.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यापुढे त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षामध्ये फूट पडून दोन वर्षे व्हायच्या आतच पक्षामध्ये जबरदस्त गळती सुरू झाली आहे आणि शरद पवार यांना ते पाहात बसण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही, हे कटु वास्तव आहे.
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ राजकारणावर भक्कम पकड असलेल्या शरद पवारांची आपल्या पक्षावरचीच नव्हे तर एकूणच राजकारणाची पकड ढिली झाल्याचे चित्र पुढे येत आहे. 47 वर्षांपूर्वी 1978 सालात ‘वसंत ऋतु संपला, शरद ऋतु सुरू’, अशा मथळ्याच्या बातम्या असत. आता एकविसावे शतकाने पंचविशी गाठली असताना नवा ऋतू आणि नवे पर्व महाराष्ट्रात उदयाला आले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या त्रिपक्षीय महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे याआधी 15 आमदार होते. ते संख्याबळ दहावर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र चांगले यश मिळवत 41 जागा जिंकल्या. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव दिसून आला आणि तेवढ्याच प्रमाणात शरद पवार यांच्या दीर्घकालीन वर्चस्वाला ओहोटी लागल्याचेही दिसून आले. सातारा जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला म्हटला जायचा. पण या जिल्ह्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर भाजपचे चार, शिंदे शिवसेनेचे दोन आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन अशा आठही जागा महायुतीने जिंकल्या. कोल्हापूर जिल्ह्यातही शरद पवारांना एकही जागा मिळाली नाही. सांगली जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आणि स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे विजयी झाले. या यशात शरद पवारांच्या पक्षाच्या वाटा किती हा प्रश्नच आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्यातही त्यांना यश मिळाले नाही आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही त्यांचे नातू रोहित पवार वगळता पवारांचा करिष्मा चालला नाही. या निवडणुकीत पक्षाची वाताहतच झाली.
1978 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून पुलोद सरकार बनवले, तेव्हा त्यांच्याबरोबर पक्षाचे 38 आमदार होते. 1999 मध्ये त्यांनी पुन्हा पक्षात फूट पाडली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या बरोबर पक्षातील 51 आमदार होते. 1978 पासून 2019 पर्यंत पवारांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाच्या आमदारांची उच्चांकी संख्या सत्तरच्या आसपास राहिली. याउलट त्यांच्याबरोबरच्या मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केली आणि त्यांच्या पुत्रांनीही आपले वर्चस्व राखले. शरद पवारांना ज्युनिअर असणार्या ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वबळावर सत्ता मिळवली. शरद पवार यांना अशी किमया करता आली नाही. आजवरच्या त्यांच्या राजकारणी चालीत आणि कात्रजच्या घाटाच्या डावपेचात त्याचे कारण दडलेले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
त्यातूनच आता शरद पवार यांना आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पाहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव नाईक, राजेंद्रआण्णा देशमुख हे शरद पवारांचे मानले जाणारे माजी आमदार अलीकडेच अजित पवार यांच्या पक्षात सामील झाले. गेल्या आठवड्यात खानदेशातील शरद पवारांच्या संघटनेला जबरदस्त खिंडार पडले. जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, डॉ. सतीश पाटील हे माजी मंत्री, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, तिलोत्तमा पाटील हे माजी आमदार अशा मातब्बर नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि या नेत्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या पक्षास इतःपर भवितव्य राहिलेले नाही, याच तीव्र विचारातून त्यांनी हे पक्षांतर केले, हे स्पष्टच आहे.
अजित पवार यांचे चिरंजीव जय यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. वसंतरावदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत काका-पुतणे एकत्र होते. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीतही दोघांची उपस्थिती होती. या पंधरवड्यातील घडामोडीत काका-पुतण्यांची काही अंतस्थ चर्चा झाली का, याचे तर्ककुतर्क सुरू आहेत. अजित पवार यांनी ‘शिवसेना चालते, मला भाजप का नको’, हा उपस्थित केलेला मुद्दाही चर्चेचा बनला आहे. काकांना पुतण्याने दिलेले हे निमंत्रण समजायचे का, अशीही कुजबुज चालू झाली आहे. या सार्या घडामोडी होत असताना शरद पवार यांनी बोलावलेल्या निकटवर्तीयांच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे विलीनीकरण व्हावे, असे खलबत झाल्याचे आणि त्यावर शरद पवार यांनी मौन बाळगल्याच्या बातम्या आहेत. पुण्यातील एका बैठकीतही पाच आमदारांनी शरद पवारांकडे हाच विचार मांडला. पण पवारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
शरद पवार यांच्या पक्षातील गयारामांची वाढती संख्या, कौटुंबिक पातळीवर दिलजमाईच्या द़ृष्टीने होणारी काही वक्तव्ये, पक्षातील आमदारांचे दडपण या सार्या घडामोडींचा आढावा घेतला, तर नजीकच्या काळात या दोन पक्षांचे नवे समीकरणही तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 मध्ये शरद पवार यांनी सत्ता स्थापण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. ज्या पुतण्याविरोधात बोलताना कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख मीच आहे, असे जरबेचे उद्गार काढणार्या शरद पवार यांना पुतण्याशी हातमिळवणी करायची म्हणजे धर्मसंकटच वाटत असणार. पुन्हा पक्षाचे अस्तित्व टिकवायचे आव्हान कसे पेलायचे हाही प्रश्नच आहे. त्यांनी आजवरचे जे डावपेच रचले, तेच उलटले. त्याच चक्रव्यूहात ते अडकले आहेत.
‘लोक माझे सांगाती’ हे त्यांचे आत्मचरित्र. पण आता सोबत किती सांगाती आहेत, याचाच धांडोळा त्यांना घ्यावा लागणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसजन एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, असे विधान खा. शरद पवार यांनी गुरुवारी केले आहे. खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील हे निर्णय घेतील, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांनी त्यांची भूमिका दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावेत अशी आहे काय, अशी चर्चा आहे. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे कोणालाही सांगता येणार नाही हेही तेवढेच खरे आहे.