

अपर्णा देवकर
सावित्रीबाई फुले केवळ जोतिरावांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि खर्याअर्थाने स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण चळवळीच्या जननी होत्या. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त...
भारतीय समाजव्यवस्थेच्या इतिहासात 19 वे शतक हे परिवर्तनाचे आणि वैचारिक घुसळणीचे होते. या काळात सनातनी वृत्ती आणि अमानवीय रूढींच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे अभूतपूर्व कार्य महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई केवळ जोतिरावांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि खर्याअर्थाने स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण चळवळीच्या जननी होत्या. सावित्रीबाईंचा जन्म दि. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या काळातील पद्धतीनुसार वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह जोतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंचे माहेरचे आडनाव नेवसे होते. लग्नानंतर जेव्हा त्या पुण्यात आल्या, तेव्हा त्यांच्यातील शिक्षणाची ओढ जोतिरावांनी ओळखली. ‘स्त्री शिकली तर धर्म बुडेल’ अशा मानसिकतेच्या समाजात जोतिरावांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन सावित्रीबाईंना साक्षर केले. ती एका महाक्रांतीची पूर्वतयारी होती.
दि. 1 जानेवारी 1848 रोजी फुले दाम्पत्याने पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी जबाबदारी स्वीकारली. शाळेत शिकवण्यासाठी जाताना त्यांच्यावर शेणगोळे फेकले गेले, दगडगोटे मारले गेले, तरीही त्यांनी आपला निश्चय ढळू दिला नाही. सावित्रीबाई मूलतः क्रांतिकारी विचारवंत आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्गात्या होत्या. विषमतेने पोखरलेल्या समाजात स्त्रिया आणि शोषितांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर जो संघर्ष केला, तो आजही मानवी मूल्यांच्या जडणघडणीत मैलाचा दगड ठरला आहे.
18व्या आणि 19व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय क्रांतीने ज्या नव्या जगाची स्वप्ने पाहिली होती, त्या स्वप्नांना भारतात प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस सावित्रीबाईंनी दाखवले. अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या देशाला मुक्त करण्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या लेखणीने आणि कार्यशैलीने वर्णव्यवस्था आणि सांस्कृतिक वर्चस्ववादावर प्रखर प्रहार केला. त्यांच्या कृतिशील प्रयत्नांनी समाजाला मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर काढून आधुनिकतेच्या वाटेवर आणण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. ज्या काळात स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू मानले जात होते, अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समानता आणि स्वातंत्र्याचा विचार मांडून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली.
पितृसत्ताक समाजात स्त्रियांचे होणारे दुहेरी शोषण थांबवण्यासाठी त्या एक खंबीर आवाज बनल्या. त्याकाळी विधवांची स्थिती दयनीय होती. विधवा विवाह निषिद्ध असल्याने आणि शोषणातून जन्माला येणार्या अर्भकांना समाजात स्थान नसल्याने अनेक स्त्रिया आत्महत्या करत किंवा बालहत्या होत. 1863 मध्ये फुले दाम्पत्याने स्वतःच्या घरात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले, जेणेकरून समाजाकडून बहिष्कृत झालेल्या विधवा सुरक्षितपणे बाळांना जन्म देऊ शकतील आणि त्यांच्या मुलांचे संगोपन करू शकतील. इतकेच नव्हे, तर काशिबाई नावाच्या एका विधवेच्या पुत्राला त्यांनी दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला.
सावित्रीबाईंनी घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. समाजातील विकृती आणि दोष दूर करण्यासाठी शिक्षण हेच मुख्य साधन आहे, अशी त्यांची धारणा होती. सावित्रीबाईंची लढाई ही केवळ व्यक्तींविरुद्ध नव्हती, तर ती जातीय व्यवस्था, सर्वसत्तावाद आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात होती. आजही समकालीन भारतासमोर जेव्हा जाती आणि लिंगभेदाची आव्हाने उभी ठाकतात, तेव्हा सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ ठरतात. त्यांचा संघर्ष मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी सदैव प्रेरक राहील.