Marathi schools | मराठी शाळा टिकवण्यासाठी...

Marathi schools |
Marathi schools | मराठी शाळा टिकवण्यासाठी...
Published on
Updated on

पूजा पाटील

मराठी की, इंग्रजी या वादापलीकडे जाऊन दोन्ही भाषांचा समतोल साधणे ही आजच्या शिक्षणाची खरी गरज आहे.

आजच्या आधुनिक काळात शिक्षणाचे माध्यम हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. मुलांना कुठल्या शाळेत घालायचे, ‘मराठी माध्यम की, इंग्रजी माध्यम?’ हा प्रश्न अनेक पालकांसमोर उभा राहतो. बहुतांश पालक इंग्रजी माध्यमाकडे वळताना दिसत आहेत. हळूहळू मराठी शाळाही कमी होत आहेत. भविष्यात मराठी शाळा टिकवायच्या असतील, तर मराठी शाळेत इंग्रजी भाषेची गुणवत्ता सुधारली पाहिजे. खरं पाहता, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच, ‘मराठी की, इंग्रजी’ हा प्रश्न नसून ‘मराठी आणि इंग्रजी’ असा विचार करणे अधिक योग्य ठरेल.

काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात; पण त्यांना स्वतःची मातृभाषा म्हणजेच मराठी लिहिताना अडचणी येतात. साधे उकार, वेलांटी यांसारख्या मूलभूत गोष्टींबद्दल शंका विचारताना दिसतात. कधी कधी एखादी दोन किंवा तीन अंकी संख्या मराठीत सांगितली, तरी त्यांना समजत नाही. ते विचारतात, ‘या संख्येला इंग्रजीत काय म्हणतात?’ ही गोष्टही चिंताजनक आहे. म्हणूनच कोणतीही एक भाषा पुरेशी नाही. मराठी माध्यम आणि इंग्रजी या दोन्हींचा योग्य समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे. मराठी ही आपली ओळख, संस्कृती आणि विचारांची भाषा आहे, तर इंग्रजी ही जागतिक स्तरावर संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. आपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे गरजेचे आहेच, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची समज अधिक चांगली होते. विचारशक्ती वाढते. तसेच, लहानपणी आपल्या भाषेत शिकल्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. परंतु, आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व खूप वाढले आहे. कोणतेही पालक मराठी शाळेच्या विरोधात नसतात; पण उच्च शिक्षण, नोकरी आणि जागतिक पातळीवरील संधी मिळवण्यासाठी इंग्रजीत प्राविण्य असणे आवश्यक आहे. याच कारणामुळे अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाकडे वळवतात. म्हणूनच मराठी शाळांमध्ये इंग्रजी भाषेचे दर्जेदार आणि व्यावहारिक ज्ञान देणे अत्यावश्यक आहे. शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल केला नाही, तर केवळ शाळाच नाही, तर कालांतराने मराठी भाषादेखील संपुष्टात येईल.

मराठी माध्यमात शिकूनही मोठे यश मिळवता येते; पण त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. मराठी शाळेत शिकलेली अनेक मुले परदेशात जातात. तसेच इंजिनिअर, डॉक्टर पदवी मिळवतात. परंतु, हे सगळे साध्य होण्यासाठी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अधिक कष्ट हे घ्यावेच लागतात. बर्‍याचदा आपण बघतो की, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवताना काही विद्यार्थ्यांकडे भरपूर ज्ञान असते; पण इंग्रजीतील संवाद कौशल्य कमी असते. त्यामुळे त्यांना नोकरी मिळवताना अडचणी येतात. तर काही विद्यार्थ्यांकडे त्यांच्यापेक्षा कमी ज्ञान असूनही फक्त इंग्रजीच्या जोरावर ते नोकरी मिळवतात. मराठी शाळांमध्ये इंग्रजी विषय प्रभावीपणे शिकवला गेला, तरच लोकांचा द़ृष्टिकोन बदलू शकतो. एक उदाहरण द्यायचे झाले, तर इंग्रजीप्रमाणेच हिंदी ही रोजच्या जीवनातील बोलीभाषा नाही; पण आपण ती चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि समजू शकतो. कारण, लहानपणापासूनच टीव्हीवर कार्टून, चित्रपट इत्यादींमधून आपण ती आत्मसात केलेली असते. रोजच्या शाळेच्या वेळापत्रकात इंग्रजीसाठी वेळ देऊन त्यात चांगले प्रशिक्षण दिले, तर नक्कीच फायदा होईल. मराठी शाळेत इंग्रजीचे चांगले प्राध्यापक असणे ही काळाची गरज आहे. फक्त पुस्तकापुरते इंग्रजी न ठेवता, बोलणे, ऐकणे, लिहिणे आणि समजून घेणे या सर्व गोष्टींवर भर दिला पाहिजे. मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी इंग्रजी भाषेची गुणवत्ता सुधारणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. जर मराठी शाळांनी हे वास्तव स्वीकारून शिक्षणपद्धतीत बदल केला, तर नक्कीच पालकांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल. म्हणूनच, मराठी माध्यम आणि इंग्रजीतील प्राविण्य यांचा समतोल साधणे ही काळाची गरज आहे. ‘बदल केला तरच बदल घडेल’ हाच संदेश यातून देता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news