

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला आधीच तडे गेले आहेत. काही जिल्हे वगळता अनेक ठिकाणी जिल्हा नेतृत्वही उरलेले नाही. देशभरात काँग्रेसची अवस्था जर्जर असताना महाराष्ट्रात थोडीफार धुगधुगी होती; पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. त्यातून पक्षाने उभारी घ्यावी म्हणून प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यांची नियुक्ती होऊन दोन महिने उलटले आहेत. त्यांच्याकडून काही अपेक्षा असतानाच, पुणे जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी पक्षाला रामराम करीत कमळ हाती घेतले आहे. पक्षाच्या बुरुजाला आणखी एक खिंडार पडले आहे आणि पक्षापुढील अस्तित्वाचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे.
गेल्या काही वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षात विखे घराण्याचे प्रस्थ मोठे होते. त्यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण घराणे हे श्रीमती इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटचे घराणे. या घराण्याचे अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केला. अशा बड्या नेत्यांबरोबर गेल्या काही वर्षांत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे आणि आता संग्राम थोपटे भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाला आणखी धक्का बसला आहे.
संग्राम थोपटे यांचे पिताजी अनंतराव थोपटे सहावेळा विधानसभेवर निवडून आले होते आणि त्यांनी मंत्री म्हणून अनेक खाती सांभाळली होती. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव होते. भोर/वेल्हा या अविकसित भागाचा त्यांनी चांगला विकास केला होता. त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे विधानसभेत तीनवेळा निवडून आले होते. 2024 च्या निवडणुकीत आपल्या प्रचाराला ज्येष्ठ नेते आले नाहीत, ही त्यांची खंत होती. त्यानंतरही त्यांची नाराजीच होती; पण त्यांच्या नाराजीकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही आणि आता त्यांनी पक्ष सोडला आहे.
संग्राम थोपटे यांच्याप्रमाणे आणखीही काही नेते नाराज आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले व काँग्रेस पक्षाचे सहयोगी असलेले खा. विशाल पाटील यांचेही तळ्यात-मळ्यात चालल्याची चर्चा आहे. या बड्या नेत्यांबरोबर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांत कमळ हाती घेतले आहे आणि पक्षातील ही गळती चिंताजनक आहे
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी प्रामुख्याने आदिवासींसाठी काम केले आहे आणि त्यांची प्रतिमा निष्कलंक आहे. त्यांच्या मागे सहकारी संस्थांचा पाठिंबा नाही की, बड्या घराण्याचा वारसा नाही. ते पक्षश्रेष्ठींच्या गुडबुकमध्ये आहेत आणि पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी काही राज्यांत कामगिरीही बजावली आहे. हायकमांडचा विश्वास असल्यानेच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. हे सारे त्यांचे प्लस पॉईंटस् असले, तरी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटनेत आमूलाग्र बदल करावयाचा आहे. बलाढ्य भारतीय जनता पक्ष आणि सत्तारूढ महायुती यांचे जबरदस्त आव्हान समोर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना अतिशय आक्रमकपणाने या सार्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. तशी त्यांची तयारी आहे का, हा प्रश्न आहे.
काँग्रेस पक्षाचा शत्रू काँग्रेस पक्षच असतो, असे म्हटले जाते. एवढी विकलांग अवस्था असूनही काँग्रेस पक्षातील भाऊबंदकी आणि बेबंदशाही काही संपलेली नाही. सपकाळ यांच्या विदर्भात तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी नेत्यांचे परस्पर सख्य किती आहे, हे जगजाहीरच आहे. प्रत्येक जिल्ह्यात गटबाजीने पक्ष पोखरला आहे आणि हे दुखणे फार जुने आहे. ते बरे करणे हे खुद्द पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनाही शक्य नाही. किमान त्यांना थोडा तरी आळा बसेल, याद़ृष्टीने काही पावले सपकाळ उचलतील, असे थोडे जरी दिसले तरी ती मोठीच गोष्ट ठरेल.
फादर काँग्रेस अचेतन अवस्थेत आहे आणि युवक काँग्रेसमध्ये बंडाळीची रणधुमाळी आहे. काँग्रेसचे नेते आ. नितीन राऊत यांचे कुणाल राऊत हे पुत्र. ते विद्यमान प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस नेते आ. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे आदी प्रदेश युवक काँग्रेस कार्यकारिणी सदस्य त्यांच्या विरोधात. त्यांनी श्रेष्ठींकडे तक्रारी केल्या तेव्हा राऊत यांनी त्यांना डच्चू दिला. त्यावर पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्यात आली. त्यांना पुन्हा त्यांचे पद देण्यात आले आणि राऊत यांना शह देण्यासाठी कार्याध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावर राऊत यांनी श्रेष्ठींकडे साकडे घातले आणि त्यांनी श्रेष्ठींच्या आशीर्वादाने कार्यकारिणी बरखास्त करून टाकली. पक्षाची स्थिती शोचनीय असताना युवा शाखेतील हा खेळखंडोबा पक्षाची वाटचाल कशी चालली आहे, यावर झगझगीत प्रकाशझोत टाकतो. पक्षांतर्गत चाललेल्या अशा कुरघोड्यांना लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे धोरण सपकाळ अवलंबणार का, हा खरा प्रश्न आहे. सपकाळ यांनी सूत्रे घेतल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसमधील ही बेदिली उफाळून आली. त्यात त्यांना फारसा हस्तक्षेप करता आला नाही, हे नाकारता येणार नाही.
महायुती सरकारवर आणि विशेषतः भाजपवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सपकाळ यांनी कार्यभार घेतल्यापासून टीका केली आहे व विरोधी पक्ष म्हणून तो त्यांचा अधिकारच आहे. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी औरंगजेब याच्याशी फडणवीस यांची तुलना केली, ती अंगलट आली. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची नव्हे, त्यांच्या कारभाराची औरंगजेबाच्या कारभाराशी तुलना केल्याची सारवासारव त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल त्यांनी आवाज उठवला हे वास्तव आहे. मात्र, केवळ प्रतिक्रिया देऊन भागणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आणि आंदोलनाचा मार्गही स्वीकारण्याची तयारी हवी. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस व संबंधितांनी मुंबईत मोर्चा नेला. अशाप्रकारचे जनसामान्यांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरण्याची तयारी हवी. दीर्घकाळ सत्तेच्या कवचात वावरलेल्या काँग्रेस पक्षाला आंदोलनाची सवय राहिलेली नाही. आता ती सवय करून घ्यावी लागणार आहे. सपकाळ यांना संघटनेला आता या वळणावर नेणे आवश्यक आहे.
काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. या पक्षाची पुनर्बांधणी हे फार मोठे आव्हान असले, तरी लहानसहान पावलांनी त्याची सुरुवात करता येणे शक्य आहे. थोपटे यांच्या पक्ष त्यागाने ही निकड वाढली आहे.