

युवराज इंगवले
कर्तृत्वाला कोणत्याही प्रकारची सीमा नसते, असे मानले जाते. जबर इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेकांनी आकाशाला गवसणी घातली आहे. त्याला दिव्यांगही अपवाद नाहीत. दिव्यांगांनी अनेक क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करत ‘हम किसीसे कम नही!’ हे दाखवून दिले आहे. गेल्या दशकांमध्ये क्रीडा क्षेत्रात अनेक भारतीय दिव्यांग खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजवले. त्यातील एक ताजे नाव म्हणजे भारतीय दिव्यांग तिरंदाज शीतल देवी होय. नुकतेच जागतिक तिरंदाज संघाने शीतल देवीला ‘पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025’ हा पुरस्कार घोषित केला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या या 19 वर्षीय खेळाडूने गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक जिंकले होते. तिने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये महिला सांघिक रौप्य आणि मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाशिवाय शीतलने पॅरिस पॅरालिम्पिक्समधील मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक, तसेच 2022 च्या आशियाई पॅरा गेम्स आणि बँकॉक येथील 2023 च्या आशियाई चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक प्रकारात रौप्यपदकेही पटकावली आहेत. 2011 पासून शीतल देवीचा प्रवास सुरू झाला आणि आता तो 2025 चा जागतिक तिरंदाजी पुरस्कार मिळवण्यापर्यंत पोहोचला आहे.
हात नसतानाही जिद्दीच्या जोरावर शीतलने पायांनी आणि खांद्याचा वापर करून तिरंदाजीमध्ये निपुणता मिळवली आहे, जे तिच्या अभूतपूर्व कामगिरीचे लक्षण आहे. शीतल ही जागतिक स्तरावरील अव्वल क्रमांकाची महिला पॅरा-कंपाऊंड तिरंदाज आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील लोईधर गावात 10 जानेवारी 2007 मध्ये जन्मलेल्या शीतलने अगदी कमी वयात पॅरालिम्पिक आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये यश मिळवले, हे नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शीतल देवीचा जन्म फोकोमेलिया नावाच्या एका दुर्मीळ विकारासह झाला, ज्यामुळे तिचे अवयव अविकसित राहिले. या स्थितीमुळे तिचे हात पूर्णपणे विकसित झाले नाहीत.
शीतल देवीची कामगिरी अधिकच आश्चर्यकारक ठरते. कारण ती हातांचा वापर न करता तिरंदाजी करणारी एकमेव सक्रिय आंतरराष्ट्रीय महिला तिरंदाज आहे. जन्मजात शारीरिक स्थितीमुळे अनेक आव्हाने असूनही, शीतल देवीने त्यावर मात केली. तिच्यात प्रचंड इच्छाशक्ती होती आणि तिला फावल्या वेळेत झाडांवर चढायला आवडायचे. या क्रियेमुळे तिचे वरचे शरीर मजबूत झाले, जे पुढे तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरले. शीतल देवीच्या पॅरा तिरंदाजीमधील कारकिर्दीला गती देण्यात भारतीय लष्कराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2021 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथे भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या एका युवा स्पर्धेतच लष्करी प्रशिक्षकांनी शीतलची उपजत खिलाडूवृत्ती आणि आत्मविश्वास ओळखला आणि तिच्या यशाचा उल्लेख आणखीनच उंचावत राहिला.