

मुरलीधर कुलकर्णी
पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’वर वसलेल्या फिलिपाईन्ससाठी भूकंपाचे धक्के नवीन राहिलेले नाहीत. ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजे ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक विशाल शृंखला किंवा पट्टा. याला सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात; पण 10 ऑक्टोबर रोजी मिंडानाओच्या किनाऱ्याजवळ आलेला 7.4 मॅग्निट्यूडचा शक्तिशाली भूकंप मात्र या देशासाठी पुन्हा एकदा मोठा आघात ठरला. या विनाशकारी धक्क्याने, जो काही तासांनी आलेल्या 6.8 मॅग्निट्यूडच्या आफ्टरशॉकसह डबलट (जुळा धक्का) म्हणून ओळखला जातो, त्याने फिलिपाईन्सच्या जनजीवनावर गंभीर परिणाम केले. या भूकंपाचे केंद्र दाव्हाओ ओरिएंटल प्रांताजवळ होते, ज्यामुळे अनेक इमारतींचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. सात लोकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झाले. बळींच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असून या भूकंपाने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती आणि चिंता निर्माण केली आहे. सातत्याने येणाऱ्या धक्क्यांमुळे घरे, रस्ते आणि पुलांसारख्या पायाभूत सुविधांचे या देशात नेहमी नुकसान होते, ज्यामुळे अर्थव्यवस्था मंदावते. शिक्षण आणि आरोग्य सेवांवरही नकारात्मक परिणाम होतो. अलीकडेच सेबूमध्ये आलेल्या 6.9 मॅग्निट्यूडच्या भूकंपाने 75 हून अधिक लोकांचा बळी घेतला. भूकंपाच्या वेळी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता, ज्यामुळे किनारी भागातील लोकांना तातडीने स्थलांतर करावे लागले.
फिलिपाईन्समध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांचे सरकार आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सीस्मोलॉजी ही संस्था भूकंपाचे अचूक निरीक्षण करून त्वरित इशारे जारी करते. याशिवाय कठोर भूकंप प्रतिरोधक बांधकाम नियम लागू केले गेले आहेत. सरकारने नागरिकांना ‘झुका, झाका आणि धरून राहा’ या सुरक्षिततेच्या नियमाचे नियमित प्रशिक्षण दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी मॉक ड्रिल आयोजित केले जातात, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची तयारी चांगली असावी.
या नैसर्गिक आपत्तीनंतर, फिलिपाईन्सला जागतिक पातळीवरूनही मदत मिळाली असून अनेक आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था आणि राष्ट्रांनी मदत व बचाव कार्यासाठी सहकार्य देऊ केले आहे. संयुक्त राष्ट्र आणि शेजारील देशांनी आवश्यक मदत साहित्य आणि तांत्रिक सहकार्य पुरवण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्सुनामीचा धोका कमी झाल्यानंतर पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरनेदेखील या क्षेत्रासाठीचा धोका आता टळल्याची माहिती दिली आहे. फिलिपाईन्ससाठी वरचेवर येणाऱ्या भूकंपाची ही मालिका एक मोठा नैसर्गिक शाप असली, तरी येथील सरकारच्या आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे तसेच जागतिक मदतीच्या पाठिंब्याने हा देश या नैसर्गिक आपत्तीतून नक्कीच सावरेल, यात कोणतीच शंका नाही.