

डॉ. राहुल रनाळकर
शिक्षणव्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्येच भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असेल, तर उद्याच्या पिढीला प्रामाणिकपणाचे धडे कोण देणार? शालार्थ आयडी घोटाळ्याने भ्रष्टाचार, प्रशासकीय जबाबदारी आणि निर्दोष शिक्षकांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम मानले जाते. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना शिकविणारा नसतो, तर तो समाजाच्या भावी पिढीचा शिल्पकार असतो. मात्र, याच शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराचे जाळे इतके खोलवर रुजले असेल की, शिक्षकांच्या नियुक्त्यांपासून त्यांच्या वेतनापर्यंतच्या प्रक्रियेतच गैरव्यवहार होत असतील, तर ही बाब केवळ आर्थिक घोटाळ्यापुरती मर्यादित राहत नाही. ती संपूर्ण व्यवस्थेच्या नैतिक अधःपतनाची साक्ष ठरते. महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्याने नेमका हाच गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि वेतन प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून कथित बनावट नोंदी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये उचलण्यासाठी बनावट नियुक्त्या, मागील तारखेचे आदेश आणि संशयास्पद मान्यता यांचा आधार घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची व्याप्ती सुमारे दोन हजार शिक्षकांपर्यंत पोहोचल्याची माहिती असून नाशिक विभागातील शिक्षकांची संख्या सुमारे १३०० पर्यंत आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले आहेत. सुमारे १५० ते १६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आहे. ही आकडेवारीच या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचाराची साखळी एवढी मोठी कशी झाली?
या घोटाळ्यात सर्वांत अस्वस्थ करणारा मुद्दा म्हणजे संशयास्पद नियुक्त्या आणि शालार्थ नोंदी अनेक स्तरांवरून पुढे गेल्याचे चित्र. एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होते, त्याला वैयक्तिक मान्यता मिळते, त्यानंतर शालार्थ आयडी तयार होतो आणि शासनाच्या तिजोरीतून नियमित वेतन सुरू होते. या प्रत्येक टप्प्यावर अधिकृत कागदपत्रे, पडताळणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची मंजुरी अपेक्षित असते. मग या प्रक्रियेत बनावट नोंदी झाल्या असतील, तर त्या कोणाच्या मदतीने झाल्या? नियुक्ती आदेशांची सत्यता कोणी तपासली? वैयक्तिक मान्यता कोणी दिली? वेतनासाठी प्रस्ताव कोणी मंजूर केले? शालार्थ प्रणालीत नोंदी करताना पडताळणीची जबाबदारी कोणाची होती? हे प्रश्न तपास यंत्रणांनीच नव्हे, तर शासनानेही स्वतःला विचारण्याची गरज आहे.
नाशिक विभागातील ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व शालार्थ प्रस्तावांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे. १,५३० कर्मचाऱ्यांच्या आदेशांची पडताळणी केल्याची माहिती आहे. यात वरिष्ठ शिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी, वेतन पथकातील कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कारवाई झाली. काही अधिकारी आणि संस्थाचालक कारागृहात आहेत, तर काहींच्या जामीन प्रक्रियेला न्यायालयीन अडथळे आले आहेत. तपासाची व्याप्ती पाहता ही काही मोजक्या व्यक्तींची चूक असल्याचे मानणे कठीण आहे. मात्र, कोण दोषी, हे न्यायालयीन प्रक्रियेतूनच निश्चित झाले पाहिजे.
शिक्षण संस्थांमध्ये नियुक्त्या करताना गुणवत्ता, पात्रता आणि नियमांना सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवे; परंतु आर्थिक व्यवहार, राजकीय अथवा प्रशासकीय प्रभाव आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्त्या झाल्या असतील, तर पात्र उमेदवारांच्या हक्कांवरही गदा आली आहे. वर्षानुवर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांच्या कर्तृत्वालाही अशा प्रकरणांमुळे संशयाच्या सावलीत उभे राहावे लागते. याहून गंभीर बाब म्हणजे भ्रष्टाचाराची साखळी एका टप्प्यावर थांबलेली दिसत नाही. संस्थाचालकांकडून प्रस्ताव, कार्यालयीन पातळीवरील मान्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आणि वेतन मंजुरी अशा अनेक टप्प्यांतून एखादी नियुक्ती वैध ठरविली जात असेल, तर या संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे अपरिहार्य आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न झाला, तर मूळ सूत्रधार मात्र सुरक्षित राहतील. त्यामुळे तपासाचा रोख कोणत्याही पदाचा किंवा संस्थेचा मूलाहिजा न ठेवता संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचला पाहिजे.
