Robotic Legs | रोबोटिक लेग्जमुळे चालणे होईल सोपे

अनेकदा ट्रेकिंगला निघालो की, पहिल्याच काही किलोमीटरनंतर पाय जड होतात, गुडघेदुखी सुरू होते, पायाच्या तळव्यात वेदना सुरू होतात; मग काय आणखी किती चालायचंय?
Robotic Legs
रोबोटिक लेग्जमुळे चालणे होईल सोपे (Pudhari File Photo)
Published on
Updated on

आशिष शिंदे

अनेकदा ट्रेकिंगला निघालो की, पहिल्याच काही किलोमीटरनंतर पाय जड होतात, गुडघेदुखी सुरू होते, पायाच्या तळव्यात वेदना सुरू होतात; मग काय आणखी किती चालायचंय? कधी संपणार हा ट्रेक? हेच विचार डोक्यात घोंगावू लागतात. शहरात फेरफटका मारतानाही अशीच अवस्था होते. रस्ता जणू संपेना! आणि जिने चढताना तर पाय एकदम निकामी झाल्यासारखे वाटतात.

अशावेळी मनात येते असे कोणते तरी गॅजेट तयार व्हायला पाहिजे, जे पायाला लावा आणि कितीही किलोमीटर चाला. पाय काय दुखणार नाहीत! तुमच्या मनातील ही कल्पना सध्याच्या गॅजेट वर्ल्ड सत्यात उतरली आहे. हे भन्नाट रोबोटिक लेग्ज एखाद्या पँटप्रमाणे तुम्ही गुडघ्यावर चढवले की झाले. चालताना, ट्रेकिंग करताना किंवा जिने चढताना पायांवर पडणारा ताण हे कमी करतात. इतकेच नाही, तर चालायला आणि पळायलाही मदत करतात. तुम्हाला कळणारही नाही की, तुम्ही चालत आहात. यामध्ये देण्यात आलेले फीचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील.

शरीराला तोल राखायला मदत करायची आणि किती किलोमीटर चाला तेही न थकता हे या रोबोटिक लेग्जचे मुख्य काम. दिसायला जरा वेगळे असले, तरी पायाला लावल्यावर जणू शरीराचा एक भागच आहे, असे वाटते. हे यंत्र कंबर आणि मांड्यांभोवती बसवले जाते. आत बसवलेले स्मार्ट सेन्सर्स तुमच्या हालचाली ओळखतात. पाय पुढे टाकल्याबरोबर ते हालचालीशी स्वतःला जुळवते आणि ‘पूश असिस्ट’ देते. म्हणजे पायांना वर खेचण्याची शक्ती वाढवते. परिणामी, जिना चढताना, चालताना किंवा धावताना पाय हलके वाटतात.

या गॅजेटचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते वापरकर्त्याच्या चालण्याच्या पद्धतीनुसार स्वतःचा वेग आणि ताकद बदलते. तुम्ही थकलेले असाल, तर सेन्सर ते लगेच ओळखतो आणि पायांवरील भार कमी करतो. एखाद्या अद़ृश्य साथीदाराने हात दिल्यासारखी ती भावना होते. याचे वजन केवळ 1.8 किलो आहे, म्हणजे वापरतानाही जड वाटत नाही. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हे सुमारे 5 तास सतत कार्यरत राहते. त्यामुळे लांब चालत, धावत जाणे, गिर्यारोहण किंवा दिवसभराचे कामही सहज पार पडते. रोबोटिक लेग्ज वापरणेही अगदी सोपे आहे. तो कमरेला बांधा, बक्कल लावा आणि पॉवर ऑन करा. काही सेकंदांतच तो तुमच्या हालचालींशी सिंक्रोनाईज होतो. त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप आहे, ज्यातून तुम्ही पॉवर, बॅटरी आणि सपोर्ट लेव्हल पाहू शकता.

Robotic Legs
Editorial : लवंगी मिरची : निसर्ग प्रेरणा

ज्येष्ठ नागरिकांसाठी, चालण्यात अडचण असलेल्या व्यक्तींसाठी तर हे गॅजेट वरदानच ठरू शकते. सध्या या रोबोटिक लेग्जची किंमत 1.5 ते 2 लाखांच्या दरम्यान आहे. प्रीमियम मॉडेल्समध्ये वजनानुसार स्वयंचलित समायोजन, जास्त बॅटरी बॅकअप आणि हाय-प्रिसिजन मोशन सेन्सिंग अशी अधिक वैशिष्ट्ये दिली जातात. सध्या पाश्चात्त्य देशांमध्ये या रोबोटिक्स लेग्जने धुमाकूळ घातला आहे. लवकरच ते भारतातही उपलब्ध होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news