

सुरेश पवार
पी. चिदंबरम, शशी थरूर आणि सलमान खुर्शीद हे काँग्रेस पक्षातील बडे नेते, त्यांची अलीकडील वक्तव्ये काँग्रेस पक्षाबरोबर इंडिया आघाडीलाही हादरे देणारी आहेत आणि काँग्रेसबरोबर इंडिया आघाडीची चिंता वाढविणारी आहेत. केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत खासदारांची प्रतिनिधी मंडळे परदेशी पाठविण्याचे ठरविले आहे. या प्रतिनिधी मंडळात शशी थरूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय भुवया उंचावणारा आहे. त्याचे काही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
‘घर का भेदी, लंका ढाये’ अशी एक म्हण हिंदीत रूढ आहे. घरातील एखाद्या मातब्बराने शत्रू पक्षाशी हातमिळवणी केली की, मग त्या घराच्या दुर्दशेला पारावर राहत नाही. पक्षातील असे निखारे केव्हा आग लावतील, हे कळायचेसुद्धा नाही. एकेकाळचा बलाढ्य काँग्रेस पक्ष दुर्बल झाला असतानाच पक्षाला घरभेदींनी ग्रासले आहे आणि त्यांच्या उद्योगानी काँग्रेस ज्या इंडिया आघाडी या विरोधी आघाडीतील प्रमुख पक्ष आहे, त्या आघाडीलाही हादरे बसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, सलमान खुर्शीद यांनी अलीकडेच जी वक्तव्ये केली, ती काँग्रेस विरोधकाने करावीत अशा थाटात केली आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी पक्ष संघटनेच्या भावी वाटचालीबद्दल आणि इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत.
सलमान खुर्शीद आणि युवक काँग्रेसचे एक नेते मृत्युंजय सिंह यादव यांनी एक पुस्तक लिहिलेले आहे. ‘कंटेस्टिंग डेमॉक्रेटिक डेफिसीट’ हे त्या पुस्तकाचे नाव. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडी कमजोर आणि कमकुवत होत असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडे जात असल्याचेही चिदंबरम यांचे म्हणणे आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या एखाद्या विरोधकाने अशी वक्तव्ये करणे शोभून दिसले असते; पण अशी अवसानघातकी वक्तव्ये चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना शोभणारी नाहीत. याविषयी दुमत व्हायचे कारण नाही. आता आत्मपरीक्षणासाठी आपण असे विधान केल्याची मखलाशी चिदंबरम करू शकतात. तथापि, ‘बूँद से गयी, सो हौद से आती नही’ हे खरेच आहे.
सलमान खुर्शीद माजी परराष्ट्रमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेेते. त्यांनीही चिदंबरम यांच्या सुरात सूर मिसळला. त्यांनीही इंडिया आघाडीविषयी शंका व्यक्त करीत टीकाटिपणी केली. आधी पूर्व प्राथमिक मुद्द्यांवर सहमती घडवून मग अधिक महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार व्हावा, असा शहाजोग सल्ला देत सलमान खुर्शीद यांनी एकप्रकारे आघाडीच्या कामकाजावर प्रश्नचिन्हच उपस्थित केले. या पुस्तकाचे सहलेखक आणि युवक काँग्रेसचे नेते मृत्युंजय सिंह यादव यांनीही मग या दोघांची री ओढली तर आश्चर्य नाही.
इंडिया आघाडीचे वर्म काढतानाच चिदंबरम यांनी भाजपवर स्तुतिसुमने उधळली. मतदान बूथपर्यंत भाजपची ताकद आहे. लोकशाही राजवटीत जेवढी शक्तिशाली संघटना असायला हवी तेवढी ती आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपची प्रशंसा केली. एवढेच नव्हे, तर मतदानात थोडीफार गडबड होऊ शकते; पण भारतासारख्या विशाल देशात ते शक्य नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला. भाजपला एकप्रकारे हे प्रशस्तीपत्रच दिले. एका विरोधी नेत्याचे हे प्रशस्तीपत्र आहे की, भाजपच्या नेत्याचे उद्गार आहेत, अशी शंका यावी, असा हा मामला आहे.
याही आधी काँग्रेसचे आणखी एक नेते शशी थरूर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रशंसा केली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पाकिस्तान आणि जगाला जबरदस्त संदेश आहे, या शब्दातील थरूर यांनी केलेल्या स्तुतीवर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त केली आणि काँग्रेस कार्यकारिणीतही त्यावर चर्चा झाली. मग, आपले हे विधान हे आपले स्वतःचे मत आहे, पक्षाचे नव्हे, असा खुलासा थरूर यांना करावा लागला. अर्थात, तो मानभावीपणा झाला.
पक्षाने दिलेली मंत्रिपदे आणि अन्य पदे दीर्घकाळ उपभोगलेले काँग्रेसचे असे ज्येष्ठ नेते पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाहीर विधाने करीत आहेत आणि सत्तारूढ भाजपची भलावण करीत आहेत. पक्षासाठी हा धोक्याचा कंदील आहे. काँग्रेस पक्षातील हे घरभेदी म्हटले पाहिजेत आणि पक्ष नेतृत्वाने त्याची वेळीच गंभीर दखल घेतली नाही, तर कुंपणावर बसलेल्या अनेकांना कंठ फुटल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेस पक्षातून सध्या आऊटगोईंग जोरात सुरू आहे. त्यात खंड पडलेला नाही. सत्तेवाचून काँग्रेस नेता राहू शकत नाही, असेही म्हटले जाते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना सत्तेची पदे मिळाल्याची भरपूर उदाहरणे आहेत. आता पक्षात काही चैतन्य राहिलेले नाही, अशीही काहींची धारणा होत चालली आहे. चिदंबरम, खुर्शीद, थरूर आदींच्या वक्तव्यातून त्यांचीही अशीच भावना असेल काय, असेही तर्क व्यक्त होत आहेत. त्यात काही चुकीचे म्हणता येणार नाही.
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच इंडिया आघाडीवर विसंवादी सूर उमटत असताना आणि भाजपची प्रशस्ती होत असताना भारतीय जनता पक्षाने धूर्तपणाने आक्रमक चाल रचली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत परदेशी पाठवायच्या खासदारांच्या प्रतिनिधी मंडळात काँग्रेसचे शशी थरूर आणि खा. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांची मोठ्या चतुराईने निवड करण्यात आली आहे. आता या निवडीमागे भाजपचे काय धोरण असेल, हे सहजच समजण्यासारखे आहे. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही.
काँग्रेस पक्षात कोणाचा पाय कोणाच्या पायपोसात नाही, अशीच स्थिती राहिली, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. आधीच पक्ष विकलांग झालेला आहे. तो आणखी दुबळा होईल. बिहार विधानसभेची निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर आहे. भाजपने त्याची जय्यत तयारी चालवली आहे, तर काँग्रेस पक्षाने अजून नारळ वाढविण्याचीही तयारी केलेली नाही. इंडिया आघाडी ही निवडणूक लढवणार, त्याची काही पूर्व तयारी दिसत नाही आणि अशीच परिस्थिती राहिली, तर घटक पक्षांसमवेत जागा वाटप करताना काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागेल. दुर्दैवाने बिहारमध्ये काँग्रेस पक्षाला विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले, तर ती उंटाच्या पाटीवरची शेवटची काडी ठरेल.