Savitribai Phule | सावित्रीबाईंचे योगदान आणि आपण

Savitribai Phule |
Savitribai Phule | सावित्रीबाईंचे योगदान आणि आपण
Published on
Updated on

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीमुळे स्त्रियांना नवे आकाश मिळाले. आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिदिन. त्यानिमित्त...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका तर होत्याच; पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे त्या या मातीतील प्रबोधनाच्या पहाटेचा पहिला किरण होत्या. त्यांनी सोसलेल्या अतोनात कष्टांतून आणि अपमानातून दीनदलित, शूद्र आणि उपेक्षितांसाठी शिक्षणाची जी गंगा प्रवाहित झाली, तिच्याच तीरावर आजच्या पिढीतील महिलांच्या कर्तृत्वाच्या इमारती उभ्या आहेत. सावित्रीबाईंचा लढा हा केवळ अक्षरांचा नव्हता, तर तो माणसाला माणूसपण मिळवून देण्याचा महासंग्राम होता. आज त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आठव करताना त्यांच्या त्या संघर्षाची मशाल नेमकी कुठे आहे आणि तिचे तेज आपल्या मनात किती आहे, याचा विचार करणे अनिवार्य ठरते.

सावित्रीबाईंच्या अजोड त्यागामुळे आजच्या लेकी मोठ्या महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. कोणी डॉक्टर, वकील, तर कोणी वरिष्ठ सनदी अधिकारी होऊन समाजव्यवस्थेत आपले स्थान निर्माण करत आहेत. मात्र, या बाह्य बदलांच्या झगमगाटात सावित्रीबाईंना जे अभिप्रेत होते, ते आपण खरंच साध्य करू शकलो का, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. हातातील पदवीची प्रमाणपत्रे घेऊन आपण केवळ वरवरच्या भौतिक बदलात रमलो आहोत की काय, अशी शंका येते. ज्या काळात स्त्रीचा जन्म म्हणजे पाप आणि शिक्षण म्हणजे धर्मद्रोह मानला जायचा, त्या काळात सावित्रीबाईंनी जोतिरावांच्या खांद्याला खांदा लावून परिवर्तनाची वाट चोखाळली. सनातन्यांचा छळ, शेण-दगडांचा मारा आणि सामाजिक बहिष्कार सोसूनही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. ही सहनशीलता आणि जिद्द आजच्या पिढीतील आपल्याकडे उरली आहे का, याचे उत्तर शोधावे लागेल.

आज आपल्याला थोडे जरी संकट आले किंवा संघर्षाची वेळ आली की आपण तत्काळ सूडबुद्धीने पेटून उठतो. मात्र, अंगावर फेकलेले शेण निमूटपणे पुसून, दुसरे वस्त्र बदलून पुन्हा मुलींना शिकवायला उभे राहण्याचे धाडस फक्त सावित्रीच करू जाणे. आज आपण सुरक्षित जगण्याच्या नादात सामाजिक बांधिलकीचा संघर्षच विसरून गेलो आहोत की काय, असे वाटते. छत्रपती शिवाजी महाराज शेजारच्या घरात जन्माला यावेत, अशी जशी आपली सुप्त इच्छा असते, तसेच सावित्रीबाईंचे विचारही केवळ पुस्तकात वाचायलाच आपल्याला हवे असतात. ते प्रत्यक्षात जगताना होणारा त्रास मात्र नकोसा वाटतो. स्वतःचे हित जपण्याच्या नादात आपण सामूहिक सामाजिक जाणिवेपासून दूर चाललो आहोत की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

सावित्रीबाईंनी जातीपातीच्या भिंती तोडल्या, त्या अनाथांच्या माऊली झाल्या आणि विधवांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी सनातन्यांच्या पोथीनिष्ठ विचारांचा पराभव केला. मात्र, आजही गरिबी अनेकांच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळा ठरत आहे. सामाजिक विषमता इतकी टोकाला पोहोचली आहे की, गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही की काय, असे चित्र उभे राहते. जागतिक साथीच्या काळात गरिबांचे झालेले हाल आणि कुपोषणाने आजही दगावणारी बालके पाहिली की सावित्रीबाईंच्या वारसदारांचा लढा आजही संपलेला नाही, याची प्रचिती येते. काळ बदलला, प्रश्न बदलले तरी संघर्षाचे स्वरूप तेच राहिले आहे.

सावित्रीबाईंच्या संघर्षातून झेप घेतलेल्या आजच्या शिक्षित पिढीने केवळ स्वतःचा उत्कर्ष न पाहता समाजातील वंचितांसाठी आपले योगदान देण्याची खरी गरज आहे. केवळ त्यांचे पोवाडे गाऊन किंवा त्यांचे विचार डोक्यावर घेऊन चालणार नाही, तर ते विचार कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. विशाल दृष्टी हरवून आपण केवळ स्वतःच्या स्वार्थात धन्यता मानत आहोत. सावित्रीबाईंच्या संघर्षाचे बीज मनामनांत रुजले आणि पुन्हा एकदा माणुसकीच्या आणि समतेच्या वाटा उजळल्या, तरच त्यांच्या त्यागाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ औपचारिक अभिवादन न करता, त्यांच्या संघर्षाची वाट चालण्याचे नैतिक बळ मिळवणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news