

दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मुख्याध्यापकाच्या क्रौर्याने उभा महाराष्ट्र हादरला. ‘नीट’च्या सराव परीक्षेत पुरेसे गुण मिळवले नाही म्हणून आटपाडी येथील मुख्याध्यापक बापाने बारावीत शिकणार्या स्वतःच्या मुलीला जात्याच्या खुंट्याने बेदम मारहाण करून ठार केले. केवढे हे क्रौर्य? खरी परीक्षा तर तिची बारावीनंतर होती; पण जराही संयम नसलेल्या बापाच्या राक्षसी लालसेने आपल्याच मुलीचा बळी घेतला. तीने ‘नीट’ कॅ्रक केली नसती, तर जगण्याचे सर्वच पर्याय संपले असते का?
नैराश्य हा सर्व वयोगटातील लोकांच्या वाट्याला येणारा कटू अनुभव. मानसशास्त्र असे सांगते की, किमान 27 टक्के लोकांमध्ये अशा नैराश्याने तीव्र स्वरूप धारण केले की, त्याचे रूपांतर मनोविकारात होते. आधुनिक विज्ञान गेल्या 200 वर्षांपासून अशा मनोविकारावर उपाय शोधत आहे; परंतु अद्याप तरी मानवाला फारसे यश आलेले नाही. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक हासुद्धा अशाच ‘नैराश्यातून मनोविकृतीकडे’ प्रवर्गातील जंतू असण्याची शक्यता जास्त आहे. लाखो विद्यार्थी कोणते न कोणते ध्येय उराशी बाळगून शिक्षण घेतात. त्यानंतर सुरू होतो त्यांचा करिअरप्राप्तीचा संघर्ष. त्यांच्या कल्पनांना ध्येय आणि ध्येयांना जेव्हा जिद्दीचे पंख फुटतात तेव्हा ते ध्येयवेडे ध्येयसिद्धीसाठी झेपावतात; पण यापैकी सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यांचे इप्सित साध्य करू शकत नाहीत.
काहींपुढे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, तर काहींपुढे त्यांची आर्थिक परिस्थिती पहाड बनून अडवते. काहीजण गुणवत्ता श्रेणीसाठी कराव्या लागणार्या प्रयत्नात कमी पडतात आणि अपयशी होतात. म्हणून काय जीवन जगण्याचे सर्वच पर्याय संपत नाहीत. नीट परीक्षा पास करून नाही डॉक्टर बनता आले म्हणून एखादी व्यक्ती जीवन जगू शकत नाही? जेईई मेन्स किंवा अॅडव्हान्स परीक्षा कॅ्रक करण्यात अपयशी ठरल्याने इंजिनिअर नाही बनता आले किंवा यूपीएससी परीक्षेत यश नाही मिळाले म्हणून तो व्यक्ती चांगले जीवन जगू शकत नाही? एका क्षेत्रात अपयश आले म्हणून ती व्यक्ती दुसर्या क्षेत्रात अपयशी होईल, असे अजिबात नाही. कायद्याची पदवी परीक्षा सलग 10 वेळा नापास होणारे खुशवंतसिंग यांनी प्रख्यात पत्रकार म्हणून पुढे देशात कीर्ती मिळवली. मोहनदास करमचंद गांधी यांना ख्यातनाम बॅरिस्टर बनायचे होते; परंतु ते मामीबाईंचा पहिलाच खटला हरले; पण हे मोहनदास पुढे महात्मा गांधी बनले. आजही अवघे जग त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाच्या प्रभावात आहे.
देशाच्या शिक्षण क्षेत्रात डॉ. विकास दिव्यकीर्ती नावाच्या एका नव्या विचारवंताचा उदय झाला आहे. एखादे ध्येय नाही साध्य झाले म्हणून तुम्ही निराश होऊ नका! नाही आयएएस, आयपीएस बनता आले म्हणून तुम्ही नाउमेद होऊ नका! करिअरच्या स्पर्धेत तुम्ही एकदा का उडी मारली, तर कोणते ना कोणते प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडेलच, असा आशावाद डॉ. दिव्यकीर्ती विद्यार्थ्यांना शिकवतात. अपयशांमुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना ते जीवनातील अत्यंत मार्मिक आणि साधे तत्त्वज्ञान सांगून त्यांच्यातील नैराश्य काढून टाकतात अन् त्यांच्यात नव्याने उभे राहण्याचे चैतन्य फुलवतात. जीवनाला तुम्ही परीक्षेचे रणांगण करू नका. तुम्हाला आनंद देणारे, समाधान लाभणारे कोणतेही करिअर करा, हे दिव्यकीर्ती अगदी सहज, सोपे करून सांगतात. म्हणूनच त्यांना ‘विद्यार्थ्यांचे नवे डॉ. कलाम’ असे म्हटले जाते.
प्रख्यात विचारवंत डॉ. विल्यम जोन्स यांच्या मते, आपल्यापैकी 90 टक्के लोक स्वत:तील क्षमता ओळखण्यात कमी पडतात म्हणून हे 90 टक्के अर्धवट मनुष्यप्राणी आहेत. समाजातील या 90 टक्के बहुसंख्यकांना बौद्धिक अॅक्सिजन देण्याचे काम उर्वरित 10 टक्के अल्पसंख्याक जीनियसना करावे लागते. जीनियसना संकटे किंवा करिअरची अवघड वाट ही समाजातील एकप्रकारची संधी वाटते आणि तिचा ते पुरेपूर लाभ घेतात.