Political change Bengal | बंगालमध्ये नव्या युगाचा उदय

Political change Bengal |
Political change Bengal | बंगालमध्ये नव्या युगाचा उदय(Pudhari File Photo)
Published on
Updated on

राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

पश्चिम बंगालमधील सत्ताबदलाने राज्यात नव्या राजकीय आणि सांस्कृतिक पर्वाची चाहूल लागली आहे. बंगालच्या आध्यात्मिक, वैचारिक आणि ऐतिहासिक परंपरेच्या आधारावर विकास आणि पुनर्जागरणाचा नवा अध्याय सुरू होत आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं ‘हे नूतन, देखा दिक आरबार, जन्मेरो प्रोथोमो शुभोक्षोन’ या शब्दांचा अर्थ- ‘नवचैतन्या, तुझ्या जन्माच्या पहिल्या शुभक्षणी पुन्हा एकदा स्वतःला प्रकट कर’ असा आहे. त्यांनी हे शब्द एक आवाहन म्हणून लिहिले होते. बंगालच्या सातत्याने नूतनीकरण होणार्‍या चैतन्यासाठी केलेली ही एक प्रार्थना आहे. पारंपरिकपणे हे गीत त्यांच्या जयंतीदिनी गायिले जाते. त्यामध्ये त्यांना मानवंदना दिली जाते आणि वाढदिवस ज्या नूतनीकरणाचा आणि जागृतीचा आनंद दर्शवतो, तो साजरा केला जातो. ही भूमी केवळ बदलत नाही, तर तिचा सातत्याने पुनर्जन्म होत असतो, याची गुरुदेवांना कल्पना होती. टागोर यांच्या 165 व्या जयंतीच्या उण्यापुर्‍या आठवडाभर आधी पश्चिम बंगालने एक ऐतिहासिक बदल अनुभवला आहे, हा एक सुखद योगायोग आहे. 4 मे रोजी भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. तरीही, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक केवळ एक राजकीय स्पर्धा नव्हती. या महान भूमीचे हरवलेले वैभव पुनर्संचयित करण्याची ही एक संधी होती, हे निवडणुकीच्या गणितांच्या पलीकडचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय आवाहन होते.

आज राजकीय वादाचा कोलाहल बाजूला सारून एका सखोल प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे. बंगाल नेमका काय आहे? आणि त्याचे वैभव पुनर्संचयित करणे म्हणजे नक्की काय? बंगालचा वर्तमान समजून घेण्यासाठी प्रथम त्याच्या भूतकाळात उतरावे लागेल. बौद्धिक परिष्कृततेसाठी ओळखली जाण्यापूर्वी, बंगाल ही एक पवित्र भूमी होती. 15 व्या शतकात नवद्वीपमध्ये गंगेच्या काठावर निमाई नावाच्या एका तरुणाने, ज्याला जग नंतर चैतन्य महाप्रभू म्हणून ओळखू लागले, गायला सुरुवात केली. त्यांचे कीर्तन केवळ संगीत नव्हते, तर ती भक्तीच्या वेषातली एक समाजसुधारणेची चळवळ होती. त्यांनी अस्पृश्यांना कवेत घेतले, विद्वानांसोबत नृत्य केले आणि ईश्वराचे नाव कोणत्याही ओळखीच्या ओझ्याशिवाय सर्वांसाठी खुले आहे, अशी घोषणा केली. त्यांनी प्रज्वलित केलेला वैष्णव धर्म बंगालच्या आणि भारताच्या आत्म्याची आध्यात्मिक रचना बनला. तो आनंदी आणि सर्वसमावेशक होता.

दोन शतकांनंतर, त्याच आत्म्याला बाऊल परंपरेत एक लौकिक पूरक साथ मिळाली. या भटक्या संतांनी जातपात मानली नाही, त्यांच्याकडे कोणतेही शास्त्र नव्हते आणि ते ‘मनेर मानुष’ म्हणजेच मनातल्या माणसाचे गाणे गात. त्यांच्यामध्ये सर्वात तेजस्वी व्यक्तिमत्व होते लालन फकीर यांचे. त्यांच्यावर कोणताही धर्म आपला दावा करू शकला नाही आणि त्यांना प्रत्येक परंपरेने आपले मानले. ते हिंदू होते की मुस्लीम हे कोणीही सांगू शकले नाही आणि तशी तसदी घेण्याची गरजही भासली नाही. ही अस्सल बंगाली समन्वयवादी प्रतिभा होती, एक अशी ओळख जी केवळ जगता येते. गेल्या तीन शतकांमध्ये बंगालने भारताच्या नैतिक जागृतीत केवळ सहभागच नोंदवला नाही, तर या जागृतीचा पाया रचला. राजा राममोहन रॉय यांनी अशा समाजाकडे पाहिले जो आपल्या प्रथांमध्ये ताठर आणि भ्रष्ट झाला होता. त्यांनी त्यामध्ये सुधारणा केली. सती प्रथा निर्मूलनासाठी लढा दिला आणि आत्मपरीक्षणातून समाजाचे पुनरुज्जीवन घडवण्याचा आग्रह धरला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी ती मशाल पुढे नेली आणि शिक्षणाचे रूपांतर मुक्तीच्या कृतीत केले. विशेषतः महिलांसाठी शिक्षणाला मुक्तीचे साधन बनवत त्यांनी सामाजिक परिवर्तनाची दिशा अधिक व्यापक केली.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी देशाला पहिली महान कादंबरी दिली. त्या कादंबरीतच वंदे मातरम हे गीतही लिहिलेले होते. पुढे एक शतकभर स्वातंत्र्यसैनिकांच्या मुखी हे समरगीत गुंजत राहिले आणि आजही प्रत्येक भारतीयाच्या ओठी हे गीत विसावलेले आहे. बंगालने भारताला कादंबिनी गांगुली यांच्या रूपाने पहिली महिला वैद्यकीय डॉक्टर दिली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्वाने भारताच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली.

