

आशिष शिंदे
लहानपणी आपण कितीही धावपळ केली, खेळलो तरी आपले पाय कधीच थकत नसत. पण जसजसे वय वाढते जात आहे, तसतसे कुठेतरी पाय भरून येत आहेत. काहीसे अंतर चाललल्यानंतर कंटाळा येत आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात बस पकडण्यासाठी पळताना किंवा ऑफिसच्या जिन्यांवरून चढ-उतार करतानाही अनेकांना हा थकवा जाणवतो. ट्रेकिंगला गेल्यावर किंवा लांबचा पल्ला गाठताना तर, अजून किती चालायचे आहे, असा प्रश्न हमखास पडतो. विचार करा, जर तुमचे शूजच तुम्हाला चालण्यासाठी एक वेगळी ऊर्जा देऊ लागले तर? ऐकायला एखाद्या हॉलीवूडच्या सायन्स फिक्शन सिनेमातील कल्पनेसारखे वाटेल; पण सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये हे प्रत्यक्षात उतरले आहे.
बाजारात चक्क रोबोटिक शूज आले आहेत. हे काही साधे शूज नाहीत, तर याला बायोनिक फूटवेअर म्हटले जाते. या भन्नाट गॅजेटचे मुख्य दोन भाग आहेत. पायाच्या घोट्याला बांधता येणारे आणि त्याला जोडले जाणारे खास स्नीकर्स. हा डिव्हाईस तुमच्या पायाच्या पोटरीला एका पट्ट्याने सुरक्षितपणे बांधला जातो. यामध्ये काही स्मार्ट सेन्सर्स आणि बॅटरी असते. जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता, तेव्हा हे सेन्सर्स तुमची चालण्याची पद्धत अचूक ओळखतात आणि प्रत्येक पावलासोबत तुमच्या टाचेला खालून एक हलकासा पुश किंवा धक्का देतात. हे रोबोटिक शूज म्हणजे तुमच्या पायाला एक अतिरिक्त पोटरीचा स्नायू लावल्यासारखे काम करते. त्यामुळे चालताना पायांवर अजिबात ताण येत नाही आणि तुम्ही न थकता अधिक अंतर सहज कापू शकता.
रोबोटिक शूज घालून चालण्याचा अनुभव अतिशय रंजक आहे. जेव्हा तुम्ही पाऊल पुढे टाकता, तेव्हा हे शूज तुम्हाला स्प्रिंगसारखी उसळी देतात. यामुळे चालताना अजिबात श्रम पडत नाहीत. तुम्हाला किती मदत हवी आहे, यानुसार यामध्ये तीन पॉवर लेव्हल्स दिल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता. विशेष म्हणजे हे शूज वापरण्यासाठी कोणत्याही मोबाईल अॅपची किंवा रिमोटची गरज नाही. बॉक्समधून काढले की थेट वापरायला सुरुवात करता येते. त्यामुळे यांना वापरणे अत्यंत सोपे आहे. याची बॅटरी केवळ दीड तासात फुल्ल चार्ज होते आणि एकदा चार्ज केल्यावर तुम्ही 8 किलोमीटरपर्यंत चालू शकता. रोबोटिक शूजचा प्रत्यक्ष अनुभव घेताना एक गमतीशीर गोष्ट नक्की जाणवते. जेव्हा तुम्ही हे शूज घालून चालता तेव्हा तुम्हाला खूप हलके आणि बाऊन्सी वाटते. शूज प्रामुख्याने अशा लोकांसाठी बनवले आहेत, ज्यांना चालताना लवकर थकवा येतो किंवा ज्यांना जास्त अॅक्टिव्ह राहायचे आहे. रोबोटिक शूजची किंमत 4 हजार 500 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 3 लाख 75 हजार रुपये इतकी आहे. किंमत नक्कीच जास्त आहे. पण ज्यांना स्वतःच्या पायांवर आत्मविश्वासाने आणि न थकता चालायचे आहे, त्यांच्यासाठी ही गुंतवणूक मोलाची ठरू शकते.