Political Dissatisfaction Drama | संगीत मानापमान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यभर एकच नाटक सुरू आहे आणि ते म्हणजे संगीत मानापमान. यालाच नाराजीचे नाटक असे म्हणता येईल.
Political Dissatisfaction Drama
संगीत मानापमान(Pudhari Photo)
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यभर एकच नाटक सुरू आहे आणि ते म्हणजे संगीत मानापमान. यालाच नाराजीचे नाटक असे म्हणता येईल. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष दररोज दिवाळी साजरी करत आहेत. परंतु ज्यांना निवडणुकीला सामोरे जायचे आहे, ती मंडळी मात्र सुतकी चेहरा करून बसलेली आहेत. तुम्ही साधारण कोणालाही विचारा, त्यांचा फक्त एकच सूर आहे आणि तो म्हणजे नाराजीचा. मानापमान, नाराजीचा सूर, रडगाणे, जुगलबंदी इत्यादीतून जणू एक संगीत मैफलच निवडणुकीच्या निमित्ताने होत असते.

बहुतांश लोक पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना अपेक्षित असलेले तिकीट मिळत नाहीये. तिकिटाची कापाकापी म्हणजे पतंगाच्या काटाकाटीसारखी असते. ज्याचा पतंग आभाळात उंचावर उडत असतो ते न पाहवल्यामुळे दुसरे लोक मजबूत मांजाचा दुसरा पतंग उडवून उडणार्‍या पतंगाला कापतात आणि तो भरकटत खाली येऊन पडतो. गगनभरारी घेणारा आपला पतंग खाली पडलेले कुणाला आवडेल बरे? समजा, एखाद्याचा पतंग खाली पडला तरी तो लगेच नवीन दुसरा वेगळ्या रंगाचा पतंग घेऊन पुन्हा आकाशात भरारी घेतो. असाच काहीसा प्रकार सध्या राजकारणामध्ये सुरू आहे.

Political Dissatisfaction Drama
Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

तुम्ही कितीतरी वर्षे एका पक्षाचे काम करत आहात. त्या पक्षाने तुम्हाला तिकीट दिले नाही तर लगेच दुसर्‍या दारावर किंवा तिसर्‍या दारावर जाऊन धडका मारल्या जातात आणि कुठले ना कुठले तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न होतो. एकदाचे कोणते तरी तिकीट पदरात पडल्याबरोबर आपण सोडलेल्या पक्षाने आपल्यावर किती अन्याय केला याचे रडगाणे आठवडाभर तरी गायले जाते.

ज्या पक्षासाठी आपण आपले आयुष्य उधळून दिले, त्याच पक्षाने आपला अपमान केला, असे अपमाननाट्य मग रंगत जाते. अशावेळी बरेच उमेदवार सूडनाट्यही रंगवत असतात. भले आपण निवडून येऊ अथवा न येऊ. परंतु ज्या पक्षाने आपला अपमान केला आहे, त्या पक्षाचा उमेदवार निवडून येता कामा नये, असा निर्धार करून काही लोक कामाला लागतात. ते स्वतः निवडून येण्याची काही शक्यता नसते. परंतु एखाद्या वार्डमधील 50 ते 100 मते ओढून ते हमखास यश मिळवणार्‍या उमेदवाराला नाट लावतात. एकदाचे हे दोन्ही उमेदवार पडले की, या सूडनाट्याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या अंकावर पडदा पडतो. तोपर्यंत ही जुगलबंदी गाजलेली असते.

मंडळी, सध्या होऊ घातलेल्या निवडणुका किंवा हा सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी विविध लोक विविधरंगी भूमिका करत आहेत. जनता हे पाहात आहे. जनता केवळ प्रेक्षक नाही तर मतदारही आहे आणि तीच या लोकशाही प्रक्रियेतील सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका आहे. ती आपण जोमदारपणे केली पाहिजे. तरच आपल्याला मतदार राजा म्हणवून घेण्याचा अधिकार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news