बंगालच्या भूमीने असंख्य विलक्षण बुद्धिमत्तेच्या तसेच महान व्यक्तिमत्त्वांना जन्म दिला आहे. त्या सगळ्यांमध्ये स्वामी विवेकानंद हे सर्वात तेजस्वी, ज्ञानी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. विवेकानंदांनी 1893 मध्ये जागतिक धर्म संसदेतील ऐतिहासिक भाषणातून जगाला हिंदू धर्माच्या महानतेची ओळख करून दिली आणि धार्मिक सहिष्णुता तसेच कट्टरतावाद संपुष्टात आणायचे आवाहन केले; परंतु ते जेव्हा मायदेशी परतले, त्यावेळी त्यांनी स्वकीयांसमोर पचनी पडायला कठीण जातील, अशी कठोर सत्येही मांडली. सामर्थ्याशिवाय असलेली अध्यात्मिकता ही केवळ भावुकता असते, भुकेलेल्या माणसाला तत्त्वज्ञान शिकवता येत नाही आणि देवीची पूजा केवळ मंदिरातच नव्हे, तर स्त्रीमध्ये, गरिबांमध्ये आणि प्रत्यक्ष राष्ट्रामध्ये केली पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. हीच तर बंगालची खरी ओळख आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे केवळ एक निकाल म्हणून पाहता कामा नये. ज्यांनी बंगालला त्याच्या सच्च्या मुळांपासून आणि मूल्यांपासून दूर केले, त्यांच्या विरोधात मिळालेला हा जनतेचा कौल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही सत्तेसाठीची लढाई कधीच नव्हती. ते एक पवित्र कार्य होते. गमावलेला गौरव परत मिळवण्यासाठी केलेला एक यज्ञ. पंतप्रधान मोदींचे बेल्लूर मठाशी असलेले घनिष्ठ नाते, स्वामी विवेकानंदांबद्दलचा त्यांचा आदर, सुशासनाला सेवा म्हणून संबोधणे म्हणजेच सेवेला एक उपासना मानणे ही राजकीय विधाने नाहीत. या गोष्टी बंगालला त्याचा पूर्वीचा गौरव पुन्हा मिळवण्यासाठी आणि एका गौरवशाली व सुरक्षित भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देतात. हे एका प्रधानसेवकाने आपला प्रधानधर्म पार पाडण्याचे उदाहरण आहे.

बंगालचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे, ज्या घाटांवर चैतन्य महाप्रभूंनी गायन केले, त्या घाटांच्या काठावर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे, ईश्वरचंद्र विद्यासागरांनी पाहिलेल्या शाळांच्या स्वप्नाला निधी पुरवणे, शतकानुशतके शिक्षणात भारताचे नेतृत्व करणार्‍या या भूमीत नामवंत विद्यापीठे उभारणे, पश्चिम बंगालमधील सर्व आदिवासी बांधवांना सन्मान प्रदान करणे, बंगालच्या सत्ताधारी पक्षांकडून दीर्घकाळ सापत्न वागणूक सहन करणार्‍या डोंगराळ भागातील लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देणे.

‘हे नूतन, नव्या अवतारा, पुन्हा एकदा स्वतःला प्रकट कर. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि बंगालच्या प्रत्येक सुपुत्र-सुपुत्रीच्या आशीर्वादाने!’ बंगालमधील पहिले भाजप सरकार आजपासून हीच प्रार्थना करून आपली सेवा पार पाडेल. गेल्या अर्धशतकात काही काळ असे वाटत होते की, बंगालचे सुवर्ण दिवस संपले आहेत; मात्र आज आगामी समृद्धी आणि शांततेच्या एका चैतन्यमय नव्या जीवनाच्या आश्वासनासह त्याचा पुनर्जन्म झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news