Municipality result | कोकणात प्रस्थापितांना धक्का

Konkan vartapatra
Municipality result | कोकणात प्रस्थापितांना धक्का
Published on
Updated on

शशिकांत सावंत

दक्षिण कोकणातील सावंतवाडीपासून ते उत्तरेकडील डहाणूपर्यंत सर्वच नगरपालिकांत ज्यांची प्रस्थापित सत्ता होती, तेथे बदल झालेले पाहायला मिळतात.

कोकणातील 27 नगरपालिकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचा जो मूळ अन्वयार्थ सर्वांसमोर आला, त्यामध्ये प्रस्थापितांना धक्का बसल्याचे चित्र सर्वत्रच जाणवले. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत सर्वच नगरपालिकांत ज्याची प्रस्थापित सत्ता होती, तेथे बदल झालेले पाहायला मिळतात. सावंतवाडी, वेंगुर्लेत माजी मंत्री दीपक केसरकर, कणकवलीत मत्स्य विकासमंत्री नितेश राणे, राजापुरात विद्यमान आमदार किरण सामंत, गुहागरमध्ये माजी मंत्री भास्कर जाधव, श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे, ठाण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे, डहाणूत भाजपला या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला आहे.

कोकणात एकूण पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये शहरी मतदारांचा कौल सांगणारी ही निवडणूक होती. प्रामुख्याने प्रभावशाली नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळाली. सत्ताधारी भाजप-शिवसेनेत अहंकाराची लंका जाळून टाकण्याची भाषा वरिष्ठ नेत्यांकडून झाली. यातून जयपराजयाचे जे निकाल आले, त्यामध्ये अंहकाराचे दहन कुणाचे झाले याचा अन्वयार्थ काढताना प्रस्थापितांना मिळालेले धक्के हा अतिआत्मविश्वासाचा पराभव झाल्याचे चित्र दिसत होते.

मालवणमध्ये पहिल्याच टर्ममध्ये निवडून आलेल्या नीलेश राणे यांनी कणकवली, मालवण जिंकत आपला करिष्मा दाखवला; तर दुसर्‍या बाजूला दीपक केसरकरांना पराभवाचे धक्के बसले. असाच पराभव अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग, मुरुडमध्ये; तर कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना, उरणमध्ये आमदार महेश बालदी यांना घरच्या नगरपालिकांमध्ये पराभव पाहावा लागला. हा एकप्रकारे अहंकाराचाच पराभव होता. मंत्री भरत गोगावलेंनी महाडची, तर मंत्री उदय सामंतांनी रत्नागिरीची नगरपालिका राखत आपली प्रतिष्ठा जपली; तर वाडा आणि जव्हार नगरपालिका जिंकून खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी आपल्या कारकिर्दीत पक्षाला मोठे यश मिळवून दिले. जमिनीवर पाय ठेवून काम करणार्‍या नेत्यांना लोकांचे पाठबळ मिळेल, हेही या निवडणुकीत दिसून आले. पेणमध्ये माजी मंत्री व विद्यमान आमदार रवी पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील यांना यश मिळाले. आमदार थोरवेंनी कर्जत गमावले असले, तरी खोपोली, माथेरान मिळवले आहे, ही त्यांची जमेची बाजू म्हणता येईल. एकूण कोकणात झालेल्या या निवडणुकांनी कुणाला धक्के, तर कुणाला विजयाचा सुखद आनंद अनुभवता आला. त्यामागे युतीच्या नेत्यांनी सांगितलेल्या, अहंकारी लंकाधीशांच्या कथेचाच परिपाक होता.

आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामध्ये महामुंबईतील ज्या 8 महापालिका समाविष्ट आहेत. त्या सर्व महापालिकांचे कौल राजकीय पक्षांसाठी तेवढेच महत्त्वाचे ठरणारे आहेत. त्याचे कारण कोकणातून विधानसभेला येणार्‍या 75 जागांपैकी या एमएमआर रिजनमध्ये जवळपास 55 जागा आहेत. त्यामुळे या मतदारांचा कौल हा राजकीय पक्षांच्या जनाधारासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

नगरपालिका निवडणुकांत शिवसेना-भाजपने एकमेकांविरुद्ध लढत समान ताकद दाखवली. 27 पैकी भाजपचे सात ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले, तर शिंदे शिवसेनेचे 8 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले. त्यामुळे दोघांचीही ताकद दिसून आली आहे. या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यामुळे त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढली आहे. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये महायुती होणार की पुन्हा हे दोन पक्ष आमने-सामने येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीमध्ये बेकीचे राजकारण मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने दोन नगरपालिका, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक नगरपालिका मिळवली. त्यामुळे विरोधकांच्या एकूण चार नगरपालिका झाल्या आहेत. हे यश तसे अल्पच आहे, तरीही काँग्रेसने मुंबईत वेगळा सूर आळवला आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ठाकरे ब—ँडची चर्चा जोरात सुरू असताना, काँग्रेसच्या एकला चलो रे भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या स्थितीत होणारी ही निवडणूक विरोधी पक्षांनाही आव्हानात्मक असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news