शिक्षकांचे वेतन रोखले...
सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे संशयास्पद नियुक्त्यांशी संबंधित शिक्षकांचे वेतन रोखले जात आहे. काही कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्याचीही माहिती आहे. बनावट नियुक्त्या करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शासनाच्या पैशाची वसुलीही झाली पाहिजे; परंतु नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची माहिती नसताना, नियमांनुसार नोकरी स्वीकारून वर्षानुवर्षे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे काय? कार्यालयीन मान्यता आणि वेतन मंजुरी देणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त कसे होऊ शकतात? एखाद्या शिक्षकाने प्रत्यक्ष सेवा बजावली असेल, विद्यार्थ्यांना शिकविले असेल, शाळेची जबाबदारी पार पाडली असेल, तर त्याच्या नियुक्तीतील प्रशासकीय अनियमिततेची शिक्षा त्यालाच सरसकट देणे न्याय्य ठरणार नाही. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी, नियुक्तीच्या वेळची कागदपत्रे, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि कर्मचाऱ्याचा सहभाग यांची कसून तपासणी झाली पाहिजे. दोषी आणि निर्दोष यांच्यात स्पष्ट सीमारेषा आखली गेली पाहिजे, अन्यथा भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली आणखी एका अन्यायाला जन्म दिला जाईल.
नाशिक विभागातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून आजपर्यंतच्या सेवा अभिलेखांची तपासणी सुरू आहे. नियुक्ती आदेश, जाहिराती, निवड प्रक्रिया, वैयक्तिक मान्यता, पदमान्यता, शालार्थ आयडी आणि वेतन प्रस्ताव यांची पडताळणी होत आहे. ही प्रक्रिया स्वागतार्ह असली तरी ती केवळ कागदपत्रांच्या तपासणीपुरती मर्यादित राहू नये. शिक्षण विभागातील प्रशासकीय कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करण्याची ही संधी मानली पाहिजे. शालार्थ प्रणालीतील प्रत्येक नोंदीला डिजिटल पडताळणी, अधिकाऱ्यांची जबाबदारी, मंजुरीचा मागोवा आणि नियमित लेखापरीक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. नियुक्तीपासून वेतनापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची पारदर्शक नोंद उपलब्ध झाली, तर भविष्यात अशा गैरव्यवहारांना आळा घालता येईल. शिक्षण विभागातील अंतर्गत नियंत्रण व्यवस्था सक्षम करणे ही आता पर्यायाची नव्हे, तर अपरिहार्य गरज आहे.
शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराला स्थान असू नये. शिक्षकांच्या नावाखाली शासनाची तिजोरी लुटणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. त्याचवेळी हजारो शिक्षकांच्या भवितव्याशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी खेळ होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात दोषींना शिक्षा, आर्थिक वसुली, प्रशासकीय जबाबदारी निश्चिती आणि निर्दोष कर्मचाऱ्यांना न्याय या चारही गोष्टी एकाच वेळी साध्य झाल्या पाहिजेत.
शालार्थ घोटाळ्याने शासनाचे आर्थिक नुकसान केले असेलच; पण त्याहून मोठे नुकसान शिक्षण व्यवस्थेवरील समाजाच्या विश्वासाचे झाले आहे. हा विश्वास पुन्हा निर्माण करायचा असेल, तर कारवाई केवळ व्यक्तींवर नको, तर भ्रष्टाचाराला पोषक ठरलेल्या संपूर्ण व्यवस्थेवर झाली पाहिजे. कारण शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्येच जर अप्रामाणिकपणाला स्थान मिळाले, तर उद्याच्या पिढीला प्रामाणिकपणाचे धडे कोण देणार? हा प्रश्न आज संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसमोर उभा आहे.