

विद्याधर काकडे
ज्ञानेश्वर समकालीन नामदेव हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व श्रेष्ठ संत म्हणून मानले जातात. महाराष्ट्रातील संत परंपरा ही महाराष्ट्रातील संस्कृतीचे खरे वैभवच म्हणावे लागेल. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करून नित्याचे व्यवहार करीत असतानाच परमेश्वराचे चिंतन करावे. समाजात उच्च-नीच भाव नसावा. एका परमेश्वराची सर्व लेकरे मग विषमता कशासाठी, अशी भागवत धर्माची समतेची शिकवण या संत परंपरेने महाराष्ट्रात रुजविली. यामध्ये संत नामदेवांचे महाराष्ट्रातील अपूर्व कार्य सर्वश्रुतच आहे. त्यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा आज (23 जुलै) देशभरात साजरा होत आहे.
संत नामदेवांच्या कार्याचा, चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उमटतात. त्यांच्या कार्याची महती फार मोठी आहे. नामदेवांचा जीवनपट, त्यांच्या अभंगाचे सौंदर्यग्रहण, लोककाव्य चरित्रकार नामदेव कुटकविता प्रतिमासृष्टी, नामदेवांची अमृतवचने, त्यांच्या कुटुंबीयांची कविता, नामदेवांचा मानवतावाद, पंजाबमधील प्रबोधन कार्य वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचा परामर्श घेणे कठीण असले, तरी त्यांच्या कार्याचे संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठातर्फे नामदेव अध्यापन समिती स्थापन केली आहे. ज्ञानदेव व नामदेव हे एकाच कालखंडातील असले, तरी ज्ञानदेवांनी अल्पवयात समाधी घेतल्याने त्यांच्या रूपानेच त्यांचे कार्य नामदेवांनी पुढे चालविले. सुमारे 80 वर्षांचे आयुष्य लाभल्याने त्यांना कार्य करण्यास भरपूर संधी प्राप्त झाली. संत नामदेवांनी आपले कार्य विशिष्ट जातीपुरते, समाजापुरते न करता अनेक जातीबांधवासाठी केले आहे.
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी उत्तरेकडे प्रयाण केले. फार प्राचीन काळापासून मराठी माणसाला पंजाब प्रांताची ओढ आहे. पंजाब व महाराष्ट्र यांच्या मधील संबंध फार जुना आहे. नामदेवांनी बराच काळ गुजरात, माळवा संयुक्त प्रांतामध्ये परिभ—मण करण्यात घालविला. पंजाबमधील धुमान येथे ते पंधरा वर्षे राहिले. या वास्तव्यात त्यांनी हिंदी पद्य रचना, अभंग रचना केली. शिखांचे धर्म संस्थापक गुरू नानकदेव कर्नाटकातील बिदर या गावी येऊन गेले होते. आजही त्या ठिकाणी गुरुनानक मंदिर आहे. संत नामदेव इ.स. 1270 ते 1350 या कालावधीत पंजाबमधील वास्तव्यास होते. पंजाबी भाषेत प्रसिद्ध झालेल्या ‘जनमसारखी’ या ग्रंथात हा उल्लेख मिळतो. नामदेव तीर्थ यात्रा करीत मथुरेतून द्वारकेत गेले. तिथून पंजाबमध्ये अमृतसर जिल्ह्यातील भटिंडा या गावी प्रथम गेले व त्या ठिकाणी त्यांची प्रशंसा झाली. या तीर्थ क्षेत्राच्या प्रवासामध्ये त्यांना जल्लो आणि लद्धा असे शिष्य मिळाले. त्यांच्या समवेत धुमान येथे ते स्थायिक झाले.
शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहेब’ या ग्रंथात संत नामदेवांची जी एकसष्ठ हिंदी पदे आहेत, त्यात एकूण 16 संत कवींच्या पदाचा समावेश आहे. त्रिलोचन, रामानंद, जयदेव, नामदेव, संत कबीर, रोहिदास, पीपा परमानंद, धला, साधना, नानक भीरनन फरीद, वेणी आणि सूरदास असे 16 संतकवी आहेत. संत नामदेवांची 61 पदे ही ‘बाबा नामदेवजीकी मुखवाणी’ म्हणून पंजाबात ओळखली जातात. या पदातून नामेदवांनी पंढरीच्या विठ्ठलाचा पंजाबात सर्वप्रथम नामघोष केला आहे. ‘जिकडे पाहे तिकडे अवघा विठोबा!’ सर्व देहात आणि वस्तूत एक परमेश्वर निरंतर भरला आहे. दक्षिणेत भक्तीची गंगा निर्माण झाली. ती उत्तरेत नेण्याचे भगीरथ प्रयत्न संत नामदेवांनी केले. त्याचा ऋणानुबंध पंजाब आणि उत्तरेतील राज्यांनी जोपासावा. हिंदीमध्ये भक्त विचार परंपरेची सुरुवात प्रथम संत नामदेवांनी केली आणि ते दीपस्तंभासारखे उभे राहिले. पंजाबमध्ये ‘गुरू ग्रंथसाहेब’इतकीच संत नामदेव यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे.