अजब व्यवहार

एका महिला सरपंचाने चक्क काही एक रक्कम घेऊन ग्रामपंचायत दुसर्‍याला चालवायला दिली
Sarpanch Authorizes Another Person To Run Panchayat For Money
अजब व्यवहारPudhari File Photo
Published on
Updated on

सध्याचे युग हे मार्केटिंगचे युग आहे, असे म्हणतात. प्रत्येक जण काही ना काही तरी विकण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसभरात तुम्हाला असंख्य फोन कॉल येतात, ज्यामध्ये कोणतीतरी वस्तू विकण्याचा प्रयत्न केलेला असतो. काही काही खात्यांमध्ये पोस्टिंग विकल्या जातात. होय, चक्क बोली लावून विकल्या जातात. विशिष्ट पोस्ट मिळाली म्हणजे भरपूर कमाई असते आणि अशी मलईदार पोस्ट मिळण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, हे आपण ऐकून होतो, तरीही एखाद्याने किंवा एखादीने आपण चालवत असलेली ग्रामपंचायतच दुसर्‍याला चालवायला देण्यासाठी विकली असे कधी ऐकिवात नव्हते. आता तोही प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका महिला सरपंचाने हा अजब चमत्कार घडवून आणला आहे. या महिला सरपंचाने चक्क काही एक रक्कम घेऊन ग्रामपंचायत दुसर्‍याला चालवायला दिलेली आहे. करोड या नावाच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लक्ष्मीबाई असे नाव असलेल्या या महिला सरपंचाने ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रणवीरसिंह या व्यक्तीला सरपंचपदाचे अधिकार विकल्याचे समोर आले आहे. ही बातमी ऐकताच देशातील तमाम सरपंच मंडळींना अत्यानंद झाला असेल.

आपल्याला शेती करणे होत नसेल, तर ती दुसर्‍याला करायला देण्यासारखा हा प्रकार आहे. शेती करायला देण्यासाठी दोन प्रकार असतात. एक म्हणजे बटईने आणि दुसरे म्हणजे खंडाने. बटई प्रकारामध्ये शेतमालकाला भागीदाराबरोबर पैसेही खर्च करावे लागतात आणि आलेल्या उत्पन्नामध्ये 50 टक्के वाटा मिळत असतो. खंड प्रकारामध्ये तुला काय नुकसान किंवा फायदा होईल ते होवो; परंतु तू अमुक इतके पैसे दर वर्षाला मला द्यायचे असा करार असतो. सदर महिला सरपंचांनी असा काही करार केल्याचे ऐकिवात आलेले नाही.

आजकाल कोणतीही गोष्ट कागदोपत्री मजबूत केल्याशिवाय त्याला काही अर्थ उरत नाही. सदर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे अधिकार रणवीरसिंह यांना विकताना विकण्याबद्दलचा करार त्यांनी चक्क 100 रुपयांच्या मुद्रांकावर लिहून घेतलेला आहे. रणवीरसिंह हे कंत्राटदार आहेत आणि ग्रामपंचायत चालवण्याच्या बदल्यात त्यांनी लक्ष्मीबाईंचे वीस लाखांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिलेले आहे. शिवाय त्याला जी काही कंत्राटे मिळतील त्यातील पाच टक्के कमिशन तो लक्ष्मीबाईला देणार आहे. आहे की नाही गंमत?

खूप राजकारण करून, आटापिटा करून सरपंचपद मिळवायचे आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये झालेला खर्च वसूल करून घ्यायचा यापेक्षा मिळालेल्या सरपंचपदाचे नगदी पैसे घ्यायचे आणि ग्रामपंचायत दुसर्‍याला विकून टाकायची हा प्रकार अद्याप महाराष्ट्रातील कोणा सरपंचाच्या ध्यानात आलेला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news