

(उबाठा शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात हळू आवाजात झालेला गुप्त संवाद)
संजय (उबाठा) : काय प्रकाश, तुमच्या राजसाहेबांचा फोन आला की मुख्यमंत्री लगेच येतात म्हणे!
प्रकाश (मनसे) : मग? मुख्यमंत्री आहेत ते. फोन उचलतात, भेटायला येतात. त्यात आश्चर्य काय?
संजय : शेलार म्हणतात, राजसाहेबांनी बोलावलं की फडणवीस येतात. आणि राजसाहेब म्हणतात, फडणवीस माझं ऐकतात ही दंतकथा आहे. म्हणजे नेमकं काय समजायचं?
प्रकाश : अरे, एखाद्याला भेटायला जाणं आणि त्याचं सगळं ऐकणं यात फरक असतो.
संजय : तुमच्या राजसाहेबांनीही जरा स्पष्ट बोलावं. मुख्यमंत्र्यांशी एवढं सख्य असेल तर ते मान्य करायला काय हरकत आहे?
प्रकाश : सख्य आणि राजकीय भूमिका वेगळ्या असतात. पूर्वीही भेटी, चर्चा, कौतुक, टीका झालीच की... हातात हात घातला म्हणून हात कायमचा धरून ठेवला, असं थोडंच आहे?
संजय : म्हणजे मुख्यमंत्री तुमच्या राजसाहेबांचं ऐकत नसतील; पण त्यांना भेटायला मात्र वेळ काढतात.
प्रकाश : निमंत्रण मिळणं महत्त्वाचं की निमंत्रण देण्याची ताकद असणं? राजसाहेबांबाबत दोन्हींची चर्चा होतेय!
संजय : परवा मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना कलेत लक्ष घालायला सांगितलं... राजकारण मी बघतो म्हणाले...
प्रकाश : २०२९ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले तर त्यांना पुन्हा पुन्हा बोलवायला आवडेल, असे राजसाहेबही म्हणालेच की...
संजय : म्हणजे मुख्यमंत्री राहिले तर बोलवणार; पण ऐकतात हे मान्य करणार नाही. भारीच दंतकथा!
प्रकाश : पण एक आहे, राजसाहेबांचा प्रभाव दिसतोच की!
संजय : प्रभाव असेलही; पण तो मुख्यमंत्र्यांवर आहे की त्यांच्या वेळापत्रकावर, हे अजून स्पष्ट व्हायचंय!
प्रकाश : राजसाहेबांचा फोन म्हटल्यावर चर्चा तर होणारच!
संजय : मग आता राजसाहेबांनी फोन करणं बंद करावं.
प्रकाश : का?
संजय : म्हणजे मुख्यमंत्री आले नाहीत, तर फोन केला नव्हता असं सांगता येईल. आणि आलेच, तर…
प्रकाश : तर काय?
संजय : तर शेलार म्हणतील, राजसाहेबांचा फोन होता. मुख्यमंत्री म्हणतील, मी सहज आलो. आणि राज ठाकरे म्हणतील- ‘मी कुठे बोलावलं होतं? ही दंतकथा आहे!’