Municipal Corporations election | महापालिकांत विरोधकांची अग्निपरीक्षा

Municipal Corporations election
Municipal Corporations election | महापालिकांत विरोधकांची अग्निपरीक्षाPudhari File Photo
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

नगरपालिका, नगरपंचायतींचे निकाल लागले! महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या पारड्यात भरभरून मत टाकले. या निकालांचा मागोवा घेतच आता 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाला महाराष्ट्र सामोरा जाईल.

लोकसभा निवडणुकांत मतदारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हात दिला. ही लाट विधानसभेत महायुतीने झोपवली. एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडक्या बहिणीं’नी आणि फडणवीस यांच्या आश्वासक चेहर्‍याने निकाल बदलवले. महाराष्ट्राचे ते राजकीय निकाल हे राज्याचे वास्तव असल्याचे नगरपालिकांच्या निकालांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘पुढारी’ वृत्त समूहाने सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर केलेल्या पाहणीतही जनतेने महायुतीलाच कौल दिला होता. ती पाहणी हाच राज्याचा मूड असल्याचे पुन्हा एकदा कालच्या निकालांनी सिद्ध केले. हे का घडते आहे? विकासाला मत, लाडक्या बहिणींचा पाठिंबा, हिंदुत्वाला दिलेली विकासाची जोड, अशी कारणे सत्ताधारी देऊ शकतील; पण हा प्रश्न विरोधकांना पडतो आहे का? महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे जाताना विरोधकांना याबाबत आत्मपरीक्षण करावे लागेल.

मुंबई हा ‘मिनी भारत’ आहे. या मुंबईत भाजपला रोखणे हे विरोधकांचे ठरले असेल तर त्यासाठी त्यांच्याजवळ काय आयुधे आहेत? त्यांचा येणार्‍या तीन आठवड्यात कस लागेल. मुंबई आमची म्हणत मराठी माणसांना एकत्र करणे, दलित-अल्पसंख्याकांना तुम्ही अनसेफ आहात असे दाखवणे, हे सगळे करण्यासाठी महायुतीविरोधीशक्ती एकत्रित हव्यात. सध्या त्या दिसत नाहीत. त्यामुळेच 29 महानगरपालिकांचे निकाल नगरपंचायतींप्रमाणे एकतर्फी लागणार तर नाहीत ना, अशी शंका घेणे सुरू झाले आहे. हा सामना उलटवणे यात ठाकरे बंधूंचे आणि महाविकास आघाडीचे खरे कर्तृत्व दडलेले आहे. नगरपरिषदांच्या निकालांचे अर्थ संमिश्र आहेत. भाजपने जे यश मिळवले ते विक्रमी आहे. मात्र, त्यांना आव्हान देत काही ठिकाणी त्यांच्याच युतीमधील क्रमांक दोनचा धाकटा भाऊ असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही दमदार कामगिरी नोंदवली. भाजपला शतप्रतिशतचा नव्हे, तर सहयोगाचा मंत्र भजावा लागणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचे काका शरद पवार यांना मागे टाकले.

