

आशिष शिंदे
धावपळीच्या आयुष्यात घरातल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी वेळ काढणे किती कठीण जाते, हे वेगळे सांगायला नको. वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुणे तसे सोपे असते; पण तो कपड्यांचा ढीग सुकल्यावर त्याच्या घड्या घालणे म्हणजे एक अत्यंत कंटाळवाणे काम. सुट्टीच्या दिवशीही हा कपड्यांचा डोंगर बघून अनेकदा मूड खराब होतो; पण आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये या कटकटीवर एक भन्नाट उपाय आला आहे. तुमचा हा कंटाळा कायमचा दूर करण्यासाठी चक्क एक रोबो तुमच्या मदतीसाठी येणार आहे.
हा रोबो तुमच्या घरातील एक नवा स्मार्ट मदतनीस आहे. तुम्ही धुतलेले आणि वाळलेले कपडे एका टेबलावर या रोबोसमोर ठेवले की झाले. पुढच्या 30 ते 90 मिनिटांत हा रोबो टी-शर्ट, शॉर्टस् अशा कपड्यांच्या अगदी दुकानात मिळतात तशा नीटनेटक्या घड्या घालून देतो. हा रोबो नेमका दिसतो कसा? आणि काम कसे करतो? हे जाणून घेणे रंजक ठरेल. रोबो म्हटले की, डोळ्यांसमोर ह्युमनॉईड रोबो किंवा चित्रपटात दाखवण्यात आलेले रोबो येतात; पण हा रोबो तसा नाही. तर हा रोबो एका जागी स्थिर राहून काम करतो. याला काम करण्यासाठी घरात साधारणत: 6 बाय 5 फुटांची मोकळी जागा लागते. याचे डिझाईन थोडे रॉ आहे; म्हणजे यावर कोणतेही कव्हर नसून त्याचे सांधे आणि यांत्रिक भाग उघडे दिसतात. याच्या डोक्यावर दोन फिरते कॅमेरे बसवले आहेत, जे त्याचे डोळे म्हणून काम करतात. तुम्ही टेबलावर कपड्यांचा ढीग ठेवला की, हे कॅमेरे कपड्यांचा आकार आणि प्रकार ओळखतात. त्यानंतर रोबोचे दोन यांत्रिक हात अत्यंत सफाईदारपणे एकापाठोपाठ एक कपडे उचलतात आणि त्यांच्या घड्या घालतात.
सोप्या कपड्यांच्या घड्या हा रोबो स्वतःच्या एआयचा वापर करणार्या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने घालतो; पण उशांचे कव्हर तसेच अवघड कपड्यांसाठी याला थोडी मानवी मदत घ्यावी लागते. कंपनीने यात टेलिऑपरेशन तंत्रज्ञान वापरले आहे. म्हणजे जेव्हा रोबोला घडी घालताना अडचण येते, तेव्हा कंपनीचा एक तज्ज्ञ रिमोटद्वारे 5 ते 10 सेकंदांसाठी या रोबोच्या कॅमेर्यातून बघतो आणि त्याला घडी घालायला मदत करतो. घरात कपड्यांच्या घड्या घालण्यासोबत मोठ्या शहरांमध्येदेखील मोठमोठ्या लाँड्रींमध्ये त्याचा सहज आणि सुलभ वापर करता येऊ शकतो.
या स्मार्ट रोबोचे अपग्रेड व्हर्जन मात्र केवळ एकाच जागी थांबणारे नाही, तर पूर्ण घरभर फिरून साफसफाई करेल आणि चक्क तुमच्यासाठी कॉफीसुद्धा बनवून देईल! आता याच्या किमतीचा विचार केल्यास, हा स्मार्ट रोबो घरी आणण्यासाठी तुम्हाला तब्बल 7,999 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 6.6 लाख रुपये मोजावे लागतील. एकूणच काय, तर भविष्यात घरातील कामे करण्यासाठी आपल्याला माणसांची नाही, तर अशा रोबोंची गरज भासणार आहे, याची ही सुरुवात आहे. हा रोबो म्हणजे एआय आणि तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यात टाकलेले एक आश्चर्यकारक पाऊल नक्कीच आहे.