीच खोली आरक्षित केली असल्याने सुरक्षा यंत्रणांचे कवच कुचकामी ठरले. त्याच्याकडे लांब आणि कमी पल्ल्याची दोन्ही प्रकारची घातक शस्त्रे तसेच चाकूदेखील सापडले असून यावरून त्याचा कट नियोजित होता, हे स्पष्ट होते.

कोल टॉमस ॲलन नामक हा हल्लेखोर माथेफिरू नाहीये. तो कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर पदवी संपादित केलेला उच्चशिक्षित शिक्षक आहे. अमेरिकेच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणांविरुद्ध पुकारलेला एल्गार म्हणून हे कृत्य ॲलनने केल्याचे समोर आले आहे. परंतु, यानिमित्ताने अमेरिकन समाजात पसरलेली राजकीय कटुता आणि टोकाचा द्वेष किती भेदक पातळीवर पोहोचला आहे याचे दर्शन जगाला घडले. त्याचबरोबर अमेरिकेतील ‌‘गन कल्चर‌’ संस्कृतीचा भस्मासुर किती उग््रा झाला आहे, हेही पुन्हा जगासमोर आले. अमेरिकेची सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे तिथला शस्त्र बाळगण्याचा अधिकार. तेथे कोणताही सामान्य नागरिक सहजपणे बंदूक खरेदी करू शकतो. यामुळेच अमेरिकेतील शाळा, मॉल्स आणि आता तर थेट राष्ट्राध्यक्षांचे कार्यक्रमही असुरक्षित बनले आहेत. अमेरिकेत सामान्य नागरिकांकडे असलेल्या शस्त्रांची संख्या ही तिथल्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तिथे दर 100 नागरिकांमागे सुमारे 120 बंदुका असे हे धक्कादायक प्रमाण आहे. ‌‘गन व्हायोलन्स आर्काइव्ह‌’च्या व्याख्येनुसार, ज्या घटनेत हल्लेखोराशिवाय किमान 4 लोक जखमी किंवा मृत होतात, त्याला सामूहिक गोळीबार मानले जाते. अमेरिकेत वर्षाचे 365 दिवस असले, तरी सामूहिक गोळीबाराच्या घटनांचे प्रमाण वर्षाला 600 पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे स्वतः ट्रम्प या बंदूक संस्कृतीचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे पूर्वसुरी बायडेन यांनी शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी नवीन नियम लागू केले होते. पण ट्रम्प यांनी सत्तेत येताच ते मोडीत काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news