एक वर्ष झाल्यानंतर जनता सरकारच्या कारभारावर समाधानी असल्याचे चित्र निकालांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला महासंग्राम संबोधले जाते. ही रणधुमाळी ठाकरे ब्रँडच्या कसोटीची आहे, तसेच मुंबई नक्की कुणाची? हे स्पष्ट करणारीही आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना ठाकरे नेमके काय करतील, हा प्रश्न या तीन आठवड्यांत गाजेल. झाले गेले विसरून भाऊ-भाऊ एकत्र आले. कोणतेही घर एकत्र राहणे, कुटुंबाने एकत्र किंवा जीवनातील आव्हाने संयुक्तरीत्या पेलणे भारतात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ‘महाभारता’चा इतिहास असलेल्या भारताला भाऊबंदीचा शाप आहे.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा मराठी माणूस ठाकरे ब्रँडकडे वळेल का? हे महानगरपालिकेची निवडणूक ठरवेल. महानगरपालिका जिंकणे हा ठाकरे ब्रँडसमोरचा सर्वात मोठा आव्हानाचा विषय आहे. शिवसेनेने स्थापनेनंतर अनेक आव्हाने अनुभवली. अनेक आव्हानांना ठाकरे यांनी यशस्वी तोंड दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निर्णयाला विरोध करीत 40 आमदार निघून गेले. त्यानंतरही लोकसभेत ठाकरे यांना यश मिळाले. मराठी अस्मिता, मुंबईच्या विकासात असलेले ठाकरेंचे योगदान हे सगळे मुद्दे लक्षात घेता, शिवसेना नेमकी कशी कामगिरी करेल, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, लोकसभा गाजवणार्‍या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. वारंवार यावर सत्ताधार्‍यांनी बोट ठेवले. महापालिकेच्या निवडणुका वेगळ्या. ठाकरेंसाठी तर अतिमहत्त्वाच्या. हे चारही नेते या मतदानाकडे घरी बसून बघणार नाहीत, हे निश्चित. शरद पवार वयोवृद्ध झाले असले तरी आजही सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेवर प्रेम असलेला पक्ष. त्याचा पगडा ग्रामीण महाराष्ट्रावर जास्त. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या पुढच्या निवडणुकांमध्ये शरद पवार जास्त तयारीने उतरतील.

भाजप संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, अहिल्यानगर अशा सर्वच महापालिकांमध्ये राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. भाजपला निर्विवाद यश मिळाले असले, तरी त्यांचे मित्र असलेले पक्षही त्यांना काही ठिकाणी पराभूत करण्यात यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांनी कोकणात जोरदार मुसंडी मारली. आपला पक्ष हा खरी शिवसेना आहे, क्रमांक दोनचा पक्ष आहे, हे त्यांनी सिद्ध केले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असले तरी आपला पक्ष पुढे असल्याचे या निकालांनी शिंदे यांनी पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे अडीच वर्षांच्या काळातली कामगिरी जनतेच्या मनात जागी दिसते आहे.

अजित पवार यांनी आपल्यात इलेक्टिव्ह मेरिट असल्याचे या निवडणुकांमध्ये दाखवून दिले. आता पिंपरी-चिंचवड, ज्या नगराच्या विकासात त्यांनी मनापासून लक्ष घातले तेथे विजयी कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. समोरचा शत्रू भाजपच आहे. अशा परिस्थितीत ते कशारीतीने कामगिरी करतील, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून राहतील. नापास झालेल्या महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये पहिल्या क्रमांकावर आला तो काँग्रेस पक्ष. काँग्रेसला विदर्भाने बर्‍याच मोठ्या प्रमाणात हात दिला. काँग्रेस स्वबळावर मुंबईत नशीब आजमावत आहे. महानगरपालिका सभागृहात काँग्रेसचे 20 नगरसेवक होते. तो आकडा तसाच राहील का, याकडे बघावे लागेल. भाजपला अभूतपूर्व यश मिळाले असले, तरी कोकण टप्प्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ज्या आक्रमकपणे शिंदेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नसल्याचे दिसले.

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे एकटेच हुकमी एक्के आहेत आणि त्यांच्यावरच सर्व मदार आहे, असे चित्र आहे. ते जिथे जातात तिथे कामगिरी उत्तम होते, ते जिथे जात नाही तिथे त्या पक्षाला यश मिळत नाही. विदर्भात पक्षाने जे यश मिळवले ते संघटनेचे यश आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमंत्री म्हणून जी दमदार कामगिरी सध्या नोंदवली आहे. त्याचेही ते फळ आहे. चंद्रपूरसारख्या परंपरागत भाजपचा गड असलेल्या जिल्ह्यामधली पडझड अजूनही सावरली जात नाही, हे भाजपसाठी समाधानकारक नाही. हे निकाल महानगरपालिकेच्या तयारीचे सूत्र असतील. त्यामुळे येत्या काळामध्ये विशेषतः तीन आठवड्यांमध्ये जो काय धुरळा उडेल, जी काय वावटळ उठेल, त्यात कोणते पक्ष टिकतात आणि कोणते हरतात, ते बघायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news