Political Analysis | संघाचा कटाक्ष, युवकांकडे लक्ष!

mumbai vartapatra
mumbai vartapatra
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

भारत तरुणांचा देश असताना युवकांच्या मनातील अस्वस्थता आणि बदलत्या अपेक्षा आता राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवकांशी संवाद वाढवण्याची घेतलेली भूमिका आणि त्यामागचे राजकीय-सामाजिक संकेत महत्त्वाचे ठरतात.

भारत देश तरुणांचा आहे. या देशाला येत्या काही वर्षांत जगातील महत्त्‍वाची, क्रमांक तीनची अर्थसत्ता होण्याचे वेध लागले आहेत. तसे घडेलही; पण ‘विश्वात शोभून दिसणाऱ्या’ त्या नव्या भारतातील संख्येने मोठ्या असलेल्या युवकांचे काय? हे युवक प्रगतीनंतरही अस्वस्थ असतील तर देश मोठा कसा होणार? देशातील राजकारण्यांचे सरासरी वय साठीच्या आसपासचे अन् आम जनता तरुण. नव्याचा वेध घेणारी. आज भारतात सर्वाधिक मोठे संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वास्तवाकडे लक्ष द्यायचे दिसतेय. २०१४ पासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर जी डाव्या-उजव्यांची वैचारिक लढाई सुरू झाली आहे ती आता टोकाला पोहोचणार याची जाणीव संघ परिवाराला झाली असावी. सरकारचा कारभार हाकताना ज्या चुका झाल्यात त्या जनआक्रोशाचे कारण ठरल्या आहेत. युवक नाराज आहेत, हे वेळीच लक्षात घेत संघाने आता ‘कॅच देम’ हे धोरण स्वीकारलेले दिसते.

मुंबईत युवकांशी संवाद साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे युवकांकडे लक्ष असल्याचा प्रत्यय दिला आहे. सरकार जेथे चुकले त्या चुकांवर थेट हल्ला नाही; पण दिशादिग्दर्शन केल्याच्या भूमिकेत भागवत यांनी दिलेली उत्तरे उजव्या विचार परिवाराला कशा पद्धतीने पुढे जायचे आहे, याची निदर्शक मानायला हवीत. महाराष्ट्रात नागपूर येथे जन्मलेल्या संघाची शताब्दी सध्या सुरू आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नवनवे कार्यक्रम सुरू असतानाच युवकांनी स्वयंसेवक व्हावे, संघ विचारांशी जोडून घ्यावे, असे प्रयत्न जोरकस प्रमाणावर सुरू आहेत. संघाच्या प्रचार विभागाने उपलब्ध करून दिलेली आकडेवारी पाहिली तर संघ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करणाऱ्यांत सुमारे ७३ टक्के युवक असतात. या संपर्काबरोबरच संघाने जो आत्मा मानला आहे त्या दैनंदिन शाखांमध्ये हजर होणाऱ्या युवकांची संख्यादेखील या विभागाने समोर आणली आहे. विजयादशमी उत्सवात २७ लाख तरुण सहभागी झाले आहेत. भविष्यातील भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची जाणीव ठेवून संघ प्रत्येक कार्यक्रमात विविध समाज गटातले युवक असतील, असे प्रयत्न करतो. स्वतःच्या कामाचा कणा युवक मानतो आहे.

अर्थातच, या युवकांमध्ये संघ हा आपली संघटना नाही, तो ब्राह्मण्यवादी प्रकृतीचा परिचयक आहे ते मानणाराही मोठा वर्ग आहे. देशातल्या या तरुणवर्गाशी नाते ठेवण्यात संघाला रस आहे. त्यामुळेच जंतर-मंतरवर अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन केले, त्यात केवळ विदेशी शक्तींच्या इशारामुळे आंदोलन करणारे युवक आहेत असे नाही, तर देशाशी इमान राखणाऱ्या; पण येथील अनागोंदी कारभारामुळे अस्वस्थ झालेल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत, हे संघाने जाणले असावे. खरे तर युवकांचा जोर उशिरा लक्षात आला असावा.

