Sanjay Shirsat | शिरसाटांचे पक्षातील वजन घटले!

Marathwada
शिरसाटांचे पक्षातील वजन घटले!Pudhari File Photo
Published on
Updated on

विनोद काकडे

एकेकाळी संभाजीनगरात ‘वजनदार’ मानले जाणारे संजय शिरसाट आज पक्षांतर्गत आव्हानांना सामोरे जात आहेत. मंत्रिपद आणि प्रवक्तेपदामुळे वाढलेली प्रतिमा वादग्रस्त प्रकरणे आणि निवडणूक निकालांनंतर ढासळताना दिसते. तिकीटवाटपातील मतभेद आणि महापालिका निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या प्रभावातील घट अधोरेखित केली आहे.

राजकारणात प्रतिमा उभी करायला वर्षानुवर्षे लागतात; पण ती ढासळायला एक क्षण पुरतो. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे समाजकल्याणमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासंदर्भात सध्या अशीच चर्चा सुरू आहे. एकेकाळी पक्षात ‘वजनदार’ मानले जाणारे शिरसाट आज पक्षांतर्गत आव्हानांना सामोरे जाताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ज्यांच्या शब्दाशिवाय संभाजीनगरात शिवसेनेचे पानही हलत नव्हते, त्या शब्दांची किंमत आज पक्षात घटल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या पदावरून हकालपट्टीचा विषय असो वा उपमहापौरपदासाठी उमेदवारी देताना शिरसाट यांच्या मताकडे झालेले दुर्लक्ष - या घटनांनी त्यांच्या प्रभावातील घसरण अधोरेखित केली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर आमदार संजय शिरसाट यांची राजकीय घोडदौड वेगाने सुरू झाली. मंत्रिपद, पालकमंत्रिपद आणि प्रवक्तेपद अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या शिंदे सेनेमध्ये त्यांच्या वाट्याला आल्या. टी.व्ही. स्टुडिओंमध्ये आक्रमकपणे शिंदे शिवसेना पक्षाची बाजू मांडणारा चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. विरोधकांवर तिरकस टीका आणि पक्षाच्या भूमिकेचे ठाम समर्थन, यामुळे ते प्रभावी नेते म्हणून पुढे आले. मात्र, प्रवक्तेपद केवळ आक्रमक भाषणांपुरते मर्यादित नसते; ती विश्वासार्हतेची कसोटीही असते.

मुंबईतील आलिशान फ्लॅट, संभाजीनगरातील राजवाड्यासारखा बंगला, एका मोठ्या हॉटेल खरेदीतील कथित अनियमितता, औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरण हे सर्व मुद्दे चर्चेत आले तेव्हा पक्षाची प्रतिमा बचावण्याची जबाबदारी असलेल्या शिरसाट यांच्याच बचावासाठी इतर पक्षांतील इतर नेत्यांना पुढे करावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओंनी जनतेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण केले. जनतेला अपेक्षित होते विकासाचे राजकारण; मात्र चर्चेत राहिले ते व्यवहारांचे राजकारण. या प्रतिमेचा फटका शिंदे शिवसेना पक्षालाच बसला आणि तेथूनच त्यांच्या पक्षात त्यांचे वजन घटू लागल्याचे दिसले. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत तिकीटवाटपावरून शिंदे सेनेतील मतभेद उघडपणे समोर आले. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मनमानीचा आरोप करत बंडखोरीची भूमिका घेतली. सामान्यतः, अशावेळी प्रभावी नेत्याचा शब्द अंतिम मानला जातो; पण येथे चित्र उलटे होते. पक्षाने जंजाळ यांचे पद कायम ठेवलेच; शिवाय त्यांच्या 16 समर्थकांना उमेदवारी दिली. उपमहापौरपदासाठीही शिरसाट यांच्या पसंतीला डावलण्यात आले. या घटनांनी त्यांच्या घटत्या प्रभावावर शिक्कामोर्तब केले आहे.

निवडणूक निकालांनीही हे चित्र अधिक स्पष्ट केले. सलग तीन दशक भगवा फडकलेल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेत शिंदे शिवसेनेला 115 पैकी केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले आणि पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. महापालिका निवडणुकीत आपल्या दोन्ही मुलांना निवडून आणण्यासाठी शिरसाट यांनी जसा जोर लावला, तितकी ऊर्जा त्यांनी पक्षातील इतर उमेदवारांसाठी लावली असती, तर चित्र वेगळे दिसले असते, अशी चर्चा शिवसेना शिंदे गटात आहे. जिल्हा परिषदेतही त्यांच्या मतदारसंघात पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. पालकमंत्री म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सत्ता टिकवण्यात अपयश हे त्यांच्या नेतृत्वावर उठलेले गंभीर प्रश्नचिन्ह ठरले आहे.

राजकारणात निष्ठा महत्त्वाची असली, तरी अंतिम मोजमाप निकाल आणि जनाधार यावरच होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास संजय शिरसाट त्यांच्या पाठीशी असला, तरी पक्षाची व्यापक गरज आणि जनतेचा कौल, याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. शिरसाट यांच्या मताची पक्षात घटत चाललेली किंमत ही त्या वास्तवाचीच परिणती म्हणावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news