ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जबरदस्त तडाखा बसला आहे. खुद्द त्यांच्या शत्रूलाही कल्पना करता येणार नाही, एवढा मानहानिकारक पराभव त्यांच्या पदरी पडला आहे. गेल्या साठ-पासष्ठ वर्षांपासून शरद पवार राज्याच्या राजकारणात वावरत आहेत. दीर्घ काळापासून त्यांची इथल्या राजकारणावर पकड आहे आणि तरीही त्यांना या निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. राजकारणातील त्यांच्या प्रभावाची ही पीछेहाट केवळ अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यांच्या राजकारणाने आजवर जी वळणे घेतली, त्याच वळणांनी त्यांना कात्रजच्या अर्थात घसरणीच्या घाटावर आणून सोडले आहे, असाच निष्कर्ष काढावा लागतो.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शरद पवार यांनी प्रथम पद्धतशीरपणे उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षापासून बाजूला करीत दोन्ही काँग्रेससह सत्ता स्थापन केली. त्याआधी भाजपकडे गेलेल्या आपल्या पुतण्याला अजित पवार यांना परत स्वगृही आणले. ही त्यांची खेळी अडीच वर्षांतच उलटली आणि शिवसेनेतच फूट पडून भाजपने शिंदे शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज केली. पवारांच्या चाणक्यनीतीला हा पहिलाच धक्का होता. पुढे वर्षातच पुतणे अजित पवारांनी खुद्द पवारांचाच पक्ष फोडला आणि ते भाजपबरोबर सरकारात सहभागी झाले. हा पवारांना दुसरा जबर धक्का होता; पण मुत्सद्दी पवारांना त्यातून भविष्यात काय घडेल, याचा अंदाज आला नाही, असेच आता निकालावरून म्हणावे लागेल. खरे तर गेल्या 15-20 वर्षांपासूनच अजित पवार आपली नाराजी सातत्याने दर्शवीत होते. मुख्यमंत्रिपदाची संधी येऊनही ती नाकारली गेल्याची त्यांना खंत होती व ती खासगीत व्यक्तही होत होती. पहाटेच्या शपथविधीतून त्यांची ही महत्त्वाकांक्षा उघड होऊनही त्याची फारशी दखल घेण्यात शरद पवार कमी पडले, किंबहुना अन्य काही कारणासाठी त्यांनी पुतण्याच्या अपेक्षांना धूप घातला नाही, असेच म्हटले पाहिजे.
देशाच्या राजकारणात काँग्रेसपासून समाजवादी पक्षापर्यंत अनेक पक्षांत फूट पडली; पण ही फूट तात्त्विक पायावर होती. व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी पक्ष फोडले नाहीत; पण 1978 साली पुलोदचा प्रयोग करताना आणि 1999 मध्ये काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडताना शरद पवार यांनी कोणती तात्त्विक भूमिका घेतली, हे तपासावेच लागेल. त्यामुळेच गेल्या दोन दशकांतील फोडाफोडीच्या ज्या घडामोडी झाल्या, त्याचे जनक शरद पवारच आहेत, अशीच इतिहासात नोंद होईल. त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेतून महामार्ग झाला आणि त्याच त्यांच्या करणीतून आपलाच पक्ष फुटल्याचे त्यांच्या नशिबी आले. हा ‘पोएटिक जस्टिस’ म्हणावा लागेल.
शरद पवार यांनी आपल्या सोबत जे पक्ष घेतले, त्यांचा र्हास झाला, असाच इतिहास आहे. त्यांच्या सोबत ‘पुलोद’च्या सत्तेत सहभागी झालेला शेतकरी कामगार पक्ष आता नावापुरताच उरला आहे, तर समाजवादी पक्ष औषधापुरताही शिल्लक नाही. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांची वाताहत झाली. शरद पवार यांच्या यापूर्वीच्या दाखल्याचीच यावेळी पुनरावृत्ती झाली आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागांवर यश मिळविले होते. तेव्हा त्यांचा स्ट्राईक रेट 80 टक्के एवढा होता. याउलट विधानसभा निवडणुकीत त्यांनी 86 जागा लढवल्या. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट साडेअकरा टक्क्यांच्या आसपास एवढा कमी झाला. ही घसरगुंडी का झाली, याचे उत्तर त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीशी सुसंगत असेल, हे वेगळे सांगायला नको.
बारामती हे पवारांचे संस्थान म्हटले जाते. ते या संस्थानाचे अनभिषिक्त राजे म्हणवले जातात. लोकसभा निवडणुकीत पुतणे अजित पवार यांच्याशी त्यांचा रणसंग्राम झाला. त्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या; पण विधानसभा निवडणुकीत पुतणे अजित पवार यांच्या विरोधात अजित पवारांचे पुतणे युगेंद्र यांना उभे करण्याची त्यांची खेळी अंगलट आली. यावेळी पुतण्याने काका शरद पवार यांच्यावर मात केली. दरवेळी आपल्याला अनुकूल दान मिळेल, ही शरद पवार यांची चाणाक्ष नीती यावेळी अपयशी ठरली.
सातार्यात 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीवेळी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचार सभेत पाऊस आला. पवार पावसात भिजले आणि पुढे श्रीनिवास पाटील विजयी झाले. इचलकरंजीत विधानसभा निवडणूक प्रचारावेळीही पाऊस आला आणि पवार पावसात भिजले, तेव्हा प्रचार सभेवेळी पाऊस आला की विजय मिळतो, असे विधान पवारांनी केले. असल्या योगायोगाच्या काडीचा आधार त्यांना घ्यावा लागला. यातच बहुधा त्यांना पराभवाची चाहूल लागली असावी, असाही निष्कर्ष काढता येतो.
लाडकी बहीण, तीर्थदर्शन, वेगवेगळ्या जातिपातींची कल्याणकारी महामंडळे अशा महायुती सरकारच्या निर्णयांचा मतदारांवर प्रभाव पडू शकेल व त्याला तोडीस तोड जबाब द्यावा लागेल, हे चाणाक्ष चाणक्य शरद पवार यांच्या ध्यानात येऊ शकले नाही. उबाठा आणि काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडून याबाबत काही अपेक्षा नव्हती; पण दीर्घ अनुभव असलेल्या पवारांना या निर्णयाचे परिणाम कळू शकले नाहीत, हे खरे तर आश्चर्य म्हटले पाहिजे. या निर्णयाची त्यांनी उपेक्षाच केल्याचे दिसून आले आणि त्याचा परिणाम जाणवला. संजय राऊत, नाना पटोले यांच्या बेफाम वक्तव्यांना लगाम घालावा, हेही आघाडीचे सूत्रधार म्हणून त्यांना जमले नाही किंवा सुचले नाही. या सार्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. हे त्यांचे वैयक्तिक अपयशच म्हटले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारावेळी ‘हम एक है’चे आवाहन केले होते, तर योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा इशारा दिला होता. सर्वसामान्य जनतेला तो भावला आणि मतदानाच्या टक्क्यांत वाढ झाली, ती महायुतीच्या बाजूने! चाणाक्ष, चतुर पवारांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही किंबहुना त्यांनी या प्रचारसूत्राला नगण्य समजले. आकलनातील ही त्रुटी त्यांना चांगलीच महागात पडली.
गेल्या साठ वर्षांत नीरा नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक बदल झाले आहेत आणि पवारांबरोबरच्या दोन पिढ्या बाजूला जाऊन तिसरी पिढी राजकारणात, अर्थकारणात आदी विविध क्षेत्रांत सक्रिय झाली आहे. नवी पिढी धार्मिकबाबतीत अधिक संवेदनशील झाली आहे. जनतेच्या नाडीवर आपले बोट असल्याचा विश्वास बाळगणार्या शरद पवारांना यावेळी जनतेची नाडी हाताला लागलेली दिसत नाही. नव्या पिढीचे मनोव्यापार आणि मानसिकता यांचे आकलन भाजप नेतृत्वाला जेवढे झाल्याचे दिसते, तेवढे पवार यांना झाल्याचे दिसत नाही; अन्यथा एवढ्या दारुण पराभवाची नामुष्की ओढवली नसती आणि आपल्या एकेकाळच्या प्रभावाची झालेली पीछेहाट त्यांना ‘याचि डोळा, याचि देही’ पाहावी लागली नसती.