‘नीट’ परीक्षेसाठी बसलेली २२ लाख मुले, ‘जेईई’ परीक्षेला बसणारी सुमारे १५ लाख मुले, तसेच देशाच्या अनेक राज्यांमध्ये लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरकारी सेवेत शिरू इच्छिणारे युवक, हे सगळेच परीक्षा पद्धतीमुळे अस्वस्थ झाले असावेत. त्यामुळेच परीक्षा पद्धतीतील दोष आणि शिक्षण पद्धतीतील काही चुका यावर ‘जेन झी’समोर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत अत्यंत मोकळेपणाने ज्या चुका झाल्या त्यावर विचार करायला हवा, असे सांगत होते. हा सगळा विचार भविष्यात काय घडते आहे, त्याकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. या युवकांना राष्ट्रद्रोही न मानता त्यांच्याशी संवाद साधायला हवा, हे अचूकपणे लक्षात घेतले गेले असावे, असे संघ अभ्यासक मानतात. त्यासाठी मोहन भागवत स्वतः आगामी दिशा उलगडून सांगत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे पद सांभाळणाऱ्या सहकार्यवाहक त्रयीतील अतुल विमाय यांनी या आंदोलनाला सरकारविरोधी न मानता व्यवस्थाविरोधी मानावे, हे सांगत तेथे कोणते घटक शिरले असावेत आणि कोण राष्ट्र खिळखिळे करण्याच्या प्रयत्नात असावेत, हेही समजावून सांगितले. हे भाषण व्हायरल का झाले, की ते व्हायरल करायचे नसताना कार्यक्रम जाहीर असल्यामुळे या भाषणाची प्रीत पसरली हे कळायला अजून मार्ग नाही.

संघात असे फारसे लवकर काही कळत नसतेच; पण त्यामुळे संघ या सर्व आंदोलनाकडे किती गांभीर्याने बघतो आहे ते दिसले. खरे तर लोकसभेच्या अधिवेशनात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण गाजायला हवे होते. श्रीराम मंदिरातील दानपेटीतून रक्कम चोरी होणे अजिबातच भूषणावह नाही. त्यामुळे पेपरफुटी असो किंवा देणगी घोटाळा. वातावरण बदलले आहे आणि ते सरकारसमोरचे आव्हान ठरले आहे, हे अचूकपणे ओळखले गेले असावे. अर्थात, संघाचे सर्व संबंधित सत्तेत येणे किंवा सत्ता राखणे हे आमचे उद्दिष्ट नाही, असे म्हणतात. परंतु, जनतेबरोबर राहणे आणि जनतेच्या मनातील असंतोषाची योग्य ती दखल घेत पावले टाकणे, हा मार्ग सध्या अवलंबलेला दिसतो.

आणीबाणीविरोधात आंदोलन झाले, तेव्हाही नवनिर्माणाच्या झेंड्याखाली आधी गुजरात, नंतर बिहार आणि त्यानंतर संपूर्ण देशात पसरलेल्या युवकांच्या क्रांतीत भाजपचे आज नेते असलेले अनेक विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. आसाममध्येदेखील युवकांचा रोष मोठा झाला होता, तेव्हा गण परिषद या पक्षामागे संघाने पाठबळ लावले होते. अर्थात, नंतर या पक्षाच्या काही भूमिका पटेनाशा झाल्यानंतर संघ परिवाराने यातून आपले अंग काढून घेतले. मात्र, मोहन भागवत यांनी साधलेला संवाद हा उजव्या परिवारासाठी अत्यंत महत्त्वाची दिशा दाखवणार आहे. ही दिशा उजव्या परिवारातील सर्वांना पटेल, असेही नाही. ‘एलजीबीटी’ समलिंगी जोडपी यांच्याबद्दल सरसंघचालकांनी बोलणे हे कल्पनेला धक्का देणारे आहे. मात्र, जे जे आधुनिक आहे आणि जगात जे जे घडते आहे, त्याची दखल घेण्याची वृत्ती यातून दिसली. संघाचे विरोधकही युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. अभिजित दीपके हे आंबेडकरवादी चळवळीशी संबंधित राहावेत, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने या आंदोलनानंतर युवकांची संघटना बांधायचा मोठा प्रयत्न केला. काँग्रेसने ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातही आयोजित करायचे ठरवले आहे. युवक हे आगामी काळामध्ये महत्त्‍वाचे असणार आहेत, हे प्रत्येकालाच कळले आहे. संघ त्यात मागे नाही. उलट संघाला कात टाकून आधुनिक विचारांशी नाते सांगायचे आहे.

लोकसभेच्या अधिवेशनात परिसीमन विधेयक येईल, अशी चर्चा आहे. संघ परिवार आणि उजवा विचार स्वतःचे स्थान बळकट करायचा प्रयत्न करतो आहे. एकदा आलेली सत्ता महत्त्वाची असते, हे या मंडळींना कळते. ही सत्ता राखतानाच देशातले तरुणही आपल्याबरोबर राहतील आणि त्यांच्या वेदनांशी आपण नाते सांगू, हे सांगायचा सध्या प्रयत्न सुरू झालेला दिसतो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news